"निदर्शने थांबवू नका, मदत पोहोचतेय", ट्रम्प यांचा इराणला दिलासा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणमधील जनतेला मोठा दिलासा दिला. देशातील धार्मिक राजवटीविरोधात सुरू असलेली निदर्शने पुढेही सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. पुढील आठवड्यात आपण पदभार स्वीकारताच मदत मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रूथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, "इराणमधील शूर आणि दीर्घकाळापासून अन्याय सहन करणाऱ्या लोकांनो: मी तुमच्या पाठीशी उभा आहे."

सध्याच्या अमेरिकन प्रशासनावर टीका करताना ट्रम्प पुढे म्हणाले, "बायडन आणि हॅरिस प्रशासनाने इराणमधील दहशतवादी राजवटीला आतापर्यंत आर्थिक रसद पुरवली आहे. मात्र, २० जानेवारीला हे सर्व थांबेल. तुम्ही निदर्शने करत राहा - मदत तुमच्या वाटेवर आहे!"

इराणचे चलन असलेल्या 'रियाल'ची किंमत सध्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेली आहे. एका अमेरिकन डॉलरच्या बदल्यात रियालची किंमत दहा लाख पेक्षा जास्त झाली आहे. तसेच, देशात विजेची कपात आणि वाढत्या महागाईमुळे ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात इराणविरोधात मॅक्झिमम प्रेशर म्हणजेच अत्याधिक दबावाचे धोरण राबवले होते. त्यांनी अमेरिकेला २०१५ च्या अणुकरारातून बाहेर काढले आणि इराणवर अत्यंत कडक आर्थिक निर्बंध लादले होते.