अदीबा अली : प्रवास व्हिलचेअर ते सुवर्णपदकाचा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
अदीबा अली
अदीबा अली

 

ओनिका माहेश्वरी

दिल्लीच्या निजामुद्दीन वस्तीमधील अरुंद गल्ल्या, जिथे इतिहासाचे पडसाद आणि आधुनिक जीवनाचा गोंगाट एकत्र नांदतो, तिथेच राहते १९ वर्षांची अदीबा अली. या मुलीने अत्यंत कठीण शारीरिक मर्यादांवर आणि एका भीषण अपघाताच्या मानसिक धक्क्यावर मात करून नेमबाजीच्या (Shooting) जगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

ही कहाणी आहे युवा पॅरा-ऍथलीट अदीबा अलीची. ती केवळ पॅरा-शूटिंगच्या जगातील उगवता तारा नाही, तर स्वतःला असहाय्य समजून नैराश्यात जगणाऱ्या अनेकांसाठी एक प्रेरणास्थान आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये भोपाळ येथील मध्य प्रदेश राज्य शूटिंग अकादमीत झालेल्या २६ व्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये अदीबाने आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांना थक्क केले.

तिने दुहेरी यश संपादन केले: ५० मीटर पिस्तूल (IPC) मिक्स्ड SH1 ज्युनियर प्रकारात ४६७ गुणांसह सुवर्णपदक आणि १० मीटर एअर पिस्तूल (IPC) ज्युनियर महिला SH1 प्रकारातही सुवर्णपदक पटकावले. अदीबाचे हे यश म्हणजे केवळ दोन पदके जिंकण्याची गोष्ट नाही; तर ही चिकाटीची एक अशी कहाणी आहे, जिने अपंगत्वाला अडथळा न मानता, स्वतःची एक नवी ओळख बनवले आहे.

अदीबाच्या यशाची कहाणी जितकी गौरवशाली आहे, तितकाच त्यामागचा संघर्ष हृदयद्रावक आहे. पाच वर्षांपूर्वी एका दुर्दैवी अपघाताने तिच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली.

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ती आपल्या चौथ्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून बाहेर पाहत होती. अचानक तिचा पाय घसरला आणि ती थेट तळमजल्यावर पडली. या भीषण अपघातात तिच्या पाठीचा कणा (Spine) तुटला. तिचे पाय संवेदनाहीन झाले आणि निकामी झाले.

तो क्षण आठवून तिची आई, रेश्मा अली भावूक होतात. त्या सांगतात की, अपघातानंतर त्या सर्वांचे आयुष्य जणू थांबलेच होते. "अदीबा दीड वर्ष अंथरुणाला खिळून होती. तिने सर्व हिंमत गमावली होती, जणू आयुष्यातील सर्व उत्साहच संपला होता."

खेळाची आवड असलेली आणि सतत सक्रिय राहणारी मुलगी व्हिलचेअरवर मर्यादित झाली होती. हे दृश्य कुटुंब आणि नातेवाईकांसाठी अत्यंत क्लेशदायक होते.

पण अदीबाने हळूहळू स्वतःला सावरायला सुरुवात केली. बिछान्यावर पडून असतानाच तिने चित्रकला (पेंटिंग) आणि वाचनाचा आधार घेतला. हळूहळू आपल्या नैराश्याचे रूपांतर धैर्यात केले. तिने १२ वीची परीक्षाही दिली आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. तिची ज्ञानाची ओढ आणि चित्रकलेतील एकाग्रता अदीबासाठी एका उज्ज्वल भविष्याचे चित्र रेखाटत होती.

एके दिवशी, अदीबाने टीव्हीवर भारतासाठी पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू अवनी लेखरा यांना पाहिले.

हा तिच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉईंट' ठरला. त्याच क्षणी तिने निश्चय केला, "जर त्या (अवनी लेखरा) हे करू शकतात, तर मी का नाही?"

हा प्रश्न केवळ एक विचार नव्हता, तर एक नवीन भविष्य घडवण्याचा निर्धार होता. अदीबाला जाणीव झाली की, तिला आपला अपघात मागे सोडून पुढे जावे लागेल, कारण ती भूतकाळात जगू शकत नव्हती. तिला माहित होते की, आपल्या शारीरिक मर्यादा असूनही खेळता येईल असा एखादा नवीन खेळ तिला शोधावा लागेल.

त्या दुर्दैवी दिवसापर्यंत, अदीबा बास्केटबॉल आणि फुटबॉलसारख्या खेळांमध्ये सक्रिय होती. आता तिने पॅरा गेम्सबद्दल विचार करायला सुरुवात केली, जे तिच्यासारख्या लोकांना गौरव मिळवून देण्यासाठी बनले आहेत.

तिचा हा शोध तिला दोन मार्गदर्शकांकडे घेऊन गेला: तिचे प्रशिक्षक सुभाष राणा आणि रोहित 'सर'. त्यांनी अदीबाला नेमबाजी या खेळाचे मार्गदर्शन केले आणि तिला ट्रॅकवर स्पर्धा सुरू करण्याचा सल्ला दिला.

तिची आई, रेश्मा अली आठवण सांगताना म्हणतात: "अदीबाने यापूर्वी कधीही पिस्तूल हातात धरले नव्हते." पण प्रशिक्षक सुभाष राणा यांनी तिच्यात प्रचंड क्षमता पाहिली. सुभाष राणा आणि रोहित सरांनी तिला मार्ग दाखवला आणि अदीबाने आपल्या कठोर परिश्रमाने तो मार्ग प्रकाशमान केला.

सुरुवातीला हे कठीण होते, पण अदीबाने सरावासाठी पिस्तूल उचलले. तिच्या प्रशिक्षकांनी तिला अधिक मेहनत करायला लावली आणि अदीबाने पूर्ण समर्पण दाखवले. आज तिच्या दिनक्रमात आठ तासांच्या कठोर सरावाचा समावेश आहे.

अदीबा सांगते की, स्पर्धेसाठी तिने १० महिने सराव केला. या काळात तिने जिल्हा, विभागीय आणि पॅरा-नॅशनल स्पर्धांमध्ये भाग घेतला.

अदीबाचे वडील हे तिचे सर्वात मोठे प्रेरणास्थान आणि समर्थक (Cheerleader) आहेत. त्यांनी नेहमीच खेळाच्या महत्त्वावर भर दिला आहे; त्यांचे क्रिकेट प्रेम सर्वश्रुत आहे. अदीबा म्हणते, "शिक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच खेळही महत्त्वाचे आहेत."

तसेच, पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा ही तिची आदर्श (Idol) आहे. तिचे व्हिडिओ पाहूनच तिला नेमबाजीला आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनवण्याची प्रेरणा मिळाली. आज, जर तिचा एक दिवसही सराव चुकला, तर तिला आयुष्यात काहीतरी कमी असल्याची जाणीव होते.

अदीबा म्हणते, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. जर तुम्हीच हार मानली, तर दुसरे तुम्हाला का साथ देतील? परिस्थिती कितीही कठीण असली तरी, जर तुमचा निर्धार पक्का असेल, तर सर्व काही शक्य आहे."

लहानसहान अडचणींसमोर हार मानू नये, असा तिचा विश्वास आहे.

अदीबाची आई, रेश्मा अली आता एका नवीन प्रवासाचे स्वप्न पाहत आहेत. त्या म्हणतात, "अदीबाने आम्हा सर्वांची मान उंचावली आहे. आता आम्हाला ही कहाणी इतरांसोबत शेअर करायची आहे. आम्हाला प्रेरणादायी शिबिरे आयोजित करायची आहेत."

दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे समजण्यास मदत करणे, हे त्यांचे स्वप्न आहे की, अपंगत्व असूनही आयुष्याला नवी सुरुवात देणे आणि खूप काही साध्य करणे शक्य आहे. त्यांचा संदेश स्पष्ट आहे: अपंगत्व हा शेवट नसून, ती एक नवी सुरुवात आहे.

व्हिलचेअरवर खिळून राहण्यापासून ते 'शुटिंग स्टार' बनण्यापर्यंतचा अदीबाचा हा प्रवास म्हणजे आयुष्याकडे आशेने आणि धैर्याने पाहण्याची शिकवण आहे.

नवी दिल्लीच्या निजामुद्दीन वस्तीतील ही सामान्य मुलगी आता दिल्लीच्या परिवर्तनाचे एक उदाहरण बनली आहे. तिचे पुढचे ध्येय आपली कामगिरी सुधारणे हे आहे, जेणेकरून एक दिवस ती भारतासाठी सुवर्णपदक जिंकेल.

अदीबा अलीचे डोळे आशेने आणि पोलादी निर्धाराने चमकतात, जेव्हा ती म्हणते, "मला खूप, खूप मेहनत करायची आहे."


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter