अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सोमवारी (१९ जानेवारी) एका चिनी रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भीषण स्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यात एका चिनी नागरिकासह एकूण ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील उईगर मुस्लिमांवर होणाऱ्या कथित अत्याचाराचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा दावा या दहशतवादी संघटनेने केला आहे.
सोमवारी दुपारी काबूलमधील शहर-ए-नवा या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या व्यापारी भागात हा स्फोट झाला. येथे चायनीज नूडल नावाचे एक हॉटेल असून ते चिनी नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे. हे हॉटेलच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. इसिसने आपल्या टेलिग्राम चॅनेलवर एक निवेदन प्रसिद्ध करून या हल्ल्याची माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "आमच्या एका आत्मघाती हल्लेखोराने हॉटेलमध्ये स्फोटके पेरली होती आणि चिनी नागरिकांची गर्दी असताना त्याचा स्फोट घडवून आणला."
तालिबानच्या पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात ६ अफगाण नागरिक आणि १ चिनी नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. मृत चिनी नागरिकाचे नाव अयुब असे असून तो एका स्थानिक हॉटेलचा मालक होता. या स्फोटात १३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. त्यांना तातडीने काबूलमधील 'इमर्जन्सी' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे अफगाणिस्तानमधील परदेशी नागरिकांच्या, विशेषतः चिनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तालिबानने सत्तेवर आल्यानंतर देशात सुरक्षितता प्रस्थापित केल्याचा दावा केला होता. मात्र, इसिस-खोरासान (ISIS-K) कडून वारंवार होणारे हे हल्ले तालिबानच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. चीनने या घटनेचा तीव्र निषेध केला असून आपल्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.