पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका! युएईचे ३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडण्यासाठी तिजोरी होणार रिकामी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

ताणलेले संबंध आणि आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान या महिन्यात संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) ३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर मोठा धोका निर्माण झाला असून आखाती देशांकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत अनिश्चितता वाढली आहे. राजनैतिक तणावामुळे भविष्यात मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरही संकट आले आहे.

पाकिस्तानची आधीच नाजूक असलेली आर्थिक स्थिती आता अधिक बिकट होत आहे. आखाती भागीदारांसोबतचे संबंध तणावाचे असतानाच पाकिस्तानला युएईला अब्जावधी रुपये परत करावे लागत आहेत. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, इस्लामाबादने या महिन्यात युएईचे ३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकिस्तानवरील आर्थिक दबाव आणि अबुधाबीसोबतच्या बदलत्या संबंधांचे निदर्शक आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून या कर्जाच्या भविष्याबाबत अनिश्चितता होती. पाकिस्तानने हे कर्ज फेडण्यासाठी मोठी मुदतवाढ मागितली होती, मात्र युएईने केवळ अल्प कालावधीसाठी मुदतवाढ दिली होती. यापूर्वी संकटकाळात आखाती मित्रदेश पाकिस्तानला नेहमीच दिलासा देत असत, मात्र यावेळी युएईने घेतलेली भूमिका या परंपरेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

ट्रिब्यूनला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान ही रक्कम एप्रिल महिन्यात टप्प्याटप्प्याने परत करणार आहे. यामध्ये पुढील आठवड्यात ४५० दशलक्ष डॉलर्स, त्यानंतर २ अब्ज डॉलर्स आणि महिन्याच्या अखेरीस १ अब्ज डॉलर्सचा समावेश आहे. या परतफेडीची व्याप्ती आणि वेळ यामुळे परकीय चलन साठ्यावर प्रचंड दबाव येण्याची भीती व्यक्त होत आहे. कर्ज फेडण्यासाठी याच साठ्याचा वापर होण्याची शक्यता आहे.

युएईसोबतच्या अलीकडील तणावामुळे या घडामोडीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या सुरू असलेल्या संघर्षात पाकिस्तानचा कल इराणकडे असल्याचे पाहून अबुधाबीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युएईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इस्लामाबादच्या प्राधान्यक्रमावर आणि वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या वादामुळे २ अब्ज डॉलर्सची स्वतंत्र आर्थिक मदतही धोक्यात आली आहे. राजनैतिक पातळीवरील चुकांचे परिणाम आर्थिक आघाडीवर कसे भोगावे लागतात, हे यातून स्पष्ट होत आहे.