श्रीलता मेनन
खदिजा मुमताज यांची खरी ओळख काय? २०१० मध्ये 'बर्सा' या कादंबरीसाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार जिंकणाऱ्या लेखिका? कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील एक यशस्वी स्त्रीरोगतज्ज्ञ? की मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील वारसा हक्काला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांपैकी एक सामाजिक कार्यकर्त्या?
खदिजा मुमताज या तिन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहेत. यासोबतच, त्या केरळमधील 'देसिया मानविका वेदी' या व्यासपीठाचाही एक महत्त्वाचा भाग आहेत. इथे त्या विविध समुदायांतील प्रतिष्ठित लेखक आणि चित्रपट निर्मात्यांसोबत मिळून सलोखा आणि संवादाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काम करत आहेत. समाजातील सद्यस्थिती बदलण्यासाठी सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या केरळमधील मोजक्या मुस्लिम व्यक्तींपैकी त्या एक आहेत.
आता खदिजा मुमताज यांनी आपली वैद्यकीय प्रॅक्टिस थांबवली आहे आणि आपल्या कादंबरी लेखनालाही त्यांनी काही अंशी विराम दिला आहे. आज त्यांची ओळख मुस्लिम धर्मगुरू आणि 'जमात-ए-इस्लामी' सारख्या संघटनांचा रोष पत्करूनही मुस्लिम महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्या अशी आहे.
मुस्लीमांच्या व्यक्तिगत कायद्यात आधुनिक गरजांनुसार सुधारणा करून लैंगिक समानतेसाठी चळवळ चालवणाऱ्या केरळमधील मोजक्या कार्यकर्त्यांपैकी त्या एक आहेत. 'फोरजेन' (FORGEN - फोरम फॉर मुस्लिम वुमन्स जेंडर जस्टिस) नावाच्या आपल्या व्यासपीठाद्वारे, त्या लैंगिक हक्कांविषयी रूढ इस्लामिक व्याख्यांचा पुनर्विचार करण्याची मागणी करत आहेत.
खदिजा मुमताज म्हणतात, "कुराणाने दिलेल्या व्यक्तिगत कायद्याचा गाभा न्याय हाच आहे. रंग, पंथ किंवा लिंगभेद न करता सर्वांना न्याय देणे हे त्याचे ध्येय होते. म्हणूनच महिलांना वारसा हक्क देण्यात आले. त्या काळात जे केले गेले, ते तेव्हाच्या संदर्भात योग्य आणि न्यायपूर्ण होते. पण आता ते न्याय्य राहिलेले नाही."
"आम्ही सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचे पक्षकार आहोत आणि आमची इच्छा आहे की न्यायालयाने सरकारला महिलांच्या बाजूने कायद्यात सुधारणा करण्यास सांगावे," असे त्या सांगतात. 'फोरजेन'ला वारसा हक्काच्या कायद्यात सुधारणा हवी असली तरी, सरकार ज्या समान नागरी कायद्याची (UCC) धमकी देत राहते, त्याला त्यांचा विरोध आहे.
खदिजा म्हणतात, "सरकार समान नागरी कायद्याबद्दल बोलत आहे, पण आम्हाला फक्त आमच्या वारसा हक्काच्या कायद्यात सुधारणा हवी आहे." सर्वोच्च न्यायालयात चार वर्षे होऊनही याचिका सुनावणीसाठी घेतली जात नसल्याने त्यांना निराशा वाटते. "समान नागरी कायद्याची सतत भीती दाखवली जात असताना, न्यायालय आमच्या बदलासाठीच्या याचिकेवर सुनावणी घ्यायला तयार नाही," असे त्या म्हणतात.
दरम्यान, घरच्या आघाडीवरही खूप काम करायचे आहे, कारण बहुतेक महिलांना त्यांच्या हक्कांविषयी माहितीच नाही, असे खदिजा मुमताज सांगतात. "त्यांना सांगितले जाते की, त्या जे काही सहन करत आहेत, ते विधिलिखित देवानेच लिहिले आहे आणि त्यामुळे वैयक्तिक कायदा जे सांगतो ते स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही." त्या पुढे विश्वासाने सांगतात, "म्हणूनच आम्ही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करतो, जेणेकरून त्यांना त्यांचे हक्क कळतील."
खदिजा मुमताज मुस्लिम महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांचे वर्णन करताना सांगतात की, कुटुंबातील पुरुषाचा मृत्यू झाल्यावरच त्यांना त्यांच्या धर्माशी असलेला संबंध प्रामुख्याने जाणवतो. "जर वडील किंवा पतीचा मृत्यू झाला, तर मागे राहिलेल्या मालमत्तेवर महिलेला फारच कमी हक्क मिळतो. एकतर वडिलांचे भाऊ ताबा घेतात किंवा पतीचे भाऊ आणि स्त्री असहाय्यपणे पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. दुसरा पर्याय म्हणजे, स्त्रीने या हक्क सांगणाऱ्यांपैकी एकाशी लग्न करणे," असे त्या म्हणतात.
"केरळमध्ये तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्वाची फार मोठी समस्या नाही. आम्हाला वारसा हक्काच्या कायद्यामुळे अडचणी येतात आणि जर परिस्थितीत बदल हवा असेल, तर संसदेने कायद्यात सुधारणा करायला हवी," असे त्या सांगतात.
खदिजा मुमताज म्हणतात, "आज मुस्लिम महिला शिक्षण घेत आहेत आणि कमावत्या आहेत, पण जर मालमत्ता पती किंवा वडिलांसोबत सामायिक असेल, तर कदाचित तिचा स्वतःच्या मालमत्तेवरही ताबा नसेल. जरी तुम्ही इस्लाम धर्म सोडला, तरी धर्म तुम्हाला सोडणार नाही, कारण तोच कायदा आमच्या मालमत्तेच्या हक्काचे नियमन करतो."
खदिजा यांची अडचण ही आहे की, वारसा हक्काच्या कायद्यात सुधारणांची मागणी करणाऱ्या 'फोरजेन' अंतर्गत काम करणाऱ्या लोकांना मुस्लीम समाज 'इस्लामविरोधी' ठरवतो. खदिजा मुमताज म्हणतात, "आम्हाला महिलांना हे पटवून द्यावे लागते की, आपले हक्क मागून त्या कुराणाच्या विरोधात जात नाहीत. अनेक महिलांना तर त्यांच्या हक्कांविषयी माहितीच नाही."
खदिजा मुमताज सांगतात की, त्यांच्या 'बर्सा' या कादंबरीमुळे आणि नंतरच्या सामाजिक कार्यामुळे लोकांनी त्यांना इशारा दिला होता की, त्यांची अवस्था बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्यासारखी होईल. "पण माझ्यासोबत तसे काही घडले नाही," असा सुस्कारा त्या सोडतात.
सध्या इस्लामोफोबियामुळे निर्माण झालेले दूषित वातावरण दूर करण्याचाही खदिजा मुमताज प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्या हिंदू आणि ख्रिश्चन समुदायांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींसोबत मिळून, त्या 'देसिया मानविका वेदी' अंतर्गत चार जिल्ह्यांमध्ये सुफी संगीत कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना खदिजा मुमताज म्हणाल्या होत्या, "इस्लामोफोबियाचे विष हवा दूषित करत आहे. आपल्याला ते समजून घ्यावे लागेल. त्याची कारणे शोधावी लागतील आणि त्यावर उपाय शोधावे लागतील."
एकीकडे त्या वास्तविक जीवनातील समस्यांशी लढत असताना, त्यांच्या 'बर्सा' आणि 'नीट्टिएळुत्तुगळ' या कादंबऱ्यांमधील पात्रे त्यांच्या पुढच्या कादंबरीची वाट पाहत आहेत. "मी सध्या दीर्घ कादंबरी लिहू शकत नाही, कारण मी रोजच्या धबडग्यात खूप गुंतले आहे. त्यामुळे, मी कथा आणि बहुतेक लेख लिहिते, जे मला आता अधिक नैसर्गिकरित्या सुचतात." असे या लेखिका सांगतात.
खदिजा म्हणतात की, या सामाजिक कार्यात त्यांना पतीचा पूर्ण पाठिंबा आहे. तथापि, त्या स्वतःला 'चेंजमेकर' मानण्यास सहमत नाहीत. "मला जे करायला हवे, ते मी फक्त कर्तव्यभावनेने करत आहे," असे त्या नम्रपणे सांगतात.
खदिजा मुमताज यांच्या 'बर्सा' कादंबरी विषयी...
खदिजा मुमताज यांची पुरस्कार विजेती मल्याळम कादंबरी 'बर्सा' (बुरख्याशिवायची स्त्री) सौदी अरेबियाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. डॉ. मुमताज यांनी तिथे प्रत्यक्षात सात वर्षे काम केले होते. ही कथा एका स्त्रीरोगतज्ज्ञ (इस्लाम धर्म स्वीकारलेली हिंदू स्त्री) आणि तिचा नेत्ररोगतज्ज्ञ मुस्लिम पती यांची आहे, जे एका इस्लामिक पण परक्या देशात स्थलांतरित म्हणून एकटेपणा अनुभवतात. ज्या देशात प्रेषितांनी उपदेश दिला, त्याच देशात स्त्रियांवरील अत्याचार पाहून ती थक्क होते आणि निष्कर्ष काढते की, इथला इस्लाम भारतातील इस्लामसारखा नाही.