तुमचे पैसे बँकांमध्ये पडून तर नाहीत? सरकार परत देणार १.८४ लाख कोटी रुपये!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचे हक्काचे पैसे बँक, विमा कंपन्या किंवा म्युच्युअल फंडांमध्ये अडकून पडले आहेत का? आता ही रक्कम परत मिळवणे सोपे होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'आपकी पूंजी, आपका अधिकार' (तुमची जमापुंजी, तुमचा अधिकार) या देशव्यापी मोहिमेची सुरुवात केली आहे, ज्या अंतर्गत तब्बल १.८४ लाख कोटी रुपयांची बेवारस रक्कम त्यांच्या मूळ मालकांना परत केली जाणार आहे.

गुजरातच्या गांधीनगर येथून या तीन महिन्यांच्या मोहिमेचा शुभारंभ करताना, सीतारामन यांनी सांगितले की, "ही रक्कम सरकारची नसून, देशातील सामान्य व्यक्ती आणि कुटुंबांच्या कष्टाची कमाई आहे. अनेक वर्षांपासून कागदपत्रांच्या अभावी किंवा माहिती नसल्याने ही रक्कम पडून आहे. ही रक्कम त्यांच्या हक्काच्या मालकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे."

कुठे आहे ही रक्कम?

ही प्रचंड रक्कम निष्क्रिय बँक खाती, मुदत संपलेल्या पण दावा न केलेल्या विमा पॉलिसी, विसर पडलेल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकी, पडून राहिलेले प्रॉव्हिडंट फंड आणि न काढलेले शेअर्सचे डिव्हिडंड अशा विविध ठिकाणी अडकलेली आहे.

'३-A' फॉर्म्युल्याने पैसे परत मिळणार

ही मोहीम '३-A' म्हणजेच Awareness (जागरूकता), Access (सुलभता) आणि Action (कृती) या तत्त्वांवर काम करेल.

  • जागरूकता: लोकांपर्यंत त्यांचे पैसे पडून असल्याची माहिती पोहोचवणे.

  • सुलभता: आरबीआयच्या 'UDGAM' (Unclaimed Deposits Gateway to Access Information) सारख्या डिजिटल पोर्टलद्वारे लोकांना त्यांचे पैसे शोधणे सोपे करणे.

  • कृती: अर्ज आल्यानंतर त्यावर वेळेत कारवाई करून लोकांना त्यांचे पैसे परत देणे.

अर्थमंत्र्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या मोहिमेचे 'दूत' बनावे आणि आपल्या ओळखीच्या लोकांना त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी मदत करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसारच ही मोहीम थेट लोकांपर्यंत पोहोचवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.