अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या अमेरिका-इस्रायली युद्धात विजयाचा दावा केला आहे. अमेरिकन लष्करी कारवाईने तेहरानची लष्करी ताकद नष्ट केली असून मुख्य धोरणात्मक उद्दिष्टे पूर्णत्वाकडे असल्याने लवकरच हे काम पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
मध्यपूर्वेतील आपल्या योजनांबाबत देशाला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन सैन्य पुढील २-३ आठवडे इराणवर अत्यंत कठोर प्रहार करेल. तसेच त्यांनी पुन्हा एकदा इराणच्या वीज केंद्रांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी इतर देशांना आणि अमेरिकन मित्रराष्ट्रांना 'धैर्य' दाखवण्याचे आवाहन केले असून इराणच्या ताब्यातील हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या जलमार्गाची काळजी घेण्यास सांगितले आहे.
विजयाचा दावा
जगातील पहिल्या क्रमांकाचा दहशतवाद समर्थक देश असलेल्या इराणला लक्ष्य करून अमेरिकन लष्कराने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' सुरू केल्याला फक्त एक महिना झाला आहे, असे सांगत ट्रम्प यांनी रणांगणावर वेगाने विजय मिळवल्याचा दावा केला.
ते म्हणाले, "आज रात्री इराणचे नौदल संपले आहे, त्यांचे हवाई दल उद्ध्वस्त झाले आहे आणि त्यांचे बहुतेक नेते आता मृत पावले आहेत. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सची कमांड आणि कंट्रोल यंत्रणा आम्ही नष्ट करत आहोत. त्यांची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून त्यांचे शस्त्र कारखाने आणि रॉकेट लाँचर्सचे तुकडे-तुकडे केले जात आहेत."
ते पुढे म्हणाले, "आमचे शत्रू हरत आहेत आणि माझ्या अध्यक्षपदाच्या पाच वर्षांप्रमाणेच अमेरिका जिंकत आहे. आता हा विजय पूर्वीपेक्षा मोठा आहे."
युद्ध लवकरच संपवणार
इराणची अमेरिकेला धमकावण्याची किंवा सीमाबाहेर सत्ता गाजवण्याची क्षमता पद्धतशीरपणे मोडीत काढणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. "आज रात्री मला हे सांगताना आनंद होत आहे की, ही मुख्य धोरणात्मक उद्दिष्टे पूर्णत्वाकडे आहेत," असे सांगत त्यांनी अमेरिकन लष्करी उद्दिष्टे लवकरच पूर्ण होतील आणि खूप वेगाने काम फत्ते करू अशी ग्वाही दिली.
इस्रायलसह मध्यपूर्वेतील मित्रराष्ट्रांना या युद्धात कोणतीही दुखापत होऊ देणार नाही किंवा त्यांना अपयशी होऊ देणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. वाटाघाटी अपयशी ठरल्यास युद्ध आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. "पुढील दोन ते तीन आठवड्यांत आम्ही त्यांना पुन्हा 'पाषाण युगात' घेऊन जाऊ, जिथे ते राहण्यास पात्र आहेत," असे ते म्हणाले. कोणताही करार न झाल्यास अमेरिका इराणच्या विद्युत पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
युद्धाची गरज का भासली?
इराणमधील सत्तापालट हे युद्धाचे मुख्य उद्दिष्ट नव्हते, परंतु त्यांच्या मूळ नेत्यांच्या मृत्यूमुळे नेतृत्व बदल आपोआपच घडून आला आहे, असे ट्रम्प यांनी सुचवले. अमेरिकेच्या आणि जगाच्या सुरक्षिततेसाठी इराणविरुद्धचे युद्ध आवश्यक होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. गेल्या काही वर्षांत इराणने केलेल्या विविध हल्ल्यांची यादी वाचून दाखवत ट्रम्प यांनी तिथल्या राजवटीला गुंड आणि खुनी म्हटले. तसेच देशातील आंदोलनांच्या अलीकडील दडपशाहीत हजारो नागरिकांच्या झालेल्या मृत्यूचाही त्यांनी उल्लेख केला. अशा नेत्यांना अण्वस्त्रे मिळवू देता येणार नाही, असे ते म्हणाले.
"मी माझ्या मोहिमेची घोषणा केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच इराणला अण्वस्त्रे कधीही मिळू देणार नाही अशी शपथ घेतली होती. ही धर्मांध राजवट ४७ वर्षांपासून डेथ टू अमेरिका अशा घोषणा देत आहे. मी सत्तेवर येण्यापूर्वीच यावर कारवाई व्हायला हवी होती," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
कासिम सुलेमानीची हत्या आणि बराक ओबामांचा इराण अण्वस्त्र करार रद्द करण्यासारखी पावले आपण उचलल्याचे त्यांनी सांगितले. "मुळात मी ते केले जे इतर कोणताही राष्ट्राध्यक्ष करण्यास तयार नव्हता. त्यांनी चुका केल्या आणि मी त्या सुधारत आहे. माझी पहिली पसंती नेहमीच मुत्सद्देगिरीला होती, परंतु या राजवटीने अण्वस्त्रांचा ध्यास सुरूच ठेवला आणि प्रत्येक कराराचा प्रयत्न फेटाळून लावला," असा दावा त्यांनी केला.
इराण अण्वस्त्रांच्या उंबरठ्यावर
यापूर्वीच्या अमेरिकन हल्ल्यांचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की, "आम्ही ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत ती अण्वस्त्र स्थळे पूर्णपणे नष्ट केली होती." मात्र इराणने इतरत्र आपला कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. तेहरान वेगाने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करत असून अण्वस्त्र विकसित करण्याच्या अगदी उंबरठ्यावर असल्याचे ते म्हणाले. अण्वस्त्रधारी इराण हा असह्य धोका असल्याचे त्यांनी नमूद केले.
तेलाबाबत भूमिका
जागतिक तेल किमतींमधील वाढीसाठी ट्रम्प यांनी इराणला जबाबदार धरले. "व्यापारी तेल टँकर्सवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांमुळे ही दरवाढ झाली आहे," असे ते म्हणाले. मध्यपूर्वेतील तेलावर अवलंबून असलेल्या देशांना स्वतःचे जलमार्ग सुरक्षित करण्याचे आणि या प्रदेशावरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, यूएई, कुवेत आणि बहरीन या प्रादेशिक मित्रराष्ट्रांनी या मोहिमेत मोठी साथ दिल्याचे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले. अमेरिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, अमेरिका ही "ग्रहावरील तेल आणि वायूची प्रथम क्रमांकाची उत्पादक" आहे आणि या संघर्षामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही अडचणी पचवण्याची ताकद देशात आहे.