इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळे भारतात आज राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 2 Months ago
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी

 

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं भारतात उद्या (२१ मे) एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं आज देशभरात भारताचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे. 

केंद्रीय गृहखात्यानं याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशात म्हटलं की, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुःखद प्रसंगी दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहण्यासाठी भारत सरकारनं आज २१ मे रोजी एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

या दुखवट्याच्या दिवशी ज्या सरकारी इमारतींवर नेहमी राष्ट्रध्वज फडकावला जातो तिथं राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाईल. तसेच या दिवशी कोणतेही अधिकृत मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जाणार नाहीत, असंही गृहखात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे.

रविवारी खराब हवामानामुळं इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम राबवण्यात आली. त्यानंतर सोमवारी इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. रईसी यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दुल्लाहियन यांचाही मृत्यू झाला आहे. वरझाघन शहराजवळील डिझमारच्या डोंगराळ जंगलात हा अपघात झाला होता.

कोण होते  इब्राहिम रईसी
इब्राहिम रईसी यांचा जन्म १४ डिसेंबर १९६० मध्ये महशदच्या नोघन जिल्ह्यातील एका मौलवी परिवारात झाला होता. ते पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. इब्राहिम रायसी यांनी आपले प्राथमिक शिक्षण 'जावाहियेह स्कूल'मधून पूर्ण केले. आणि त्यानंतर हौजामध्ये (इस्लामी मदरसा) पुढचे शिक्षण घेतले. १९७५ मध्ये क्यूम सेमिनरीतून आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी रायसी "अयातुल्लाह बोरोजेडी स्कूल"मध्ये दाखल झाले. रईसी यांनी मोताहारी विद्यापीठातून खाजगी कायद्यात डॉक्टरेट पूर्ण केलाचा दावा आहे. मात्र त्यांचा हा दावा विवादित आहे.

कारकिर्दीची सुरुवात
इब्राहिम रईसी यांची १९८५ मध्ये इराणची राजधानी तेहरानचे उप वकील म्हणून निवड करण्यात आली. पुढे १९८८मध्ये त्यांना वकील म्हणून बढती मिळाली.  १९८८ च्या सुरुवातीस, रईसी यांची इराण क्रांतीचे जनक आणि इराणचे संस्थापक रुहोल्लाह खोमेनी यांच्याशी भेट झाली. या भेटीत रईसी यांनी खोमेनी यांना प्रभावित केले. त्यानंतर रईसी यांना लॉरेस्तान, सेमनन आणि केर्मनशाह सारख्या काही प्रांतांमध्ये कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र संस्थेचे प्रमुख केले.

महत्त्वाची पदे
रुहोल्लाह खोमेनी यांच्या मृत्यू नंतर आणि आयातुल्हा खोमेनी यांची इराणचा सर्वोच्च नेता म्हणून निवड झाल्यानंतर रईसी यांना इराणच्या सरकारकडून मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळू लागल्या.  इब्राहिम रईसी यांनी २००४ ते २०१४ या काळात ईराणचे पहिले उपमुख्य न्यायाधीश म्हणून काम केले. २०१४मध्ये ते इराणचे महाधिवक्ता झाले. २०१६पर्यंत ते या पदावर होते. इब्राहिम रईसी यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वोच्च सायबर सुरक्षा परिषद,मॉनेटरी अँड क्रेडिट कौन्सिल आणि भ्रष्टाचारविरोधी मुख्यालयामध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अध्यक्षपदाची पहिल्या निवडणुकीत पराभव
देशात अनेक वर्षे महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या इब्राहिम रईसी यांनी २०१७ मध्ये पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इस्लामिक रिव्होल्यूशनरी फोर्सेस पक्षाकडून पहिल्यांदा इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. पण तरीही यामध्ये त्यांना पराभवास समोरे जावे लागले.

पण पुढे, २०२१ मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इब्राहिम रईसी यांनी अखेर विजय मिळवला. पण या निवडणुकीत रायसी यांनी गैरप्रकार केल्या आरोप झाले होते.