बांगलादेशात १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. राजधानी ढाकापासून अवघ्या ५० किमी अंतरावर असलेल्या नरसिंगदी शहरात एका २३ वर्षीय हिंदू तरुणाला तो गॅरेजमध्ये झोपलेला असताना अज्ञातांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नृशंस घटनेमुळे बांगलादेशातील हिंदू समुदायामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे.
चंचल चंद्र भौमिक (२३), असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो कुमिल्ला जिल्ह्यातील रहिवासी होता. नरसिंगदी येथील पोलीस लाईन्सजवळील खानबारी मस्जिद मार्केटमधील एका कार रिपेअरिंग गॅरेजमध्ये तो मेकॅनिक म्हणून काम करत होता. शुक्रवारी रात्री कामाचा उरक संपवून तो गॅरेजमध्येच झोपला होता. दरम्यान, अज्ञातांनी बाहेरून गॅरेजचे शटर बंद करून आग लावली. गॅरेजमध्ये पेट्रोल, इंजिन ऑईल आणि इतर ज्वालाग्राही पदार्थ असल्याने आगीने काही क्षणांत रौद्र रूप धारण केले. चंचलचा गुदमरून आणि होरपळून जागीच मृत्यू झाला.
नरसिंगदीचे पोलीस अधीक्षक अब्दुल्ला अल फारुक यांनी सांगितले की, "आम्ही घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, त्यात काही संशयित व्यक्तींची हालचाल दिसून येत आहे. ही आग शॉट सर्किटमुळे लागली की कोणी मुद्दाम लावली, याचा तपास सुरू आहे." मात्र, स्थानिक नागरिक आणि चंचलच्या सहकाऱ्यांनी हा एक सुनियोजित खून असल्याचा आरोप केला असून आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांत बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच गाझीपूरमध्ये एका हिंदू मिठाई दुकानदाराची हत्या करण्यात आली होती, तर फेनीमध्ये एका हिंदू रिक्षाचालकाचा खून झाला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अंतरिम सरकारच्या काळात आतापर्यंत अल्पसंख्याकांविरुद्ध २,९०० हून अधिक हिंसेच्या घटना घडल्याची नोंद स्वतंत्र संस्थांनी केली आहे.