आपल्या कर्तृत्वाने हजारो आयुष्य उजळवणारे हरियाणाचे चेंजमेकर्स

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
हरियाणाचे चेंजमेकर्स
हरियाणाचे चेंजमेकर्स

 

'आवाज द व्हॉईस' आपल्यासमोर सादर करत आहे हरियाणातील अशा १० उल्लेखनीय चेंज मेकर्सना, जे या हिरव्यागार राज्यात सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. यांनी प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात केले आणि आज ते अनेकांसाठी प्रेरणेचे स्रोत बनले आहेत. या मालिकेत आम्ही प्रामुख्याने सर्वात मागासलेल्या भागातील व्यक्तिमत्त्वांवर लक्ष केंद्रित केले आहे. जनकल्याणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या या लोकांच्या कहाण्या लोकांपर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे.

१. हाजी इब्राहिम खान

मेवातचे हाजी इब्राहिम खान गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळापासून जलसंधारण मोहिमेत सक्रिय आहेत. 'अरावली जल बिरादरी'चे अध्यक्ष म्हणून ते आपली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.

ते म्हणतात, "लहानपणापासून आम्ही पाण्याची भीषण टंचाई पाहिली आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो, कारण त्यांना घरची सर्व कामे सांभाळून पाण्यासाठी मैलोन्मैल चालावे लागते. मला 'जलपुरुष' राजेंद्र सिंह यांच्याकडून प्रेरणा मिळाली. मी सर्वात आधी घट्टा शमशाबाद जवळील दोन टेकड्यांमध्ये एक बंधारा बांधला. त्यामुळे गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. नंतर 'तरुण भारत संघा'च्या मदतीने पाट खोरी, फिरोजपूर झिरका, गियासनियन बास, मेवली आणि इतर गावांमध्ये अनेक 'जोहड' (तलाव) बांधण्यात आले. विशेष म्हणजे, वन्य प्राण्यांसाठी टेकड्यांवरही पाण्याची सोय केली गेली."

२. परवेज खान

मेवातच्या परवेज खानने हे सिद्ध केले आहे की प्रतिभा तुम्हाला कुठेही नेऊ शकते. एका छोट्याशा खेड्यातून उठून त्याने थेट अमेरिकेपर्यंत मजल मारली. मे २०२४ मध्ये लुईझियाना येथे झालेल्या 'SEC आउटडोअर ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिप'मध्ये त्याने १५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. त्याने ही शर्यत ३ मिनिटे ४२.७३ सेकंदात पूर्ण केली. कॅलिफोर्नियामध्ये त्याने ३ मिनिटे ३८.७६ सेकंद अशी त्याची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली आहे. त्याने ८०० मीटर शर्यतीतही तिसरे स्थान पटकावले आहे.

३. मुमताज खान

नूह जिल्ह्यातील चंदेनी गावची मुमताज खान आता मेवातचा 'आवाज' बनली आहे. तिने अनेक सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतला असून, माध्यमांद्वारे आपल्या भागातील प्रश्न मांडले आहेत. चंदेनी गाव शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांसाठी ओळखले जाते आणि याचे श्रेय मुमताजसारख्या लोकांना जाते.

ती म्हणते, "लहानपणापासून मी विविध व्यासपीठांवरून मेवातचा आवाज उठवत आहे. जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी, शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देणे आणि शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या मुद्द्यांशी संबंधित चळवळींमध्ये मी सक्रिय सहभाग घेतला."

४. सिद्दिक अहमद मेव

डॉ. सिद्दिक अहमद मेव हे हरियाणातील एक प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मेवातच्या इतिहासावर सखोल संशोधन केले आहे. ते म्हणतात, "मेवातच्या इतिहासावर माझा पहिला लेख १९९१ मध्ये माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या 'हरियाणा संवाद' या मासिकात प्रकाशित झाला होता. त्यानंतर अनेक लेख आले. १९९७ मध्ये माझे पहिले पुस्तक 'मेवात: एक शोध' प्रकाशित झाले. १९९९ मध्ये दुसरे पुस्तक 'मेवाती संस्कृती' आले. तेव्हापासून मी पुस्तके लिहित आहे. २०२५ पर्यंत मेवातचा इतिहास, संस्कृती आणि लोककलेवर माझी १२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तीन काव्यसंग्रहही आले आहेत, तर दोन प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. याशिवाय, सुमारे २०० कविता दहा संयुक्त काव्यसंग्रहांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत."

५. मोहम्मद रफिक चौहान

कर्नालचे मोहम्मद रफिक चौहान हे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते 'हरियाणा मुस्लिम खिदमत सभा' ही स्वयंसेवी संस्था चालवतात. ही संस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिलांच्या हक्कांविषयी जनजागृती करते. ते महिलांच्या हक्कांसाठी इतके कटिबद्ध आहेत की, जर पीडित महिला फी भरू शकत नसेल, तर ते तिचा खटला मोफत लढतात. इतकेच काय, तर ते स्टेशनरीचे पैसेही घेत नाहीत.

६. रुखसाना

नूह जिल्ह्यातील सुनारी गावची रुखसाना आता गुरुग्राममध्ये मॅजिस्ट्रेट (दंडाधिकारी) आहे. पहिल्या दोन प्रयत्नांत तिला हरियाणा आणि उत्तर प्रदेश ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये यश मिळाले नाही, पण तिने हार मानली नाही. अखेर तिने 'वेस्ट बंगाल ज्युडिशियल सर्व्हिसेस'ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिसरा क्रमांक मिळवला. तिचे यश हरियाणा आणि देशातील अशा अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे, ज्यांना वाटते की मुलीचे जग फक्त घराच्या चार भिंतींपुरते मर्यादित आहे.

७. रफिक अहमद

कर्नालमधील इंद्री येथील रफिक अहमद हे स्वतंत्र कर्नालचे पहिले मुस्लिम पदवीधर आहेत. त्यांनी आपले जीवन जनकल्याणासाठी, विशेषतः मशिदींच्या उभारणी आणि जीर्णोद्धारासाठी समर्पित केले. ते म्हणतात, "१९६० ते १९६२ दरम्यान अनेक मशिदी आणि ईदगाह बांधले गेले. माझे आयुष्य या कामासाठीच खर्च झाले. अनेक लोक या मोहिमेत सामील झाले आणि हळूहळू हा ताफा वाढत गेला." इस्लामचा खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे, असे ते मानतात.

८. राजेश खान मच्छारी

सोनिपतचे राजेश खान मच्छारी हे वकील आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. २००६ पासून ते 'कब्रस्तान इंतझामिया संघर्ष समिती'चे अध्यक्ष आहेत. ही समिती कब्रस्तानांची देखभाल करते, पाणी आणि वीज पुरवठा सुनिश्चित करते, अतिक्रमणे काढते, भिंती बांधते आणि बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करते.

९. असलम खान

गुरुग्रामचे असलम खान हे 'हरियाणा अंजुमन चॅरिटेबल ट्रस्ट'चे संस्थापक आहेत. ही संस्था गरीब आणि अनाथांना मदत करते. असलम यांनी आपल्या आईच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान रुग्णांना पैशाअभावी हाल सोसताना पाहिले. यातूनच ट्रस्टची कल्पना सुचली. हेलावून गेलेल्या असलम यांनी गरजूंसाठी ट्रस्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला. २००३ मध्ये संस्थेची औपचारिक नोंदणी झाली आणि तेव्हापासून अनेक समर्थक या कार्याशी जोडले गेले आहेत.

१०. होशियार खान

हिसारचे होशियार खान हे 'मुस्लिम वेलफेअर कमिटी'चे अध्यक्ष आहेत. ही संस्था मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी काम करते. आरक्षण, मूलभूत सुविधा आणि समाजाच्या हक्कांचे मुद्दे ते मांडतात. हिसारमध्ये मशिदींची कमतरता असल्याने, ईदची नमाज 'क्रांतिमान पार्कमध्ये' आयोजित केली जाते आणि त्याचा खर्च संस्था उचलते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter