अलीकडे ई-बाईक्सची प्रचंड क्रेझ वाढली आहे. इलेक्ट्रिक म्हणून ती परवडणारी असली तरी ती विकत घ्यायला बऱ्याचदा परवडत नाही. शिवाय आधीच्या गाडीचे करायचे काय हाही प्रश्न असतोच. अशातच नवी गाडी न घ्यावी लागता जुन्याच गाडीचा कायापालट ई-बाईकमध्ये करून मिळाला तर...? असा कायापालट घडवून आणणारा एक किमयागार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या दानिश चावडा या किमयागार तरुणाने या सर्व प्रश्नांवर एक नामी उपाय शोधला आहे. जाणून घेऊ या ह्या मुस्लिम तरुणाविषयी आणि त्याच्या किमयेवषयी...
दरवर्षी हजारो दुचाकी मुदत संपल्याने भंगारात निघतात; तसेच अनेकांना पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीऐवजी आता ई-बाईक हवी असते. ग्राहकांच्या याच गरजांचा अभ्यास करून दानिशने एक स्टार्टअप थाटले. भंगारात निघालेल्या गाड्या, तसेच पेट्रोलवर चालणाऱ्या सुस्थितीतील दुचाकी इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये - अर्थात् ई-बाईकमध्ये - रूपांतरित करणाऱ्या या स्टार्टअपचे नाव आहे 'हावर एंटरप्राइजेस'. या स्टार्टअपच्या माध्यमातून कोणतीही दुचाकी दानिश इलेक्ट्रिक गाडीत रूपांतरित करतो. त्याच्या या प्रयोगाला सुयश मिळालं आहे. आता ट्रेड सर्टिफिकेशनसाठी त्याने अर्ज केला आहे.
दानिशच्या आई नीलम सालवी गावी शेतीची कामे बघतात. या एकल मातेने फार संघर्षातून दानिशचे शिक्षण पूर्ण केले आहे. खुलताबादच्या (जिल्हा : छत्रपती संभाजीनगर) 'कोहिनूर कॉलेज'मधून दानिशने बी. कॉम केले. त्याअगोदर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा'तून त्याने ऑटोमोबाइलमध्ये आयटीआय, तसेच ईव्ही कोर्स केला. याबरोबरच त्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे (एआय) प्रमाणपत्रही मिळवले आहे.
कोरोनानंतर बाजारात नवीन पेट्रोलवाहनांच्या किमती प्रचंड वाढल्या; तसेच ईव्ही वाहनांच्या किमतीसुद्धा अनेकांच्या आवाक्याबाहेर आहेत. यावर दानिशने उपाय शोधत, ज्यांच्याकडे भंगाराच्या अवस्थेतील अथवा जुनी; पण सुस्थितीतील दुचाकी असेल ती इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचे काम सुरू केले.
सुरुवातीला त्याने दोन दुचाकी तयार केल्या. या दुचाकींमध्ये त्याने केलेले बदल यशस्वी झाले. त्यांची रस्त्यावरील चाचणीसुद्धा यशस्वी झाली आणि त्याच्या कामाला वेग आला. दानिशने वाळूज येथे छोटा प्लॅंट तयार केला आहे. तेथे वेल्डिंग-कटिंगसाठीची सुविधा, हॅंड ग्रँड आणि ड्रिल मशिन यांच्या साह्याने दुचाकींचा कायापालट केला जातो.
अनेक सुरक्षा फीचर्सचा समावेश
स्वतः तयार केलेल्या ई-बाईकविषयी दानिश सांगतो, "मी जुन्या दुचाकीचे इंजिन आणि पेट्रोलची टाकी काढून त्या दुचाकीचे रूपांतर ई-बाईकमध्ये करतो. तयार झालेल्या दुचाकीच्या पार्ट्सची वर्षभराची वॉरंटीही देतो. या ई-बाईकमध्ये मोटार, शॉर्टसर्किट स्विच, मदरबोर्ड, बजेटनुसार बॅटरी देण्यात आली आहे. एका चार्जिंगमध्ये ही दुचाकी ७० किलोमीटर चालते. स्कूटीसाठी चार, तर बाईकला पाच बॅटरीज् लावण्यात आल्या आहेत. ज्यांना जास्त ॲव्हरेज हवं असतं त्यांच्यासाठी जास्त किमतीच्या बॅटरीज् ही मी बसवून देतो."
'या दुचाकीत सुरक्षाविषयक फीचर्सही आहेत. शॉर्ट सर्किट झालं तर एमसीबी ड्रिप होते. ग्राहकांच्या बजेटनुसार डिस्प्लेही लावलेले आहेत. ही दुचाकी घरी किंवा कुठेही चार्ज करता येते. तिला रिमोट सेन्सर लावल्यामुळे गाडीला कोणी हात जरी लावला तरी लगेच अलार्म वाजतो आणि चोरीची शक्यता कमी होते. ग्राहकांना या दुचाकींसाठी साधारणतः ५० ते ६० हजारांचा खर्च येतो. बुलेट असेल तर त्यासाठी आणखी थोडा जास्त खर्च आहे. या दुचाकीला तीन गिअर आहेत. चौथा गिअर हा रिव्हर्स आहे," दानिश सांगतो.
जुन्या गाड्यांमध्ये नवीन फीचर्स समाविष्ट करून जुन्याची आणि नव्याची सांगड घालण्याचा दानिशचा प्रयत्न आहे. त्याने बनवलेल्या गाड्यांमध्ये अलार्म सिस्टिम, रिव्हर्स गिअर, लॉक-अनलॉक सेन्सर, डिस्प्ले, थ्री गिअर इत्यादी फीचर्स आहेत.
"पुढे तू आणखी कोणकोणते फीचर्स समाविष्ट करू इच्छितोस?" असे विचाल्यावर दानिश सांगतो, "पुढे या दुचाकींसाठी मी पाॅवर बँक बनवणार आहे. या पाॅवर बँकला थ्री पिन प्लग असेल; जेणेकरून गाडी वापरणाऱ्याला सहज कुठेही बॅटरी चार्ज करता येईल. तसेच, रिव्हर्स कॅमेरा, सोलर पॅनल यांचाही समावेश करण्याचा माझा प्रयत्न आहे."
कमी किमतीत उत्तमोत्तम ई-बाईक कशी तयार होईल यावर दानिशचा भर आहे. स्पोर्ट्स बाईक, स्कूटी अशा विविध गाड्यांचे रूपांतर दानिश ई-बाईकमध्ये करतो. टेस्ट ड्राइव्हसाठी त्याने काही गाड्याही बनवून ठेवल्या आहेत. ई-बाईकच्या क्षेत्रात स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी दानिश सातत्याने ऑनलाईन अभ्यासही करत असतो. त्याच्या संशोधनपर कामाला 'आवाज'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!