इराणसोबतचे युद्ध थांबवण्यास अमेरिका तयार; डोनाल्ड ट्रम्प लष्करी मोहीम थांबवण्याच्या तयारीत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

हॉर्मुझची सामुद्रधुनी मोठ्या प्रमाणावर बंद असली तरीही इराणविरुद्धची लष्करी मोहीम संपवण्याची तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले असून अमेरिका आणि इराणमधील युद्धाला आता चार आठवडे पूर्ण झाले आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे या महत्त्वाच्या जलमार्गावर तेहरानची पकड अधिक मजबूत होऊ शकते. तसेच हा मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी भविष्यात अत्यंत गुंतागुंतीची मोहीम राबवावी लागण्याची शक्यता आहे. 

हॉर्मुझची सामुद्रधुनी बळाचा वापर करून खुली करण्याची कोणतीही मोहीम राबवल्यास हा संघर्ष चार ते सहा आठवड्यांच्या अपेक्षित कालमर्यादेपेक्षा अधिक लांबेल, असा अंदाज ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांनी गेल्या काही दिवसांत व्यक्त केला आहे. त्याऐवजी अमेरिकेने आपल्या प्राथमिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावे, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. सक्रिय संघर्ष कमी करण्यापूर्वी इराणचे नौदल कमकुवत करणे आणि त्यांच्या क्षेपणास्त्रांचा साठा कमी करणे, यावर अमेरिकेचा भर असेल. त्यानंतर व्यापार सुरळीत करण्यासाठी तेहरानवर राजनैतिक दबाव आणण्याचे धोरण प्रशासन स्वीकारणार आहे. जर हे राजनैतिक प्रयत्न अपयशी ठरले, तर वॉशिंग्टन आपल्या युरोपीय आणि आखाती मित्रराष्ट्रांना हा जलमार्ग खुला करण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगेल. लष्करी पर्याय अजूनही खुले असले तरी त्यांना सध्या तातडीचे प्राधान्य दिलेले नाही.

गेल्या एका महिन्यात ट्रम्प यांनी या सामुद्रधुनीबाबत विविध भूमिका मांडल्या आहेत. हा मार्ग एका ठराविक मुदतीत खुला न झाल्यास त्यांनी इराणच्या नागरी ऊर्जा पायाभूत सुविधांवर बॉम्बफेक करण्याची धमकी दिली होती. तर काही वेळा त्यांनी या मार्गाचे महत्त्व कमी लेखत ही सामुद्रधुनी बंद असणे ही इतर देशांची समस्या असल्याचे म्हटले होते. सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून इंधनाचे दर वाढत आहेत. अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांसह अनेक देश ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्ययाचा सामना करत आहेत. शेतीसाठी लागणारी खते किंवा सेमीकंडक्टर उत्पादनासाठी लागणारा हेलिअम यांसारख्या कच्च्या मालावर अवलंबून असलेले उद्योग देखील टंचाईला तोंड देत आहेत.

इराणने अमेरिकेचे शांतता प्रस्ताव अवास्तव असल्याचे ठरवून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यानंतर ट्रम्प यांनी सोमवारी इशारा दिला की, इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास अमेरिका इराणचे ऊर्जा प्रकल्प आणि तेलाच्या विहिरी उद्ध्वस्त करेल. इस्रायली लष्कराने सोमवारी येमेनमधून आलेले दोन ड्रोन पाडल्याचे सांगितले. इराणशी संबंधित हुथी सैन्याने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागून या युद्धात प्रवेश केल्याच्या दोन दिवसांनंतर ही घटना घडली. लेबनॉनच्या हिजबुल्लाहने देखील इस्रायली भूभागावर रॉकेट डागले आहेत. प्रत्युत्तरादाखल इस्रायली दलांनी तेहरानमधील लष्करी तळांवर आणि बैरूत मधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.

तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधून डागलेले एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तुर्कीच्या हवाई हद्दीत घुसले होते. नाटोच्या हवाई संरक्षण यंत्रणेने भूमध्य समुद्रात ते पाडले. संघर्ष सुरू झाल्यापासूनची ही चौथी घटना आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेले हे युद्ध आता महिनाभर लांबले असून ते संपूर्ण प्रदेशात पसरले आहे. यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला असून ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. इराण अजूनही या युद्धात नमण्यास तयार नसल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.