गाझा पट्टीतील राफा शहर 'यामुळे' जगभर आहे चर्चेत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 25 d ago
जगभर ट्रेंड करत असलेला फोटो
जगभर ट्रेंड करत असलेला फोटो

 

तेल अविव- गेल्या जवळपास सात महिन्यांपासून इस्राइल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. हे युद्ध थांबण्याचे सध्या तरी चिन्ह नाही. इस्राइलला प्रत्युत्तर म्हणून हमासच्या अतिरेक्यांनी चार महिन्यांनी तेल अविववर हल्ला केला होता. त्यानंतर इस्राइलने राफावर हल्ला केला. गेल्या काही दिवसांत इस्राइलने राफावरील हल्ले वाढवल्याचं दिसत आहे.

इस्राइलने राफाला लक्ष्य करण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. तसं पाहिलं तर राफामध्ये अनेकांनी आश्रय घेतला आहे. अनेक लोक कॅम्पमध्ये राहत आहेत. असे असताना इस्राइलने हल्ले सुरुच ठेवले आहेत. राफामधील कॅम्पमध्ये हमासचे दहशतवादी राहत असल्याचा दावा इस्राइलने केला आहे. राफा भौगोलिक आणि राजकीयदृष्या महत्त्वाचा भूभाग आहे. इस्राइलने राफाकडे मोर्चा का वळवलाय हे आपण पाहूया.

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलंय की, इस्राइलचे सैन्य जोपर्यंत राफामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत हमासला संपवणं शक्य नाही. दाव्यानुसार, राफामध्ये हमासचे चार लढाऊ बटालियन तळ ठोकून आहेत. इस्राइलच्या सैन्याने गाझा पट्टीच्या उत्तर आणि मध्य भागात नियंत्रण मिळवलं आहे. आता राफावर हल्ला करुन दक्षिण भाग देखील इस्राइलला ताब्यात घ्यायचा आहे.

गाझा पट्टी ही ४१ किलोमीटर अंतराचा भूभाग आहे. भूमध्य सागराच्या पूर्व किनाऱ्यावरील हा प्रदेश आहे. गाझा पट्टीच्या उत्तर आणि पूर्व भागात इस्राइल आहे. दक्षिणेची सीमा ही इजिप्तशी जोडून आहे. याचा अर्थ गाझा पट्टीला राफा शहर इजिप्तपासून वेगळे करते.

राफामधील क्रॉसिंग महत्त्वाची
राफा शहराच्या दक्षिण भागात अबू सालेम क्रॉसिंग आहे. यावर इस्राइलचे नियंत्रण आहे. राफाचा बराचसा भूभाग डोंगर आणि वाळवंटाचा आहे. यावर मात्र इजिप्तचे नियंत्रण आहे. राफा शहरातील क्रॉसिंग मधून वस्तूंची आयात-निर्यात होत असते. इजिप्त, संयुक्त राष्ट्र किंवा इतर देश याच क्रॉसिंगच्या माध्यमातून गाझामध्ये मदत पाठवत असतात. यात इंधन, गॅस, औषधी आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश असतो.

युद्ध सुरु झाले तेव्हाच इस्राइलने ही क्रॉसिंग बंद केली होती. त्यामुळे गाझा पट्टीला मिळणारी मदत पूर्ण बंद झाली होती. गाझातील लोकांना बाहेरील देशांकडून मदत मिळण्याचे राफा हे एकमेव स्थान आहे. एकप्रकारे राफा ही गाझा पट्टीची जीवनवाहिनी आहे. त्यामुळेच इस्राइल राफावर पूर्ण ताबा मिळवू पाहात आहे.

एनजीओचे सदस्य आणि पासपोर्ट धारक व्यक्ती युद्ध सुरु झाल्यानंतर राफातील क्रॉसिंगमधून बाहेर पडले होते. इस्राइल, इजिप्त आणि हमासमधील करारानंतर ही क्रॉसिंग काही महिन्यापूर्वी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे इस्राइलला राफा शहरावर पूर्ण नियंत्रण पाहिजे आहे. याच कारणामुळे राफामध्येच मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु आहे.