तुर्कियेच्या अध्यक्षपदी रस्सेप तय्यिप एर्दोगन यांची फेरनिवड; पंतप्रधानांनी केले अभिनंदन!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
तुर्कियेचे अध्यक्ष रस्सेप तय्यिप एर्दोगन व पंतप्रधान नरेंद्र मोदी
तुर्कियेचे अध्यक्ष रस्सेप तय्यिप एर्दोगन व पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकत पुन्हा एकदा यश मिळवले. रविवारी दुसऱ्या फेरीसाठी झालेल्या मतदानात एर्दोगन यांना ५२ टक्के मते मिळाली. त्यामुळे आता ते पुढील पाच वर्षे राष्ट्राध्यक्ष राहतील.

एर्गोदन यांना केमाल क्लुचदारोलो या सुधारणावादी नेत्याने आव्हान दिले होते. त्यांना सुमारे ४८ टक्के मते मिळाली. सलग २० वर्षे सत्तेवर असणाऱ्या एर्गोदन यांना यंदा सत्ता गमवावी लागेल असे काहीसे चित्र होते. मात्र, १४ मे रोजी झालेल्या पहिल्या फेरीत त्यांना ४९.५२ टक्के मते मिळाली. तर, क्लुचदारोलो यांना ४४.८८ टक्के मते मिळाली. तिसऱ्या उमेदवाराने पाच टक्क्यांहून थोडी जास्त मते मिळवली होती. कोणालाही आवश्यक ५० टक्के मते न मिळाल्यामुळे दोन आठवडय़ांनी मतदानाची दुसरी फेरी झाली. त्यामध्ये एर्गोदन यांना नि:संशय बहुमत मिळाले. त्यानंतर त्यांनी देशवासीयांचे आभार मानले. मतदानामध्ये जवळपास अडीच कोटी मतदारांनी भाग घेतला होता.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्सेप तय्यिप एर्दोगन यांची तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप तय्यिप एर्दोगन यांचे अभिनंदन! आगामी काळात जागतिक मुद्यांवर आपले द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य वृद्धिंगत होत राहील असा मला विश्वास आहे."