CHINA ETHNIC UNITY LAW: चीनच्या दडपशाहीविरोधात मुंबईत तिबेटी शरणार्थी आक्रमक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 13 h ago
चीनच्या नव्या 'वांशिक एकता कायद्या'विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करताना तिबेटी समुदाय.
चीनच्या नव्या 'वांशिक एकता कायद्या'विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करताना तिबेटी समुदाय.

 

मुंबई

चीनच्या नव्या आणि विवादास्पद 'वांशिक एकता कायद्या'विरोधात (Ethnic Unity Law) मुंबईतील तिबेटी समुदायाने आझाद मैदानावर तीव्र निदर्शने केली. हा कायदा अत्यंत दडपशाहीचा असून याद्वारे तिबेटी भाषा आणि संस्कृती नष्ट करण्याचा बीजिंगचा डाव असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

चीनच्या संसदेने १२ मार्च रोजी मंजूर केलेला हा कायदा १ जुलैपासून लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत चीनमधील सर्व संस्थांमध्ये स्थानिक भाषांऐवजी मॅनारिन (चिनी) भाषा सक्तीची करण्यात आली असून, धार्मिक प्रथांचे 'चिनीकरण' (Sinicisation) करण्यावर भर दिला जात आहे.

मुंबईत तिबेटी शरणार्थींचा तीव्र विरोध

कर्नाटकच्या मुंडगोड आणि महाराष्ट्रातील भंडारा येथील तिबेटी वस्त्यांतून आलेल्या शरणार्थींनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या या आंदोलनात सहभाग घेतला. 'फ्रेंड्स ऑफ तिबेट'चे समन्वयक तेन्झिन त्सुंडुई यांनी सांगितले की, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील हे आंदोलन चीनच्या नव्या नियमाविरुद्ध जगभरात सुरू असलेल्या आंदोलनाचाच एक भाग आहे. यापूर्वी २ ऑगस्ट रोजी मध्य मुंबईतील चैत्यभूमीवरही अशाच प्रकारची निदर्शने करण्यात आली होती.

आंदोलनादरम्यान तिबेटी शहीदांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. तसेच, न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयासमोर चीनच्या या नव्या कायद्याच्या निषेधार्थ स्वतःला पेटवून घेणारे कार्यकर्ते पावो लोबगा रंगझेन (५२) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तिबेटला स्वातंत्र्य मिळवून देण्याची आणि चीनच्या या दडपशाही कायद्याचा निषेध करण्याची मागणी तिबेटी समुदायाने केली आहे.