२८ लक्ष दिव्यांनी उजळून निघणार रामजन्मभूमी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राम मंदिराच्या स्थापनेनंतर यंदा आयोध्येत दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. योगी सरकारकडून यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. अयोध्येत दिवाळीनिमीत्त डॉ. राममनोहर लोहिया अवध विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. प्रतिभा गोयल यांच्या व्यवस्थापनाखाली यंदाची दिवाळी ऐतिहासीक करण्यासाठी तब्बल ३० हजार स्वयंसेवकांच्या मदतीने २५ लाखहून अधिक दीप प्रज्वलीत करण्यात येणार आहेत. हा प्रयत्न यशस्वी झाल्याच हा विश्वविक्रम ठरणार आहे. 

मंगळवारी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीम कंसल्टंट निश्चल बरोट यांच्या देखरेखीखाली ३० सदस्यांनी शरयू नदीच्या ५५ घाटांवर दीव्यांची गणना पर्यवेक्षक, घाट प्रभारी, समन्वयक आणि मोजणी करणाऱ्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत सुरू केली आहे.

हा दीपोत्सव भव्य बनवण्यासाठी स्वयंसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. ३० ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी दिव्यांमध्ये तेल भरण्यासाठी एक-एक लीटरच्या बाटल्या उपलब्ध करून दिल्या जातील. स्वयंसेवक २८ साथ अंथरलेल्या दिव्यांमध्ये तेल घालतील, यावेळी घाटावर तेल सांडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. शरयू नदीच्या ५५ घाटावर २८ लाख दिवे लावण्यात येणार असून हे काम अंतिम टप्प्यात आहे.

यादरम्यान विद्यापीठ परिसरात घाट क्रमांक १० वर ८० हजार दिवे वापरून स्वास्तिक काढण्यात येणार आहे. हे या दीपोत्सवातील आकर्षणाचे केंद्र असणार आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. प्रतिभा गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ३० हजार स्वयंसेवकांकडून ५५ घाटांवर १६ बाय १६ दिव्यांचे ब्लॉक बनवण्यात आले आहेत, ज्यामध्ये २५६ दिवे ठेवण्यात येतील. यामध्ये एका स्वयंसेवकाला ८५ ते ९० दिवे प्रज्वलीत करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.