रत्ना जी. चोत्रानी
केवळ एक साधी गृहिणी असण्यापासून ते एका बंद पडत चाललेल्या कंपनीला पुन्हा जिवंत करण्यापर्यंतचा, झीनत बेगम यांचा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा हा प्रवास देशभरातील तरुण महिला उद्योजकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. देशातील पहिल्या 'सेल्फ-मेड शी-इओ' (महिला मुख्य कार्यकारी अधिकारी) पैकी असलेल्या झीनत यांनी हैद्राबादमधील मेहदीपटनमच्या अंतर्गत भागात असलेल्या अत्तातूरच्या गल्ल्यांमधून खरोखरच एक मोठा टप्पा पार केला आहे.
उर्दू माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचा विवाह एका हॉटेल मॅनेजरशी लवकर झाला. ज्यांच्या हातातील चाव्या नेहमी स्टोअररूम, बँक्वेट हॉल आणि डिनर शिफ्टच्या वजनाने वाजत असायच्या. त्यांना स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यांपेक्षा हॉटेलमधील टेबल कधी भरणार याची उत्तम माहिती असायची. त्यांचे आयुष्य अत्यंत शिस्तबद्ध, मर्यादित आणि गृहीत धरण्यासारखे सोपे होते.
झीनत यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. कोणत्याही अभिमानी पालकांप्रमाणेच झीनत आणि त्यांच्या पतीने आपल्या मुला-मुलीचे विवाह करून दिले. यानंतर वडिलांनी काम करणे बंद केले होते. पूर्वीच्या असंख्य पालकांप्रमाणेच त्यांच्याही मनात एक सुप्त आशा होती, की त्यांचा मुलगा आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांची काळजी घेईल.
परंतु नशिबाचे खेळ वेगळेच असतात. मुलगा आणि त्याची पत्नी अमेरिकेला निघून गेले. ज्या दिवशी मुलगा गेला, त्या दिवशी झीनत यांच्या पतीने त्याला विमानतळावर मिठी मारली आणि जेव्हा ते घरी परतले, तेव्हा ते आतून पूर्णपणे खचले होते. अचानक घर रिकामे वाटू लागले आणि भविष्याचे ओझे अधिक जड वाटू लागले.
कोणतीही नोकरी आणि उत्पन्न नसल्यामुळे झीनत यांचे पती खिडकीपाशी बसून रस्त्याकडे पाहत राहायचे. त्यांनी आपल्या शर्टच्या घड्या तपासणेही बंद केले होते. कोणत्या दिशेला जावे हे पतीला समजत नव्हते. चाळीस लोकांच्या स्वयंपाकघरावर हुकूम गाजवणारा हा माणूस दिवसेंदिवस स्वतःमध्येच कसा आक्रसत चालला आहे, हे झीनत उघड्या डोळ्यांनी पाहत होत्या. शेवटी एका शेजाऱ्याने त्यांना आशेचा किरण दाखवला. तुम्ही मलबार परोठे का विकत नाही? असा सल्ला शेजाऱ्याने दिला.
पतींनी या कल्पनेवर लगेच उडी घेतली. त्यांनी घरोघरी आणि गल्लोगल्ली जाऊन परोठे विकण्यास सुरुवात केली. परोठ्यांची विक्री सुरू झाली. व्यवसाय चांगला चालला. व्यवसाय इतका चांगला चालला की त्यांनी हजारो रुपयांची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात कच्चा माल खरेदी केला. त्यानंतर त्यांच्या शरीराने साथ देणे सोडले. त्यांना काम करणे पुढे जमत नव्हते. विक्री न झालेल्या पिठाचा डोंगर आणि मनात दाटलेली शंका घरात जमा झाली होती.
नेमक्या याच वेळी झीनत यांनी पुढाकार घेतला. त्यांनी खांद्याला पिशवी लावली आणि कामाला सुरुवात केली. एक-एक करत घरोघरी जाऊन त्यांनी कवाडे ठोठावली. त्यांनी काही परोठे विकले. घाम आणि तहान सोबतीला घेऊन दिवस सरत गेले. काही दिवसांनंतर त्यांच्या एका नातेवाईकाने मदतीचा हात पुढे केला. नफ्यातील काही वाटा घेण्याच्या अटीवर त्याने स्वतःच्या रिक्षातून त्यांना फिरवण्याची तयारी दर्शवली. त्यांनी या गोष्टीला होकार दिला.
लवकरच झीनत यांचे पतीही कामावर परतण्याइतके बरे झाले. झीनत यांनी रिक्षाचे मार्ग सांभाळले. पतींनी दुकाने आणि मॉल्सची जबाबदारी घेतली. पण संकट जसे नेहमी येते, तसेच ते पुन्हा आले. झीनत यांना रिक्षामधून फिरवणाऱ्या त्या नातेवाईकाने नफ्यात ३५ टक्क्यांऐवजी ५० टक्क्यांचा अर्धा हिस्सा मागितला. झीनत यांनी याला स्पष्ट नकार दिला. आपले पतीही काम करत असून त्यांनाही त्यांचा हिस्सा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
त्या माणसाने आपली रिक्षा काढून घेतली. या घटनेमुळे हे दोघे संपून जातील, असे त्याला वाटले होते. परंतु झीनत आणि त्यांच्या पतीच्या बाबतीत असे घडले नाही. ते थेट एका उत्पादकाकडे गेले आणि त्यांनी डीलरशिप मागितली. तो तयार झाला. व्यवसायाने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला. त्यांचे परोठे मोठ्या दुकानांमध्ये आणि मॉल्समध्ये पोहोचू लागले. त्यानंतर तो उत्पादक आजारी पडला.
अशा वेळी कोणत्याही संकटातून मार्ग काढणारे लोक जे करतात, तेच झीनत आणि त्यांच्या पतीने केले. त्यांनी स्वतःचा ब्रँड सुरू केला. 'मलबार परोठा ९९' चा जन्म झाला. परंतु दुर्दैवाचा फेरा अजून संपला नव्हता. त्यांच्या पतीचे निधन झाले. बहुतांश कहाण्या इथेच संपतात. पण त्यांची कहाणी संपली नाही.
त्यांची मुलगी मदतीसाठी पुढे आली. त्यांच्या जावायाने व्यवसायाची खाती आणि सासूच्या हातावरील कष्टाच्या जखमा पाहिल्या. "अम्मा, आता इतरांच्या रिक्षांमधून फिरणे बंद", असे म्हणत त्यांनी व्यवसायात गुंतवणूक केली. त्यांच्या घरातील या छोट्या व्यवसायाला आता मोठी ताकद मिळाली होती.
आज ते दिवसाला मऊ आणि तुपाचा सुवास असलेले १,८०० ते २,००० परोठ्यांचे पॅकेट्स विकतात. त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. झीनत यांनी आपल्या जुन्या ओळखींचा वापर केला. हॉटेल्स, कॅन्टीन आणि छोटे व्यापारी यांच्याशी संपर्क साधला. नफ्याचे प्रमाण कमी असेल, पण ऑर्डर्स खूप वाढल्या आहेत.
पिठ मळण्याचे यंत्र फिरत असताना त्यांच्या छोट्या कारखान्यात पीठ आणि तुपाचा सुंदर सुवास दरवळत असतो. त्यांनी १५ पेक्षा जास्त लोकांना कामावर ठेवले आहे. त्यांना परोठा थापणे, घड्या घालणे आणि संयम ठेवण्याची कला त्यांनी शिकवली आहे. झीनत उत्पादित झालेल्या पहिल्या तुकडीची स्वतः चाचणी घेतात. जर परोठ्याचे पदर पुस्तकाच्या पानांकारखे सुटे झाले नाहीत, तर त्या तो माल परत पाठवतात.
आता अनेक वर्षे उलटून गेली आहेत. 'मलबार परोठा ९९' आता अनेक जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये पोहोचला आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांमधून त्यांना सोने खरेदी करायचे नाही किंवा मोठे घरही बांधायचे नाही. त्यांना फक्त स्वतःची ही कहाणी पुस्तकरूपाने लिहायची आहे. शून्यातून विश्वाची निर्मिती करणारी कहाणी. आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांना वृद्ध माता-पित्यांसाठी एक वृद्धाश्रम उभा करायचा आहे.
त्यांच्यासारख्याच पालकांसाठी, जे मुलांची वाट पाहत तिथेच थांबले आहेत. कारण कधीकधी मुलगा सोबत राहत नाही, पण स्वतःची ताकद नेहमी सोबत राहते, हे झीनत यांना चांगले ठाऊक आहे. "जेव्हा तुमच्याकडे काहीच नसते, तेव्हा तुम्हाला एका रुपयाची खरी किंमत कळते. आणि जेव्हा तुमच्याकडे सर्व काही असते, तेव्हा तुम्हाला दुसऱ्या महिलेच्या भुकेची किंमत समजते", असे झीनत लिहितात.
जर तुमच्याकडे दीर्घकाळ टिकून राहण्याचा संयम आणि सहनशीलता असेल, तर ध्येयापर्यंत पोहोचणे सोपे होते. यशासाठी मारलेली धावपळ तुम्हाला समजण्यापलीकडे मोठा बळी घेत असते, हाच या प्रवासाचा मुख्य संदेश आहे.