ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान

 

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीत ही घोषणा केली. वहिदा रहमान यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करताना आपल्याला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटत असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुरस्काराची घोषणा करताना सांगितले. 

आशा पारेख, चिरंजीवी, परेश रावल, प्रसनजीत चॅटर्जी आणि शेखर कपूर यांचा समावेश असलेल्या निवड समितीने वहिदा रहेमान यांची या पुरस्कारासाठी निवड केली असून, ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 

सन्मान जाहीर झाल्यानंतर वहिदा रहमान यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव सरू झाला आहे. वहिदा रहमान यांनी या बातमीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पीटीआयशी बोलताना या सन्मानाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, 'आज ही घोषणा होणं माझ्यासाठी दुहेरी आनंदाची गोष्ट आहे. कारण आज देव आनंद यांचा वाढदिवस आहे, गिफ्ट त्याला द्यायचे होते, मला मिळाले...'
 
वहिदा रहमान यांनी आपल्या सात दशकांपेक्षा जास्त अभिनय कारकिर्दीत ९०हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. गाईड  आणि नील कमल या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. १९७१ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकारने १९७२ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने, तर २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. वहीदा रहमान यांनी भारतीय चित्रपट सृष्टीवर अमीट ठसा उमटवल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे. 

दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी
दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते. भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीद्वारे पुरस्कारार्थीची निवड केली जाते. या पुरस्कारामध्ये स्वर्ण कमल (सुवर्ण कमळ) पदक, एक शाल आणि रोख बक्षीस ₹१०,००,००० यांचा समावेश आहे.