व्हाईट हाऊसजवळील गोळीबारानंतर ट्रम्प यांची आक्रमक भूमिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेतील व्हाईट हाऊसजवळ एका अफगाण नागरिकाने दोन नॅशनल गार्ड जवानांवर गोळीबार केला. या घटनेनंतर काही दिवसांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एक मोठी घोषणा केली. अमेरिकेची बिघडलेली यंत्रणा पूर्णपणे सुधारण्यासाठी तिसऱ्या जगातील सर्व देशांतून (Third World Countries) होणाऱ्या स्थलांतरावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाचे जागतिक स्तरावर मोठे पडसाद उमटणार आहेत. नोकरी, शिक्षण आणि स्वतःच्या देशातील छळामुळे अमेरिकेत आश्रय घेणाऱ्या लाखो लोकांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. अमेरिकेने तंत्रज्ञानात प्रगती केली असली, तरी स्थलांतर धोरणांमुळे "ती प्रगती आणि अनेकांचे राहणीमान खालावले आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.

ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेची व्यवस्था पूर्णपणे सुधारण्यासाठी मी तिसऱ्या जगातील सर्व देशांतून होणाऱ्या स्थलांतरावर कायमस्वरूपी बंदी घालत आहे. जो बायडेन यांच्या काळात बेकायदेशीरपणे प्रवेश दिलेल्या आणि बायडेन यांच्या ऑटोपेनने (Autopen) स्वाक्षरी केलेल्या अशा लाखो लोकांचा प्रवेश मी रद्द करणार आहे. जे लोक अमेरिकेसाठी 'संपत्ती' (Net Asset) नाहीत किंवा ज्यांचे आपल्या देशावर प्रेम नाही, अशा प्रत्येकाला बाहेर काढले जाईल. नागरिक नसलेल्यांना मिळणारे सर्व सरकारी फायदे आणि सबसिडी बंद केल्या जातील. देशांतर्गत शांतता भंग करणाऱ्या स्थलांतरितांचे नागरिकत्व रद्द केले जाईल. तसेच जे परदेशी नागरिक सार्वजनिक भार बनले आहेत, सुरक्षेला धोका आहेत किंवा पाश्चात्य संस्कृतीशी जुळवून घेत नाहीत, त्यांना हद्दपार केले जाईल."

"बेकायदेशीर आणि त्रासदायक लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी करणे हे या उद्दिष्टांमागे आहे. यामध्ये अनधिकृत आणि बेकायदेशीर ऑटोपेन प्रक्रियेद्वारे प्रवेश दिलेल्यांचाही समावेश आहे," असे ट्रम्प यांनी लिहिले. "केवळ 'रिव्हर्स मायग्रेशन' (परत पाठवणे) हाच या परिस्थितीवरचा एकमेव उपाय आहे. त्याव्यतिरिक्त, सर्वांना थँक्सगिव्हिंगच्या शुभेच्छा! अर्थात, जे लोक द्वेष करतात, चोरी करतात, हत्या करतात आणि अमेरिकेच्या मूल्यांचा नाश करतात त्यांना सोडून... तुम्ही इथे जास्त दिवस राहणार नाही!" असेही त्यांनी पुढे नमूद केले.

वॉशिंग्टनमधील गोळीबार आणि एका जवानाचा मृत्यू

व्हाईट हाऊसपासून काही अंतरावर झालेल्या धक्कादायक गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. एका हल्लेखोराने सॅरा बेकस्ट्रॉम आणि अँड्र्यू वोल्फ या दोन नॅशनल गार्ड जवानांजवळ जाऊन अगदी जवळून गोळीबार केला होता.

या हल्ल्यात २० वर्षीय सॅरा बेकस्ट्रॉम यांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी आज सकाळीच सांगितले, "वेस्ट व्हर्जिनियाच्या सॅरा बेकस्ट्रॉम, ज्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत, त्या अत्यंत आदरणीय, तरुण आणि magnificent व्यक्ती होत्या... त्यांचे निधन झाले आहे. त्या आता आपल्यात नाहीत." २४ वर्षीय वोल्फ यांची प्रकृती चिंताजनक आहे. २०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतल्यानंतर अमेरिकेत आलेल्या २९ वर्षीय रहमानुल्ला लकनवाल या अफगाण नागरिकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्रम्प यांची 'क्रुक्ड जो बायडेन' पोस्ट

स्थलांतरितांना अमेरिकेत प्रवेश देण्याबाबत ट्रम्प प्रशासन नेहमीच कडक भूमिका घेत आले आहे. राजधानीतील या गोळीबाराच्या घटनेने त्यात आणखी भर घातली आहे.


अफगाण नागरिकाची ओळख संशयित म्हणून पटल्यानंतर काही वेळातच, अमेरिकेच्या नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवा विभागाने (USCIS) अफगाण नागरिकांच्या स्थलांतराशी संबंधित सर्व विनंत्यांची प्रक्रिया अनिश्चित काळासाठी थांबवली. "आमच्या देशाचे आणि अमेरिकन जनतेचे संरक्षण आणि सुरक्षा हेच आमचे एकमेव ध्येय आणि मिशन आहे," असे विभागाने स्पष्ट केले.


आपली मोठी घोषणा करण्याच्या काही मिनिटे आधी, ट्रम्प यांनी २०२१ मधील एका लष्करी विमानातून नेल्या जाणाऱ्या अफगाण नागरिकांचा फोटो शेअर केला. "हे अफगाणिस्तानातून झालेल्या भयानक एअरलिफ्टचा (Airlift) भाग आहे. लाखो लोक कोणत्याही तपासणीशिवाय आपल्या देशात घुसले. आम्ही ते ठीक करू, पण 'क्रुक्ड जो बायडेन' आणि त्यांच्या गुंडांनी आपल्या देशाचे काय हाल केले, हे आम्ही कधीही विसरणार नाही," असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.

ट्रम्प यांची संतप्त थँक्सगिव्हिंग पोस्ट

दुसऱ्या एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना थँक्सगिव्हिंगच्या शुभेच्छा दिल्या. "आपला देश विभागला जावा, विस्कळीत व्हावा, त्याचे तुकडे व्हावेत, हत्या व्हाव्यात, मारहाण व्हावी, लुटालूट व्हावी आणि जगातील इतर मूर्ख देशांसोबत आपली थट्टा व्हावी, यासाठी परवानगी देणाऱ्या 'इतक्या चांगल्या' नागरिकांना शुभेच्छा! स्थलांतराच्या बाबतीत केवळ 'पोलिटिकली करेक्ट' राहण्यासाठी आणि निव्वळ मूर्खपणामुळे हे घडत आहे," असे त्यांनी खोचकपणे म्हटले.

अमेरिकेतील परदेशी नागरिकांची संख्या ५ कोटी ३० लाख (५३ दशलक्ष) असून त्यातील बहुतेक लोक "अपयशी राष्ट्रांतून, तुरुंगातून, मनोरुग्णालयातून, टोळ्यांमधून किंवा ड्रग कार्टेलमधून आले आहेत," असे त्यांनी सांगितले.

"देशभक्त अमेरिकन नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रचंड पैशांवर हे लोक आणि त्यांची मुले पोसली जात आहेत. अमेरिकन नागरिक त्यांच्या चांगल्या मनामुळे उघडपणे तक्रार करत नाहीत किंवा कोणताही त्रास देऊ इच्छित नाहीत. आपल्या देशात जे घडले आहे ते ते सहन करतात, पण हे करताना त्यांना आतून खूप त्रास होतोय! ग्रीन कार्ड असलेल्या आणि ३०,००० डॉलर्स कमावणाऱ्या एका स्थलांतरिताला त्याच्या कुटुंबासाठी वर्षाला ५०,००० डॉलर्सचे फायदे मिळतात," असा दावा त्यांनी केला.

"दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात नसलेली सामाजिक दुरावस्था आज या निर्वासितांच्या ओझ्यामुळे अमेरिकेत निर्माण झाली आहे. शाळांची दुरवस्था, वाढलेली गुन्हेगारी, शहरांचा ऱ्हास, रुग्णालयांमध्ये गर्दी, घरांची कमतरता आणि मोठी तूट ही त्याची प्रमुख कारणे आहेत. उदाहरणार्थ, सोमालियातील लाखो निर्वासितांनी एकेकाळी महान असलेल्या मिनेसोटा राज्याचा पूर्णपणे ताबा घेतला आहे," असे त्यांनी शेवटी नमूद केले.