अमेरिकेत भीषण हिमवादळाचा तडाखा; १३,००० विमान उड्डाणे रद्द, कोट्यवधी नागरिक अंधारात

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 h ago
अमेरिकेत भीषण हिमवादळाचा तडाखा; १३,००० विमान उड्डाणे रद्द, कोट्यवधी नागरिक अंधारात
अमेरिकेत भीषण हिमवादळाचा तडाखा; १३,००० विमान उड्डाणे रद्द, कोट्यवधी नागरिक अंधारात

 

वॉशिंग्टन:

अमेरिकेला सध्या एका भीषण 'विंटर स्टॉर्म'ने (हिमवादळ) कचाट्यात घेतले असून, यामुळे संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी आणि रविवारी मिळून सुमारे १३,००० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. देशातील जवळपास १४ कोटी लोकसंख्या, म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के नागरिक सध्या या बर्फाच्या वादळाच्या छायेखाली आहेत. न्यू मेक्सिकोपासून न्यू इंग्लंडपर्यंत पसरलेल्या या वादळामुळे रस्ते, रेल्वे आणि विमान सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डझनभर राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली असून, फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीला (FEMA) मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसच्या मते, हा बर्फ आणि साचलेले आईस (गोठलेले पाणी) इतक्या लवकर वितळणार नाही, ज्यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी तापमान उणे ४० अंशांपर्यंत खाली घसरले असून, अवघ्या १० मिनिटांत फ्रॉस्टबाइट (त्वचा गोठणे) होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टेक्सास आणि लुईझियानासह अनेक राज्यांमध्ये सुमारे १,२०,००० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. आईस स्टॉर्ममुळे झाडांच्या फांद्यांवर बर्फाचे ओझे वाढल्याने त्या वीजवाहिन्यांवर पडत आहेत. जॉर्जियाच्या हवामान तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, हे गेल्या दशकातील सर्वात मोठे आईस स्टॉर्म असू शकते. रस्ते काचेसारखे गुळगुळीत झाल्याने वाहने चालवणे अशक्य झाले आहे.

न्यूयॉर्कमध्ये १ ते २ फूट बर्फ साचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी नागरिकांना अत्यंत मिश्किल पण गंभीर सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, "कृपया कोणीही घराबाहेर पडू नका. उबदार स्वेटर घाला, टीव्ही लावा आणि १० व्यांदा 'मिशन इम्पॉसिबल' चित्रपट पहा, पण सुरक्षित राहा." दरम्यान, खराब हवामानामुळे एअर इंडियानेही आपली न्यूयॉर्क आणि नेवार्कला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. ओक्लाहोमा, डॅलस, शिकागो आणि अटलांटा येथील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.

या कडाक्याच्या थंडीचा फटका शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रमांनाही बसला आहे. ह्युस्टन आणि फिलाडेल्फियामधील शाळा सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. लुईझियानामधील प्रसिद्ध 'मार्डी ग्रास' परेडही रद्द करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या मते, वादळ ओसरल्यानंतरही विक्रमी थंडीची लाट कायम राहणार आहे, जी अमेरिकेसाठी मोठी आव्हानात्मक ठरेल.