अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (२ एप्रिल) रात्री उशिरा इराणमधील पूल आणि वीज प्रकल्प उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची ही त्यांची सर्वात मोठी धमकी मानली जात आहे.
"अमेरिकन सैन्याने इराणमध्ये जे काही उरले आहे ते नष्ट करायला अजून सुरुवातही केलेली नाही. आता पूल आणि त्यानंतर वीज प्रकल्प आमचे लक्ष्य असतील," असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. इराणच्या नेतृत्वाला काय करायचे आहे हे ठाऊक आहे आणि ते त्यांना लवकरात लवकर करावे लागेल, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
ट्रम्प यांनी या युद्धाबद्दल यापूर्वी अनेकदा आपली उद्दिष्टे आणि कालमर्यादा बदलली आहे. बुधवारी (१ एप्रिल) दिलेल्या एका दूरदर्शन भाषणात त्यांनी स्पष्ट केले की, इराणने वॉशिंग्टनच्या अटी मान्य न केल्यास हे युद्ध आणखी भडकू शकते. अशा परिस्थितीत इराणचे ऊर्जा आणि तेल प्रकल्पही धोक्यात येऊ शकतात.
दरम्यान, अमेरिकेतील डझनभर आंतरराष्ट्रीय कायदा तज्ज्ञांनी गुरुवारी (२ एप्रिल) एका खुल्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले हे युद्धगुन्हे (War Crimes) ठरू शकतात, असे या पत्रात म्हटले आहे. १९४९ च्या जिनिव्हा करारातील नियमांनुसार, नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणांवर हल्ले करण्यास सक्त मनाई आहे. या कराराच्या प्रोटोकॉलनुसार, लष्करी कारवायांवेळी नागरी मालमत्ता आणि लष्करी लक्ष्यांमध्ये फरक करणे बंधनकारक असून नागरी वस्तूंवर हल्ला करणे निषिद्ध आहे.
"येत्या दोन ते तीन आठवड्यांत आम्ही त्यांच्यावर अत्यंत जोरदार हल्ला करणार आहोत. आम्ही त्यांना पुन्हा अश्मयुगात पाठवू, ते तिथेच राहण्याच्या लायकीचे आहेत," असे प्रक्षोभक विधान ट्रम्प यांनी बुधवारी (१ एप्रिल) आपल्या भाषणात केले होते. वॉशिंग्टन इराणमधील आपली उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या जवळ आहे असे त्यांनी म्हटले असले तरी, हे युद्ध कधी संपणार याबाबत कोणतीही निश्चित वेळ त्यांनी सांगितलेली नाही.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली. याला प्रत्युत्तर म्हणून तेहरानने इस्रायल आणि अमेरिकन लष्करी तळ असलेल्या आखाती देशांवर हल्ले केले. अमेरिका-इस्रायलचे इराणमधील संयुक्त हल्ले आणि इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या कारवायांमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला असून लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत.
या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून जागतिक बाजारपेठ हादरली आहे. २००३ मधील इराकवरील आक्रमणानंतर अमेरिकेचा हा सर्वात मोठा लष्करी हल्ला आहे. ट्रम्प यांच्याकडून येणाऱ्या विसंगत संदेशांमुळे जागतिक चिंता कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.