पश्चिम आशियातील अत्यंत संवेदनशील आणि बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इराणमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांसाठी एक नवी आणि अत्यंत तातडीची ट्रॅव्हल ॲडव्हायझरी (Travel Advisory) जारी केली आहे. भारताने आपल्या नागरिकांना इराणचा कोणताही प्रवास न करण्याचा आणि सध्या तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना उपलब्ध वाहतूक साधनांचा वापर करून तातडीने तो परिसर सोडण्याचा कडक सल्ला दिला आहे.
इराणमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (X) ही तातडीची सूचना प्रसिद्ध केली आहे. "या भागातील ताज्या घडामोडी लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांनी इराणचा प्रवास पूर्णपणे टाळावा, या आमच्या आधीच्या सल्ल्याचा दूतावास पुनरुच्चार करत आहे. तसेच, जे भारतीय नागरिक सध्या इराणमध्ये आहेत, त्यांनी उपलब्ध साधनांद्वारे लवकरात लवकर देश सोडून बाहेर पडावे," असे या अधिकृत पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे इस्रायलने इराणच्या मध्य आणि पश्चिम भागातील लष्करी तळांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे.
यापूर्वी ७ एप्रिल रोजी देखील भारताने आपल्या नागरिकांना पुढील ४८ तास आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर आणि इराणने हॉरमुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) रोखल्याच्या पार्श्वभूमीवर तो निर्णय घेण्यात आला होता. अधिकृत आकडेवारीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणी तळांवर हल्ले करून या संघर्षाची सुरुवात केली तेव्हा इराणमध्ये विद्यार्थ्यांसह सुमारे ९,००० भारतीय नागरिक उपस्थित होते. या भीषण तणावाच्या परिस्थितीतून आतापर्यंत जवळपास १,८०० भारतीय नागरिक सुरक्षितपणे मायदेशी परतले आहेत. उर्वरित भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.