आयशा बासिथ : 'नात' गायनातून ८० देशांमध्ये पोहोचवला शांततेचा संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 d ago
आयशा अब्दुल बासिथ
आयशा अब्दुल बासिथ

 

श्रीलता मेनन / त्रिशूर

आयशा अब्दुल बासिथ मूळची केरळची असली तरी, आज ती केवळ आपल्या राज्यातच नव्हे, तर तिच्या 'नात'मुळे ८० देशांमध्ये ओळखली जाते आणि प्रेम मिळवत आहे. 'नात' म्हणजे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची स्तुती करणारी धार्मिक गाणी.

या २० वर्षीय गायिकेने आणि तिच्या मधुर आवाजाने वयाच्या दहाव्या वर्षापासूनच चाहत्यांना आकर्षित करण्यास सुरुवात केली होती. तिच्या वडिलांनी फेसबुकवर तिच्या रियाजाचे व्हिडिओ सहजच पोस्ट करण्यास सुरुवात केली, ज्यांना प्रचंड पसंती मिळू लागली. यानंतर त्यांनी तिचे गाणे युट्यूबवर पोस्ट करण्याचा निर्णय घेतला. तिच्या पालकांनी २०१३ मध्ये तिचे युट्यूब चॅनल सुरू केले आणि तिच्या 'हसबी रब्बी जल्लल्लाह' या नात व्हिडिओला तब्बल ८ कोटी व्ह्यूज मिळाले. आज तिच्या युट्यूब चॅनलचे ३.७ कोटींहून अधिक सदस्य आहेत आणि ५८.३ कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत.

तिच्या आयुष्याला एक नाट्यमय वळण तेव्हा आले, जेव्हा तिला प्रसिद्ध नात कलाकार सामी युसूफ यांच्या रूपात एक गुरू मिळाला आणि तिने त्यांच्या कंपनीसोबत करार केला. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही.

एका जुन्या मुलाखतीत ती म्हणते, "२०१८ मध्ये सामी युसूफ यांना ऐकल्यानंतर, मला त्यांचे संगीत उपचारासारखे (healing) वाटले. मला जाणवले की मी स्वीकारलेली आध्यात्मिक संकल्पना हा माझा सर्वोत्तम निर्णय होता." ती पुढे सांगते, "त्यांनी मला खात्री दिली की मी माझ्या गाण्यांच्या निवडीतून योग्य मार्गावर आहे. ते मला सांगायचे की, 'आयशा, तू गात नाहीस, तर श्रोत्यांच्या मनावर फुंकर घालत आहेस'."

आयशासाठी, तिचा धर्म हाच तिच्या सक्षमीकरणाचा स्रोत बनला आहे, कारण तिच्या आध्यात्मिक गाण्यांनी तिला जगभरात पोहोचवले आहे. तिने जगभर प्रवास केला आहे, सलीम-सुलेमानसारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केले आहे आणि स्वतः ए. आर. रहमान हे तिचे प्रशंसक आहेत. लहानपणापासूनच सामी युसूफ आणि ए. आर. रहमान हे तिचे प्रेरणास्थान असल्याचे ती सांगते. सध्या ती प्रसिद्ध संगीतकार सलीम-सुलेमान यांच्यासोबत 'सलाम' या गाण्यांच्या प्रोजेक्टचा भाग आहे.

तिच्यासारख्या तरुण कलाकारांना दिलेला तिचा सल्ला तिची नम्रता आणि विनयशीलता दर्शवतो. "मी सल्ला देऊ शकत नाही, कारण मी अजूनही शिकत आहे. पण मी एवढेच म्हणेन की, तुम्ही जसे आहात तसेच राहा आणि तुम्ही जे काही करत आहात त्यात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करा."

तिचा आवाज अल्बमनंतर अल्बम तुमच्या शांततेला एका विचित्र उन्नत मार्गाने भेदून जातो आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतो. आजच्या तारखेला, तिचे इंस्टाग्रामवर ५,७१,००० फॉलोअर्स आहेत आणि तिच्या प्रत्येक पोस्टला ८,००० ते ३७,००० व्ह्यूज मिळतात. तिची गाणी बहुतेक प्रार्थना असतात, जी प्रेम आणि शांततेबद्दल असून एका भावपूर्ण आवाजात सादर केली जातात, जी कानांना सुखद आणि शांत करणारी असतात.

केरळच्या थॅलेसेरीमध्ये जन्मलेली आयशा आता अबू धाबीमध्ये राहते, जिथे ती आपले गुरू सामी युसूफ यांच्या मदतीने आपल्या संगीत कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे. तिने आतापर्यंत अरबी, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

तिच्या वेबसाइटवर तिच्या संगीतामागील उद्देश स्पष्ट होतो: "आयशा आपल्या अद्वितीय आणि भावपूर्ण गायनातून जगभरात शांतता आणि प्रेम पसरवण्याच्या तीव्र इच्छेने प्रेरित आहे. लोकांची मने आणि विचार शांतता व प्रेमाने भरून टाकेल असे संगीत तयार करण्याची तिची तळमळ आहे. तिला विश्वास आहे की, या माध्यमातूनच एक शांततापूर्ण समाज निर्माण केला जाऊ शकतो."