अमेरिकेने 'TRF'ला घोषित केले दहशतवादी संघटना; भारताने केले स्वागत

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
अमेरिकेने 'TRF'ला घोषित केले दहशतवादी संघटना
अमेरिकेने 'TRF'ला घोषित केले दहशतवादी संघटना

 

अमेरिकेने आज पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी गटाच्या 'द रेसिस्टन्स फ्रंट' (TRF) या सहयोगी संघटनेला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. पहलगाम हल्ल्यामागे याच संघटनेचा हात होता. भारताने अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अमेरिकेची कारवाई आणि भूमिका

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे सचिव मार्को रुबिओ यांनी गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले, ही कारवाई पहलगाम हल्ल्यातील न्याय मिळवण्याच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाची अंमलबजावणी करण्याची अमेरिकेची कटिबद्धता दर्शवते. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. 'द रेसिस्टन्स फ्रंट'ने (TRF) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, परंतु भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली.

भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) TRF चा प्रमुख शेख सज्जाद गुल याला या हल्ल्याचा सूत्रधार म्हणून ओळखले आहे. रुबिओ यांनी सांगितले, परराष्ट्र विभागाने TRF ला परदेशी दहशतवादी संघटना (FTO) आणि विशेष नामित जागतिक दहशतवादी (SDGT) म्हणून घोषित केले आहे.

रुबिओ म्हणाले, "TRF आणि इतर संबंधित नावांना लष्कर-ए-तोयबाच्या FTO आणि SDGT च्या पदनामात समाविष्ट केले आहे. परराष्ट्र विभागाने लष्कर-ए-तोयबाचे FTO पदनाम देखील कायम ठेवले आहे." TRF विरुद्धची ही कारवाई ट्रम्प प्रशासनाची राष्ट्रीय सुरक्षा हिताचे रक्षण करण्याची, दहशतवादाचा सामना करण्याची आणि पहलगाम हल्ल्यातील न्याय मिळवण्याच्या अध्यक्षांच्या आवाहनाची अंमलबजावणी करण्याची कटिबद्धता दर्शवते.

परराष्ट्र सचिवांनी पुढे सांगितले, "हा (पहलगाम) हल्ला २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवरील सर्वात प्राणघातक हल्ला होता. TRF ने भारतीय सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांची जबाबदारीही स्वीकारली आहे, ज्यात अलीकडील २०२४ मधील हल्ल्यांचा समावेश आहे."

भारताने केले अमिरीकेच्या निर्णयाचे स्वागत

अमेरिकेने पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी गटाच्या 'द रेसिस्टन्स फ्रंट' (TRF) या सहयोगी संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे भारताने शुक्रवारी स्वागत केले.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी वॉशिंग्टनच्या या निर्णयाचे वर्णन भारत-अमेरिका दहशतवादविरोधी सहकार्याची "प्रभावी पुष्टी" असे केले. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या सहयोगी संघटनेला (TRF) घोषित केल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचे विशेष कौतुक केले.

 

परराष्ट्रमंत्री म्हणाले, "@SecRubio आणि @StateDept चे TRF ला - लष्कर-ए-तोयबाची (LeT) सहयोगी संघटना - परदेशी दहशतवादी संघटना (FTO) आणि विशेष नामित जागतिक दहशतवादी (SDGT) म्हणून घोषित केल्याबद्दल कौतुक करतो. त्यांनी २२ एप्रिल रोजीच्या पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती."

 

पूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले, ते TRF ला नामित परदेशी दहशतवादी संघटना (FTO) आणि विशेष नामित जागतिक दहशतवादी (SDGT) म्हणून समाविष्ट करत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हेही नमूद केले, TRF ने २६ नागरिकांचा बळी घेणाऱ्या पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. "हा २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवरील सर्वात प्राणघातक हल्ला होता," असे त्यांनी म्हटले. "TRF ने भारतीय सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांची जबाबदारीही स्वीकारली आहे, ज्यात अलीकडील २०२४ मधील हल्ल्यांचा समावेश आहे," असेही त्यांनी सांगितले.

पहलगाम हल्ल्याला भारताचे प्रत्युत्तर

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर मे महिन्यात, भारताच्या सात बहु-पक्षीय शिष्टमंडळांनी वॉशिंग्टनसह ३३ जागतिक राजधान्यांना भेट दिली. पाकिस्तानच्या दहशतवादाशी असलेल्या संबंधांवर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचा उद्देश या भेटींमागे होता.