एका साध्या अँड्रॉइड फोन चार्जरने पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणला आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद युसूफ कटारी (२६) नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
२२ एप्रिल रोजी पहलगाममधील 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन येथे झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटक मारले गेले होते. या हल्ल्यातील दहशतवादी सुलेमान, जिब्रान आणि हमजा अफगाणी यांना सुरक्षा दलांनी जुलैमध्ये 'ऑपरेशन महादेव'मध्ये ठार केले होते. घटनास्थळावरून मिळालेल्या एका अर्धवट जळालेल्या फोन चार्जरच्या आधारे तपास यंत्रणा कटारीपर्यंत पोहोचल्या.
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कटारीने चौकशीत कबूल केले आहे की, तो या तीन दहशतवाद्यांना चार वेळा भेटला होता. त्यानेच त्यांना श्रीनगरबाहेरील जबरवानच्या डोंगरांमधून अवघड मार्गांनी वाट दाखवली होती. तसेच, त्यानेच त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट, म्हणजेच राहण्या-खाण्याची आणि इतर आवश्यक वस्तूंची मदत पुरवली होती.
या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आधीच तपास करत असून, आता कटारीच्या अटकेमुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. कटारीच्या चौकशीतून आणखी मोठे मासे गळाला लागतील, असा विश्वास सुरक्षा यंत्रणांना वाटत आहे.