NEPAL FLOODS: मृतांचा आकडा ९०० पार, ४ हजारांहून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरानंतर सहाव्या दिवशीही बचावकार्य सुरू
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरानंतर सहाव्या दिवशीही बचावकार्य सुरू

 

काठमांडू 

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापूर आणि दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा ९०० च्या वर पोहोचला आहे, तर अद्याप चार हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर सुरू असलेली बचाव आणि शोधमोहीम रविवारी सहाव्या दिवशीही युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

गेल्या आठवड्यात हिमालयात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि ग्लेशियर (हिमनदी) कोसळल्यामुळे रसुवा जिल्ह्यातील तिबेट सीमेवडील भूते कोशी नदीला अचानक महापूर आला होता. या महाप्रलयात अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ९०० हून अधिक जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर ४ हजारांपेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चीनच्या सीमेवरील हानी आणि मदतकार्य

चीनच्या हद्दीतही या आपत्तीचा मोठा फटका बसला असून ग्यारोंग काउंटीमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५४६ जण बेपत्ता असल्याचे चायनीज प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नेपाळ आणि चीनच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दल, लष्कर आणि आपत्ती निवारण पथके संयुक्तपणे बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. कठीण भौगोलिक परिस्थिती आणि ढिगाऱ्याखाली अडकलेले नागरिक यामुळे बचावकार्यात मोठी आव्हाने येत असून बाधित कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



Latest News