सानिया अंजुम, बेंगळुरू
१९७४ सालची गोष्ट आहे. संसदेच्या भव्य दालनात एका १३ वर्षांच्या मुलीची धडपड सुरू होती. डोळ्यांत स्वप्ने घेऊन आलेल्या या मुलीने त्या अफाट गर्दीतून मार्ग काढत एक अशक्य गोष्ट साध्य केली - तिने भारताच्या कणखर पंतप्रधान इंदिरा गांधी यांची स्वाक्षरी मिळवली. त्या क्षणी तिच्या मनात एक ठिणगी पेटली. तिला उमजले की नेतृत्व करण्यासाठी फक्त धाडसाची गरज असते.
ती मुलगी म्हणजे तझैयून उमर. दशकांनंतर, तीच मुलगी चेंजमेकर बनली. आज तिच्या 'ह्युमेन टच' या सेवाभावी संस्थेद्वारे ती हजारो कुटुंबांना - विशेषतः महिला आणि मुलांना - सक्षमीकरण, शिक्षण यांच्यामाध्यमातून सन्मानाच्या मार्गावर नेत आहे.
सुरुवातीचा काळ आणि शिक्षण
बेंगळुरूच्या एका कच्छी मेमन कुटुंबात तझैयून यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कापडाचे दुकान चालवत असत. १९८० च्या दशकात, एक तरुण मुलगी म्हणून त्यांनी वडिलांना व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. त्या काळी त्यांच्या समाजात महिलांनी व्यवसायात येणे दुर्मिळ होते. पण या अनुभवाने त्यांना केवळ आत्मविश्वासच दिला नाही, तर स्वातंत्र्याची जाणीवही करून दिली.
सोफिया स्कूलमध्ये शिक्षण आणि माऊंट कार्मेल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांना शिक्षणाची मनापासून आवड होती. शाळेत असतानाच त्यांनी विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी स्वयंसेवा केली होती. त्यांनी ब्रेल लिपीत चार्ट्स बनवले आणि बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांशी संवाद साधला. या क्षणांनी त्यांच्या मनात पुनर्वसन आणि समावेशकतेचे बीज पेरले.
'ह्युमेन टच'चा जन्म
१९९९ मध्ये, तझैयून यांनी एक निर्णायक पाऊल उचलले. त्यांनी 'ह्युमेन टच' या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला ही संस्था विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) मुलांच्या पुनर्वसनासाठी समर्पित होती. कॅलिपर्स पुरवणे, शस्त्रक्रियांना मदत करणे आणि त्यांना समाजात मिसळण्याची संधी देणे, यावर त्यांनी भर दिला. गेल्या काही वर्षांत १०० हून अधिक मुलांवर जन्मजात आणि किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
पण त्यांची दृष्टी केवळ आरोग्यसेवेपुरती मर्यादित नव्हती. २०००मध्ये त्यांनी गौरीपाल्या येथे प्रौढ शिक्षण केंद्र सुरू केले. प्रौढांना साक्षर करून त्यांनी सक्षमीकरणाचे दरवाजे उघडले.
शाळा, सामूहिक विवाह आणि महिला उद्योजक
२००४मध्ये त्यांनी 'अल-अझहर स्कूल' सुरू केले, जिथे मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते. त्याच वर्षी त्यांनी आपल्या सर्वात नाविन्यपूर्ण कल्पनांपैकी एक राबवली - सामूहिक विवाहाची.
जेव्हा लग्नाचा खर्च अनेक गरीब कुटुंबांचे कंबरडे मोडत होता, तेव्हा तझैयून यांनी सन्मान आणि विश्वासावर आधारित सामुदायिक विवाहांची संकल्पना मांडली. गेल्या २१ वर्षांत, या उपक्रमातून १,७५० विवाह लावून देण्यात आले आहेत. यात केवळ सोहळेच नाहीत, तर विवाहोत्तर समुपदेशन आणि सुखी संसारासाठी मध्यस्थीही केली जाते.
२००७ मध्ये त्यांनी 'लाइफलाइन फाउंडेशन' सुरू केले. याचा उद्देश मुस्लिम महिलांमधील उद्योजकतेला चालना देणे हा होता. या उपक्रमाने २,०००हून अधिक महिलांना संधी, प्रशिक्षण आणि संसाधने देऊन सक्षम केले आहे. शिलाई मशीन, कौशल्य विकास कार्यक्रम आणि आर्थिक साक्षरता कार्यशाळांनी महिलांना त्यांची परिस्थिती बदलण्याची ताकद दिली.
शिक्षण सक्षमीकरणाचा गाभा
तझैयून यांच्या सर्व उपक्रमांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे शिक्षण. 'ह्युमेन टच' दरवर्षी सुमारे ३०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. यात मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलींवर विशेष भर दिला जातो. यातील अनेक तरुणी आता हाय-टेक कंपन्यांमध्ये काम करत आहेत आणि परावलंबनाचे चक्र तोडत आहेत.
तझैयून अनेकदा एका कुटुंबाची आठवण सांगतात, ज्यांना वडिलांनी सोडून दिले होते. आईने तीन मुली आणि एका मुलाला कसेबसे वाढवले. 'ह्युमेन टच'च्या मदतीने मुलाने वैद्यकीय शिक्षण घेतले आणि तो मक्केत डॉक्टर झाला. आज तो केवळ आपल्या कुटुंबालाच आधार देत नाही, तर ज्या संस्थेने त्याला मदत केली, तिथेही तो मोठ्या मनाने मदत करतो. ‘घेणाऱ्याकडून देणारा होणे’ - हेच परिवर्तन 'ह्युमेन टच' घडवते.
करुणा समुदायाच्या पलीकडे जाणारी
जरी तझैयून यांची मुळे कच्छी मेमन वारशात रुजलेली असली, तरी तझैयून यांची दृष्टी नेहमीच सर्वसमावेशक राहिली आहे. 'ह्युमेन टच' बिगर-मुस्लिम कुटुंबांनाही मदत करते. करुणा ही सीमा मानत नाही, हेच त्यांनी सिद्ध केले आहे.
त्यांना सर्वात जास्त समाधान वैद्यकीय मदतीतून मिळते. "वैद्यकीय मदत ही जीव वाचवणारी असते," असे त्या सांगतात. रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या डोळ्यांतील कृतज्ञता सर्व कष्टांचे सार्थक करते.
आव्हाने आणि आधार
प्रत्येक 'चेंजमेकर'प्रमाणेच, तझैयून यांनाही आव्हानांचा सामना करावा लागला. देणगीदारांचा विश्वास जिंकणे आणि पारदर्शकता राखणे ही एक कसरत असते. "समाजातील अनेक पुरुषांना महिलांना नेतृत्वाच्या भूमिकेत स्वीकारणे कठीण जाते. त्यांना महिलांची प्रगती पचवता येत नाही," असे त्या कबूल करतात.
तरीही, त्यांना महिलांमध्येच एक मजबूत मित्र सापडला. अनेकदा अशिक्षित असलेल्या महिलांनी, एकदा बदल शक्य असल्याचे दिसल्यावर, संधींना उत्साहाने प्रतिसाद दिला. कोविड महामारी हा आणखी एक मोठा धक्का होता, पण त्या काळातही 'ह्युमेन टच'ने सन्मानाने समुदायांना आधार दिला.
तझैयून त्यांच्या मार्गदर्शकांचे आभार मानतात. त्यांच्या मावशी, राबिया रझॅक (प्रेस्टीज ग्रुपचे इरफान रझॅक यांच्या आई) यांनी त्यांच्या कार्यात वैयक्तिक रस घेतला. कुटुंबाचा, विशेषतः आईकडून मिळालेला पाठिंबा त्यांना टिकून राहण्याची शक्ती देत आला.
भविष्याची दृष्टी
'ह्युमेन टच'च्या सचिव म्हणून तझैयून आजही मोठी स्वप्ने पाहत आहेत. त्यांचा आगामी प्रकल्प म्हणजे 'फिनिशिंग स्कूल'. इथे तरुणांना केवळ व्यावसायिक कौशल्येच नाही, तर जीवनासाठी मूल्ये आणि आत्मविश्वासही दिला जाईल.
त्यांचा विश्वास आहे की, खरे सक्षमीकरण हे लोकांना सन्मानाने जगण्याची क्षमता देण्यात आहे, केवळ मदतीवर जगण्यात नाही. 'ह्युमेन टच' हा करुणा आणि सक्षमीकरण यांच्यातील पूल म्हणून काम करत राहील, अशी त्यांची आशा आहे.
'चेंजमेकर'ची व्याख्या
मागे वळून पाहताना, तझैयून आपला प्रवास पदव्या किंवा पुरस्कारांमधून नाही, तर परिवर्तनाच्या क्षणांमधून मोजतात. १३व्या वर्षी इंदिरा गांधींची सही घेणाऱ्या मुलीला हे लवकरच समजले होते की नेतृत्वासाठी धैर्याची गरज असते. वडिलांच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणीला समजले की व्यवसाय हे सक्षमीकरणाचे माध्यम होऊ शकते. आणि दिव्यांग मुलांचे हात धरणाऱ्या समाजसेविकेला समजले की बदलाची सुरुवात सहानुभूतीतून होते.
त्यांच्यासाठी, 'चेंजमेकर' असणे म्हणजे जिथे इतरांना मर्यादा दिसतात, तिथे मानवी क्षमता पाहणे आणि गप्प राहण्यापेक्षा सेवेला निवडणे होय.
समाजसेवेच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना त्यांचा सल्ला स्पष्ट आहे: "परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहू नका. ज्या क्षणी तुम्ही कृती करण्याचे ठरवता, तेव्हाच बदल सुरू होतो. अल्लाहवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी सर्व गोष्टी आपोआप घडतील."
तझैयून ओमर यांचे जीवन हे चिकाटी, करुणा आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे. सामूहिक विवाह, महिला उद्योजकता, शिष्यवृत्ती आणि शस्त्रक्रिया... त्यांच्या उपक्रमांनी धर्म आणि समुदायाच्या पलीकडे जाऊन हजारो जीवनांना स्पर्श केला आहे. 'ह्युमेन टच'च्या माध्यमातून त्यांनी केवळ परोपकाराची व्याख्याच बदलली नाही, तर समाजसेवेतील महिला नेतृत्वाची एक नवी ओळख निर्माण केली आहे.
त्यांची कहाणी आठवण करून देते की, खरा बदल हा मोठ्या घोषणांमध्ये नसतो, तर तो सातत्यपूर्ण आणि मानवी स्पर्शात असतो. जो एका वेळी एका कुटुंबाचे, एका मुलाचे आणि एका स्वप्नाचे आयुष्य बदलतो.
तझैयून उमर केवळ सेवा करत नाहीत, तर त्या सेवेची पुनर्व्याख्या करतात. जेव्हा जगाने म्हटले, "हे स्त्रीचे क्षेत्र नाही," तेव्हा तझैयून यांनी उठून उभे राहून सांगितले: "फक्त पाहत राहा."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -