सफना नझरुद्दीन : केरळच्या सर्वात तरुण मुस्लिम महिला आयएएस अधिकारी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
कामगार आयुक्त सफना नझरुद्दीन
कामगार आयुक्त सफना नझरुद्दीन

 

श्रीलता मेनन

सफना नझरुद्दीन यांनी एक स्वप्न पाहिले आणि मेहनतीने ते सत्यात देखील उतरवले. नागरी सेवेचा मार्ग निवडून त्यांनी समाजात बदल घडवण्याचे स्वप्न साकार केले. २०२० मध्ये यूपीएससी परीक्षेत देशभरात ४५वा क्रमांक मिळवत सफना यांनी केरळमधील सर्वात तरुण मुस्लिम महिला आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला.

आज त्या कम्युनिस्ट केरळमध्ये कामगार आयुक्त आहे. त्यांनी यापूर्वी मलप्पुरम येथे कलेक्टर म्हणून कार्य केले. स्वप्नांचा पाठलाग केल्यास यश निश्चित मिळतं, असा त्यांचा सल्ला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या म्हणतात की,“तुमचं स्वप्न असायला हवं आणि ते तुमचंच असायला हवं. ते नक्कीच सत्यात उतरेल.” 

त्या पुढे म्हणतात की, “आयएएस अधिकारी होण्याचं माझं स्वप्न होतं. तुमचं स्वप्न काहीही असू शकतं. पण ते तुमचं स्वतःचं असायला हवं, पालकांचं किंवा दुसऱ्या कुणाचं नव्हे.”   
 

सफना यांच्या म्हणण्यानुसार, त्या आठवीत असताना आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू लागल्या. तेव्हा त्याचा अर्थही त्यांना पूर्णपणे माहीत नव्हता. एका मुलाखतीत बोलताना त्या म्हणतात, “मला फक्त इतकं माहीत होतं की आयएएस अधिकारी समाजासाठी खूप काही करू शकतो आणि सकारात्मक बदल घडवू शकतो.”  

सफना यांच्या वडिलांनी केरळ पोलीस मध्ये नोकरी केली. पोलिसांमध्ये सर्वात खालच्या पोस्टपासून सुरुवात करून ते इन्स्पेक्टर पदावरून निवृत्त झाले. त्यांची आई कट्टाकडा रोजगार कार्यालयात टायपिस्ट म्हणून काम करते. आई-वडिलांकडूनच सफना यांना शिस्त आणि मेहनतीचे बाळकडू मिळाले. त्यांच्या स्वप्नांना पालकांनी नेहमीच पाठिंबा दिला.

सफना यांनी यूपीएससी परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन विज्ञान शाखेऐवजी सामाजिक शास्त्र आणि मानवशास्त्र निवडले. केंद्रीय विद्यालयात त्या अव्वल होत्या. त्यांना कोणतीही शाखा सहज निवडता आली असती, परंतु त्यांनी यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासासाठी सामाजिक शास्त्र निवडले.

 
अर्थशास्त्रात पदवी घेताना त्यांनी केरळ विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर शिक्षण किंवा इतर कोणता अभ्यासक्रम न करता त्यांनी ताबडतोब यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. फॉर्च्यून आयएएस अकादमीतील मार्गदर्शकांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्यातील नियोजित दृष्टिकोनाला, नम्रतेला आणि शिकण्याच्या उत्साहाला दिले. 

सफना यांनी आयएएस परीक्षेच्या तयारीत काटेकोर नियोजन आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यात अडचण यायची. परंतु फॉर्च्यून अकादमीच्या सल्ल्याने सफना यांनी रोज विशिष्ट विषयांवर आरशासमोर बोलण्याचा सराव केला. अभ्यासासाठी त्यांनी एक दिनचर्या ठरवली. त्यात सोशल मीडियाचा त्याग, दोन तास वृत्तपत्र वाचन, फॉर्च्यूनच्या वर्गांना उपस्थिती आणि उरलेल्या वेळेत स्वयंअध्ययन यांचा समावेश होता.

सफना यांनी रोज ७ ते १० तास मेहनत केली आणि तीही सर्व नियोजनबद्ध. तासांनंतर मित्रांसोबत कॉफीसाठी बाहेर एक तास घालवणं हेसुद्धा त्यांच्या नियोजनाचा भाग होता.  त्याहून महत्त्वाचे होते त्यांच्या नोट्स काढण्याच्या सवयी. त्यांनी वाचलेल्या किंवा शिकलेल्या प्रत्येक गोष्टीच्या नोट्स त्या काढून ठेवायच्या. आठवड्याच्या शेवटी नोट्सच्या माध्यमातून त्या सहज अभ्यास करायच्या.  

आज आयएएस अधिकारी म्हणून काही वर्षे घालवल्यानंतर, मलप्पुरम जिल्ह्यात उपकलेक्टर म्हणून सुरुवात केल्यानंतर, त्या सांगतात की, “नोकरदारांवर नेहमीच राजकीय दबाव असतो, हे पूर्णपणे खरं नाही. आम्हाला अडथळे येतात, कारण आम्ही ज्या गोष्टी हाताळतो, त्यात अनेक भागधारकांचा सहभाग असतो. सर्वांचे हित लक्षात घेऊन सर्वांना फायदा होईल असा तोडगा काढावा लागतो,” 

त्या एका सार्वजनिक कार्यक्रमात काम आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना त्या म्हणतात,  “आयएएस अधिकारी असणं म्हणजे माझा सगळा वेळ कामातच जातो असं नाही. काही वेळा बैठकी रात्री उशिरापर्यंत चालतात. परंतु काही वेळा तुलनेने मोकळा वेळही मिळतो. हे कामही हे जबाबदारीच्या इतर कोणत्याही कामासारखेच असते.” 

सफना सांगतात की केंद्रीय विद्यालयात सामाजिक शास्त्र शिकताना त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांना वेगवेगळ्या समुदायांचे आणि वांशिक गटांचे शिक्षण मिळाले. समाजातील हक्क आणि वंचितांबद्दल त्यांना तिथे समजले. आपण खूप सौभाग्यवान आहोत आणि वंचितांसाठी काम करायला हवे, असे त्यांना त्यावेळी वाटले. यामुळे त्यांचे बालपणीचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न अधिक दृढ झाले.  

आज कामगार आयुक्त म्हणून त्या त्यांच्या कार्यात व्यस्त आहेत. स्थलांतरित मजूर, अनियमित मजूर आणि बेरोजगारीच्या समस्यांवर त्या काम करतात. कदाचित त्याच उत्साही आणि नियोजनबद्ध दृष्टिकोनातून त्यांनी यूपीएससी परीक्षेत यशस्वी होण्यास मदत केली असेल.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter