नवी दिल्ली येथे मंगळवारची सकाळ विषारी धुक्याच्या (Smog) दाट थरांनी उजाडली. संपूर्ण परिसरात हवेची गुणवत्ता 'खराब' ते 'गंभीर' श्रेणीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आनंद विहार, एम्स (AIIMS), गाझीपूर आणि इंडिया गेटसह अनेक भागांवर विषारी धुक्याची दाट चादर पसरली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, आनंद विहारचा 'एअर क्वालिटी इंडेक्स' (AQI) ४१० नोंदवला गेला असून तो 'गंभीर' श्रेणीत येतो. गाझीपूरमध्येही ४१० (गंभीर), एम्समध्ये ३९७ (अतिशय खराब) आणि इंडिया गेट परिसरात ३८० (अतिशय खराब) एक्यूआय नोंदवला गेला.
ग्रॅप-४ लागू
प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे, 'कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट'ने (CAQM) संपूर्ण दिल्ली-एनसीआरमध्ये 'ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन'च्या (GRAP) चौथ्या टप्प्यातील सर्व उपाययोजना लागू केल्या आहेत.
जेव्हा एक्यूआय ४५० च्या वर जातो, तेव्हा 'स्टेज-४' लागू केला जातो. निर्बंधांची ही सर्वात कठोर पातळी आहे. हवेचा दर्जा आणखी बिघडू नये आणि लोकांचा विषारी हवेसी येणारा संपर्क कमी व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. सोमवारी शहरात कमाल तापमान २३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
धोकादायक आकडेवारी
अनेक देखरेख केंद्रांवर प्रदूषणाची पातळी धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून आले. अक्षरधाममध्ये ४९३, तर द्वारका सेक्टर-१४ मध्ये ४६९ एक्यूआयची नोंद झाली. वजीरपूर, रोहिणी आणि अशोक विहार या भागांत तर एक्यूआयने ५०० ची कमाल मर्यादा गाठली. यावरून संकटाची तीव्रता लक्षात येते.
सीपीसीबीच्या मानकांनुसार, १०१ ते २०० दरम्यानचा एक्यूआय 'मध्यम', २०१ ते ३०० दरम्यान 'खराब' आणि ३०१ ते ४०० दरम्यान 'अतिशय खराब' मानला जातो. ४०० च्या वर एक्यूआय गेल्यास तो 'गंभीर' मानला जातो, तर ४५० आणि त्यापेक्षा जास्त असल्यास तो 'गंभीर-प्लस' (अतिगंभीर) श्रेणीत येतो. अशा वेळी आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या जातात.
निर्बंध काय आहेत?
नवीन निर्बंधांनुसार, सर्व प्रकारचे बांधकाम आणि तोडफोडीचे काम थांबवण्यात आले आहे. धूळ आणि कणांचे प्रदूषण वाढवत असल्याने स्टोन क्रशर (दगड फोडणारी यंत्रे), खाणकाम आणि संबंधित औद्योगिक कामेही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हवेचा दर्जा खालावत असल्याने उत्सर्जन रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून वाहनांवरील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. मुख्य रस्त्यांवर जास्त प्रदूषण करणाऱ्या चारचाकी वाहनांना लक्ष्य केले जात आहे.