लग्नाच्या २५ वर्षानंतर अर्शद वारसीने केलं 'रजिस्टर मॅरेज'

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 2 Months ago
अर्शद वारसी आणि त्यांची पत्नी मारिया
अर्शद वारसी आणि त्यांची पत्नी मारिया

 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्शद वारसी हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. २५ वर्षापूर्वी अर्शदचा विवाह मारिया गोरेटीशी झाला होता. आता अर्शद आणि मारिया यांनी लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रजिस्टर मॅरेज केलं आहे. म्हणजेच अर्शदनं त्याच्या आणि मारियाच्या लग्नाची नोंदणी केली आहे.

अर्शद आणि मारियाचे लग्न १४ फेब्रुवारी १९९९ रोजी झाले. अर्शद आणि मारिया यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. एवढा कालावधी लोटूनही या जोडप्याने अद्याप लग्नाची नोंदणी केलेली नव्हती. लग्नाचा २५ वा वाढदिवस खास बनवण्यासाठी या जोडप्याने त्यांच्या लग्नाची नोंदणी केली आहे. अर्शदनं आपल्या पत्नीला व्हॅलेंटाईन आणि लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाचे टू इन वन गिफ्ट दिले आहे.

काय म्हणाला अर्शद?
एका मुलाखतीदरम्यान अर्शद वारसी म्हणाला,"हे माझ्या मनात कधीच आले नव्हते आणि मला विवाह नोंदणी करणं आवश्यक वाटले नाही. मात्र, एखादी मालमत्ता खरेदी करताना हे खूप महत्त्वाचे असल्याचे लक्षात आले. आम्ही हे कायद्यासाठी केले आहे."

शेअर केली खास पोस्ट
अर्शदनं त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यानं मारियासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "आयुष्य घालवाण्यासाठी एका स्त्रीची निवड करणे हा एका व्याक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आहे आणि मी योग्य निर्णय घेतला याचा मला आनंद आहे. मारिया, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा"

अर्शद वारसी सध्या झलक दिखला जा या डान्स रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे. तो या शोचं परीक्षण करताना दिसत आहे. अर्शद लवकरच संजय दत्तसोबत एका चित्रपटात दिसणार आहे.