मंदाकिनी मिश्रा, रायपूर
छत्तीसगडमधील दुर्ग शहरात 'केलाबाडी' नावाची एक छोटी वस्ती आहे. या वस्तीतील अरुंद गल्ल्यांमध्ये नऊ वर्षांची एक चिमुकली मुलांसोबत हॉकी खेळताना दिसायची. तिच्याकडे ना महागडे शूज होते, ना स्वतःची हॉकी स्टिक. आपल्या मोठ्या भावाची जुनी, तुटलेली स्टिक टेप लावून चिटकवायची आणि ती मैदानात उतरायची. तिचे वडील स्थानिक मशिदीत अजान द्यायचे. घरची परिस्थिती इतकी बेताची होती की, कधी कधी एका वेळची चूल पेटणेही कठीण व्हायचे.
जेव्हा या मुलीने हॉकीला आपले ध्येय बनवले, तेव्हा समाजाने टोमणे मारायला सुरुवात केली. "मुलगी असून निकर घालून खेळणार का?" असे प्रश्न विचारले गेले. पण वडिलांनी मनोमन ठरवले होते की, त्यांची मुलगी स्वतःचे नशीब स्वतःच लिहिणार. धुळीने माखलेल्या गल्ल्यांमधून बाहेर पडून संपूर्ण जगाच्या क्रीडांगणांवर भारताचा तिरंगा फडकवणाऱ्या या मुलीचे नाव आहे – सबा अंजुम करीम.

गुळ-फुटाण्यांच्या मोहातून सुरू झाला खेळ
भारतीय महिला हॉकी संघाची वेगवान फॉरवर्ड राहिलेली सबा अंजुम सांगते, "जेव्हा मी खेळायला सुरुवात केली, तेव्हा घराची आर्थिक स्थिती अजिबात चांगली नव्हती. माझे अब्बा मशिदीत अजान द्यायचे आणि अम्मी घराचा खर्च चालवण्यासाठी कामावर जायची. एकदा मैदानात उन्हाळी शिबीर (समर कॅम्प) आयोजित करण्यात आले होते. तिथे खेळ संपल्यानंतर मुलांना गुळ आणि फुटाणे मिळायचे. केवळ ते खाण्याच्या ओढीने मी खेळायला सुरुवात केली."
"याच विचाराने मी मैदानात पाऊल ठेवले. त्यानंतर तिथे एक धावण्याची स्पर्धा झाली, त्यात मी पहिला क्रमांक पटकावला. बक्षीस म्हणून मला एक नवी हॉकी स्टिक मिळाली. तिथूनच मला पुढे खेळण्याची खरी प्रेरणा मिळाली. पुढे शाळेकडून आम्ही 'नेहरू हॉकी टूर्नामेंट' खेळायला गेलो आणि तिथूनच माझी भारतीय संघात निवड झाली. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही. १९९९ मध्ये मी नेहरू हॉकी कप खेळले आणि २००२ ते २०१२ या काळात भारतीय संघाची नियमित सदस्य राहिले. या प्रवासात मला भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा मानही मिळाला," असे ती अभिमानाने सांगते.

जेव्हा प्रशिक्षकांनी संघाबाहेर काढले...
१२ जून १९८५ रोजी जन्मलेल्या सबाने आपल्या आयुष्यातील एक आठवण सांगितली. १९९७मध्ये एका सामन्यादरम्यान प्रशिक्षकांनी तिला मैदानाबाहेर बसवले होते. त्यानंतर ते तिला संघात पुन्हा संधी द्यायला तयार नव्हते. त्यावेळी सबाचे वय अवघे ११ वर्षे होते. तेव्हा तिचे वडील स्वतः प्रशिक्षकांकडे गेले आणि त्यांनी आपल्या मुलीला आणखी एक संधी देण्याची विनंती केली.
"तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. माझे अब्बा माझ्या भविष्यासाठी प्रशिक्षकांकडे रदबदली करत होते. या घटनेने मला सतत खेळत राहण्याची आणि पुढे जाण्याची मोठी प्रेरणा दिली. त्याच दिवसापासून माझ्या आयुष्यात खरा बदल झाला," असे सबा सांगते.

समाजाचे अडथळे आणि कुटुंबाची साथ
पद्मश्री सबा अंजुम आठवणींना उजाळा देत म्हणते, "लहानपणी जेव्हा मी खेळून घरी परतत असे, तेव्हा अब्बा मशिदीत कामात असायचे. मी मशिदीबाहेर त्यांची वाट पाहत बसायचे. ते बाहेर आल्यावर मला काजू-बेदाणे किंवा काहीतरी खायला मिळवून देतील, अशी मला खात्री असायची. ही आठवण आजही माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे."
अर्जुन पुरस्कार विजेती सबा सांगते की, मुस्लिम कुटुंबातून असल्याने सुरुवातीला थोडा सामाजिक विरोध झाला. पण तिचे आई-वडील खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. "जेव्हा माझी भारतीय संघात निवड झाली, तेव्हा पासपोर्ट बनवण्यासाठी पैशांची मोठी अडचण होती. आर्थिक स्थिती इतकी खालावली होती की, माझी अम्मीने घरातील भांडी विकून माझा पासपोर्ट बनवला. माझ्या पालकांनी माझ्यासाठी जो त्याग केला, त्याची मला आजही पूर्ण कल्पना नाही," अशा शब्दांत तिने आपल्या पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

मैदानापासून खाकी वर्दीपर्यंतचा प्रवास
हॉकीच्या मैदानावर आपली चमक दाखवल्यानंतर, भारत सरकारने तिला २०१३मध्ये 'अर्जुन पुरस्कार' आणि २०१५मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले. छत्तीसगड सरकारने तिच्या यशाची दखल घेत तिला पोलीस दलात नोकरी दिली. आज सबा पोलीस उपअधीक्षक (ASP) म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
जेव्हा ती गणवेश घालून बाहेर पडते, तेव्हा ती केवळ एक अधिकारी नसते, तर गरिबीत जगणाऱ्या हजारो मुलींसाठी आशेचा एक किरण असते. ज्या दुर्गच्या मैदानात तिला टोमणे मारले गेले, आज त्याच मैदानावरून जाताना लोक तिला अभिमानाने सलाम ठोकतात.

सबा अंजुमची कारकीर्द
सबा अंजुम यांनी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी, म्हणजेच २०००मध्ये हाँगकाँग येथे आयोजित अंडर-१८ एएचएफ कपमधून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला दिमाखात सुरुवात केली. २००२ च्या मॅनचेस्टर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघात त्या सर्वात तरुण खेळाडू होत्या, ज्यातून त्यांच्यातील अफाट कौशल्याची जगाला ओळख झाली. त्यानंतर २००६च्या मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले.
आशियाई स्तरावर आपली चमक दाखवताना त्यांनी २००४च्या आशिया चषकात सुवर्णपदक, तर २००६ च्या दोहा आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीत त्यांनी २०० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेऊन तब्बल ९२ गोल करण्याचा मोलाचा विक्रम प्रस्थापित केला.
त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना २०१३मध्ये 'अर्जुन पुरस्कार' आणि २०१५ मध्ये 'पद्मश्री' या देशाच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले. याव्यतिरिक्त, छत्तीसगड राज्याचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मानला जाणारा 'गुंडाधूर सन्मान' देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
हे ही वाचा : निखत जरीन : जागतिक बॉक्सिंग रिंगमध्ये भारताचे नाव कोरणारी चॅम्पियन
युवा खेळाडूंना सबाचा संदेश
सबा अंजुम आजच्या तरुणांना एक स्पष्ट संदेश देते, "तुम्ही जे काही काम कराल – मग तो खेळ असो किंवा अभ्यास – आधी स्वतःची क्षमता ओळखा. त्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने मेहनत करा. मेहनतच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ओळख मिळवून देते. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. केवळ कष्ट आणि जिद्दीनेच तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रगती करू शकता."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter