सिडनीमध्ये एका फळवाल्याने आपल्या जीवाची पर्वा न करता हल्लेखोराच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली. बॉन्डी बीचवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत या व्यक्तीने अफाट धाडस दाखवले. झटापटीत हाताला आणि दंडाला गोळ्या लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली आहे.
नेमके काय घडले?
४३ वर्षांच्या या बहाद्दर व्यक्तीचे नाव अहमद अल अहमद असे आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये अहमद यांचे धाडस स्पष्ट दिसते. अहमद पार्क केलेल्या गाड्यांच्या मागे लपले होते. संधी मिळताच त्यांनी धावत जाऊन काळा शर्ट घातलेल्या हल्लेखोराला मागून पकडले. त्याच्या हातातील रायफल हिसकावली आणि त्याला जमिनीवर पाडले.
पोलिसांची माहिती
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी सोमवारी (१५ डिसेंबर २०२५) दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षांचे वडील आणि त्यांच्या २४ वर्षांच्या मुलाने मिळून हा हल्ला केला होता. रविवारी (१४ डिसेंबर) दुपारी बॉन्डी बीचवर ज्यू लोकांचा एक उत्सव सुरू असताना त्यांनी हा रक्तपात घडवला. यात १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या ३० वर्षांतील ही देशातील सर्वात भयानक घटना मानली जात आहे.
कुटुंबीयांचे मनोगत
अहमद यांचे चुलत भाऊ मुस्तफा यांनी '७ न्यूज ऑस्ट्रेलिया'ला सांगितले की, डॉक्टरांनी अहमद यांची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर स्थिर असल्याचे कळवले आहे. मुस्तफा अभिमानाने म्हणाले, "तो एक नायक (हिरो) आहे, शंभर टक्के हिरो आहे. तो अजूनही रुग्णालयात आहे आणि आत नक्की काय सुरू आहे हे आम्हाला माहित नाही, पण तो लवकरच बरा होईल अशी आम्हाला आशा आहे."
जागतिक नेत्यांकडून कौतुक
देश-विदेशातील नेत्यांनी अहमद यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमद यांना "अतिशय शूर व्यक्ती" म्हटले आहे. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले, असे ट्रम्प म्हणाले.
ज्या राज्यात सिडनी आहे, त्या न्यू साऊथ वेल्सचे प्रीमियर ख्रिस मिन्स यांनी अहमद यांना "खराखुरा हिरो" म्हटले आहे. "हा व्हिडिओ म्हणजे मी पाहिलेले सर्वात अविश्वसनीय दृश्य आहे," अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
मदतीचा ओघ
अहमद यांच्या मदतीसाठी 'गो फंड मी' (GoFundMe) या प्लॅटफॉर्मवर एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. अवघ्या काही तासांतच तिथे २ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सपेक्षा (सुमारे १ कोटी ११ लाख रुपये) जास्त रक्कम जमा झाली आहे. अब्जाधीश बिल ॲकमन यांनी सर्वाधिक म्हणजे ९९,९९९ ऑस्ट्रेलियन डॉलर्सची देणगी दिली असून त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर या मदतीचे आवाहनही केले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -