हिंदी गीतकारांच्या या तारांगणात गुलजार नावाचे नक्षत्र मात्र असे काही उजळले की पाहता पाहता ध्रुवताऱ्यासारखे अढळ होऊन बसले. हा मनस्वी कवी माझ्याच जीवनाचे गाणे गेली कित्येक वर्षे उत्कटपणे गातो आहे, ही दाट श्रद्धा काव्यरसिकांच्या मनात कायम असते. जगण्याचे कित्येक संदर्भ हलक्या हाताने उलगडून सांगणाऱ्या गुलजार यांच्या प्रतिभेचा सन्मान ज्ञानपीठाने करावा, हे स्वागतार्ह आहे.
मुग्धतेच्या क्षणात जे साकळलेले असते, त्याचे सुंदर शब्दरूप पुढ्यातल्या कागदावर किंवा सुरेल लकेरीतून उमटले की मन चकित होते. अशाप्रकारे वारंवार चकित करणारी प्रतिभा लाभलेल्या गुलजार ऊर्फ संपूरणसिंग कालरा यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. गुलजार यांची शायरी ही कुठल्याही हिंदी-उर्दू काव्यरसिकाच्या मर्मबंधातली ठेव आहे.
विशेषत: हिंदी चित्रपटांतील गाण्यांवर रसिकांच्या पिढ्यान् पिढ्या जोपासणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीत गुलजारांचे काव्य ही गोष्ट अगदीच ‘स्पेशल’! वास्तविक गंगाजमनी तहजीब लाभलेल्या आपल्या संस्कृतीत शायरीचे वळण तसे जुनेच. त्याला खानदानी परंपरादेखील आहे. पण काहीशा क्लिष्ट होऊन बसलेल्या उर्दू शायरीच्या दरियामधून एक गोड्या पाण्याचा पाट काढला गेला, तो हिंदी चित्रपटांच्या गीतांचा.
या भारतीय चित्रपटसंगीताने लोकगीत-संगीताची जागा कधी घेतली, हे कळलेदेखील नाही. कित्येक नामवंत शायर, मुशायरे सांभाळून या चित्रगीतांच्या लेखनाकडे वळले आणि अजरामरदेखील झाले. त्यात ‘यूंही कोई मिल गया था…’ असे मनींचे गूज सांगणारे किंवा ‘कोई ये कैसे बताए के वो तनहा क्यूं है…’,अशी अवघड प्रश्नावली शायरीतून मांडणारे कैफी आजमी होते, ‘ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें’ अशी गोड असहायता व्यक्त करणारे साहिर लुधियानवी होते, किंवा ‘जिसमें जवान होकर, बदनाम हम हुए, उस शहर, उस गली, उस घरको सलाम’ असे ठणकावून सांगणाऱ्या इश्काचा इजहार करणारे आनंद बक्षीही होते.
‘ये कहां आ गए हम, यूंही साथ साथ चलते,’ असा सवाल करणारे जावेद अख्तर तर आजही आहेतच. हिंदी गीतकारांच्या या तारांगणात गुलजार नावाचे नक्षत्र मात्र असे काही उजळले की पाहता पाहता ध्रुवताऱ्यासारखे अढळ होऊन बसले. हा मनस्वी कवी माझ्याच जीवनाचे गाणे गेली कित्येक वर्षे उत्कटपणे गातो आहे, ही दाट श्रद्धा काव्यरसिकांच्या मनात कायम असते.
जगण्याचे कित्येक संदर्भ हलक्या हाताने उलगडून सांगणाऱ्या गुलजार यांच्या प्रतिभेचा सन्मान ज्ञानपीठाने करावा, हे निश्चितच स्वागतार्ह आणि अभिनंदनीय. ‘है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे, कहते है के गालिब का है अंदाजे बयाँ और…’ असा गर्वभरा शेर खुद्द मिर्झा गालिब स्वत:बद्दल लिहून गेले. सुखनवर म्हणजे कवी. वर्तमानकाळात फिल्मी गीतकारांच्या मांदियाळीत गुलजारांबाबत अगदी हेच म्हणता येईल.
गुलजार हे हिंदी रसिकांच्या अभिजाततेचे प्रतीक आहेत. पांढरेशुभ्र परीटघडीचे कपडे, पोक्त चेहऱ्यावर मधाळ स्मित आणि तो अक्षरश: खेचून घेणारा खर्जातील आवाज, ही गुलजार यांची प्रतिमा जनमानसात ठसलेली आहे. इतकी की ‘कवी तो आहे कसा आननी’ या केशवसुतांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना साहित्यरसिक सहजच गुलजारांकडे बोट दाखवतील.
‘मोरा गोरा अंग लै ले, मोहे शाम रंग दई दे’ असे थेट मीरेशी नाते सांगणारे गीत लिहून आपल्या कारकीर्दीचा ओनामा करणाऱ्या गुलजारांनी प्रेम आणि दैनंदिन जगण्यातल्या चिमुकल्या गोष्टींचे अन्वयार्थ असे काही उलगडून पुढ्यात ठेवले की त्यांची गाणी हीच शायरी बनून गेली. एकीकडे मिर्झा गालिब किंवा मीर, जौक यांच्याशी नाळ जुळलेली, आणि दुसरीकडे पूरबी ढंगाची शब्दकळा अक्षरश: हात जोडून उभी!
या दोहोंच्या मधोमध गुलजारांच्या गाण्यांची शायराना नक्षी उमटत, बहरत गेली. ‘जाडों की नर्म धूप ओढ, आंगन में लेटकर…’ असे लोभसवाणे रेखाचित्र ते सहज लिहून जातात, आणि खुळावलेल्या गीतरसिकाच्या नाकाशी हलकेच काळ्या मातीचा गंध खेळून जातो. ‘मेरा कुछ सामां, तुम्हारे पास पडा है…’ असे सांगणारे त्यांचे ‘इजाजत’ चित्रपटातील भावदग्ध गीत आजही कित्येक हळव्या स्मृतींचे अंतरंग उलगडून जाते.
गुलजारांची गीते ऐकताना किंवा वाचताना ते आपल्याच भावविश्वाला शब्दरूप देत आहेत, असा भास होतो. इतकेच काय, सर्वसामान्याच्या मनातल्या प्रेमभावनाही हीर-रांझा किंवा सोहनी-महिवालपेक्षा रत्तिभरही कमी अभिजात नाहीत, याचा साक्षात्कार घडतो. तरुण पिढीच्या संवेदना अचूक पकडणारी विलक्षण टिपकागदी प्रतिभा त्यांच्या ठायी दिसते. म्हणूनच ‘कजरारे, कजरारे, तेरे कारे कारे नैना’ किंवा ‘बीडी जलाईले, जिगर से पिया’ अशी सदाबहार गाणी ते लिहू शकतात.
‘मुझ को भी कोई तरकीब सिखा मेरे यारजुलाहे..’ अशी सुरुवात असलेली त्यांची एक अद्भुत कविता आहे. हातमागावर वस्त्र विणता विणता जगण्याचे ताणेबाणे खुल्या गळ्याने मांडणाऱ्या त्या अजोड विणकराला,-कबिराला- उद्देशून केलेली ही कविता प्रत्यक्षात आपल्या सर्वांचीच होते. ती मुळातून वाचायला हवी. जीवनातील मुग्धतेचा गुलजार हा खरा भाष्यकार. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळणे म्हणजे ‘आमोद सुनांस जाले’ असेच म्हणायला हवे.
एखाद्या फिल्मी गीतकाराला ज्ञानपीठासारखा सन्मान मिळावा का, असा किरटा सवाल कुठेतरी उमटतो. पण ज्याला फिल्मी गाण्यांच्या आपल्या सामान्य जीवनातील स्थानाची कल्पना असेल, त्याला हा प्रश्न पडू नये. गीतकाराला कमी लेखण्याची, अभिजात शायर किंवा कविमंडळींची खोड समजून घेण्याजोगी आहे. कारण गीतकार हा प्राय: शब्दजुळारी अधिक असतो, असे मानले जाते.
तयार चालीवर शब्दांचे खिळे फिट्ट करणाऱ्या गीतकार या प्रजातीचा प्रतिभेपेक्षा कारागिरीकडे कल अधिक असा समज आहे. तो तितकासा खरा नाही. उलट तसे असेल तर ते अधिकच आव्हानात्मक मानायला हवे. ‘रोमन हॉलिडे’ सारख्या नितांतसुंदर चित्रपटाची पटकथा लिहिणाऱ्या डाल्टन ट्रम्बो या काहीशा बंडखोर लेखकाला ऑस्कर पुरस्कार विलंबाने मिळाला, पण रसिकांनी स्वखर्चाने त्यांचा, त्यांच्या गावात चक्क पुतळा उभारला.
लेखक-कवींची स्मारके उभी करण्याची प्रगल्भ रसिकता आपल्या देशात रुजली असती, तर अशा किरट्या सुरांना स्थान मिळाले नसते. शिवाय जिथे ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकरांसारखे गीतकार जन्माला आले, त्या महाराष्ट्रात तरी हा सवाल गैरलागू ठरावा!
गीर्वाण गौरव!
आजवरच्या परंपरेला थोडा छेद देऊन यंदा ज्ञानपीठ पुरस्कारही विभागून मिळाला. जगद्गुरू रामभद्राचार्य या प्रतिभावान संस्कृत विद्वानालाही तो जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षी भारतरत्न पुरस्कारही पाच जणांना देण्यात आले. ही एक नवी परंपरा सुरू झाली असेल, तर ‘ज्ञानपीठाने’ही तीच पुढे चालू ठेवली, असे म्हणायला हवे. बाराव्या शतकाच्या अंतिम काळात स्वामी रामानंद यांनी विशिष्टाद्वैताचा मार्ग दाखवला.
त्यांच्या शिष्यपरंपरेत संत कबीरांसारखा मूर्तिपूजेपलीकडला ईश्वर पाहणारे होते, आणि गोस्वामी तुलसीदासांसारखे भक्तिमार्गाचे अखंड पूजकही होते. त्याच परंपरेतील वर्तमानकाळातील प्रज्ञावान म्हणून आचार्य रामभद्राचार्यांकडे पाहिले जाते. ते संस्कृत पंडित आहेत, एकपाठी विद्वान आहेत, गीर्वाण भाषेतील साहित्याचे महत्त्वाचे भाष्यकार आहेत.
अवघे दोन महिन्याचे असताना दृष्टी गमावलेल्या रामभद्राचार्यांनी अंत:चक्षु आणि स्वयंप्रज्ञेच्या जोरावर वयाच्या पाचव्या वर्षी भगवद्गगीता आणि सातव्या वर्षी तुलसीदासविरचित श्रीरामचरितमानस पाठ करुन टाकले. आयुष्यात एकदाही ब्रेललिपी न वापरणाऱ्या रामभद्राचार्यांनी पुढे जीवनभरात दोनशेतीसहून अधिक टीकाग्रंथ लिहिले आहेत.
अयोध्येतील श्रीराममंदिराचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू होता, तेव्हा रामभद्राचार्यांनी दिलेल्या साक्षीचा सर्वाधिक प्रभाव पडला होता, असे मानले जाते. रामभद्राचार्यांचे नाव जनसामान्यांस तितकेसे परिचित नसेल; पण त्यांचे संस्कृत भाषेच्या संवर्धनाबाबतचे काम हिमालयाएवढे आहे, यात शंका नाही.
स्वत: अंध असूनही केवळ प्रज्ञेच्या जोरावर त्यांनी ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, आणि ११ उपनिषदे या प्रस्थानत्रयीवर टीकाभाष्य लिहिले. परंतु, संन्यस्त साधू किंवा निव्वळ अभ्यासक विद्वान अशी त्यांची ओळख मर्यादित नाही. ते स्वत:च एक संस्था आहेत. संस्कृत अध्यापन आणि प्रसाराच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य लक्षणीय आहे. देशातील पहिले ‘दिव्यांग विद्यापीठ’ त्यांनीच स्थापन केले.
त्यांची ग्रंथसंपदा विपुल असली तरी श्रीभार्गवराघवीयम् आणि गीतरामायणम् हे त्यांचे ग्रंथ संस्कृत अभ्यासकांमध्ये लोकप्रिय आहेत. संस्कृत ही भाषा अभिजात असली तरी ती मृतप्राय मानली जाते. आचार्य रामभद्राचार्यांनी संस्कृत साहित्यातील क्लिष्टपणा टाळून त्यातील मौक्तिके आवर्जून अन्य भाषांमध्ये उपलब्ध करुन दिली. त्यांचे बावीस भाषांवर प्रभुत्व आहे. नव्या तंत्रज्ञानालाही त्यांनी नाके मुरडली नाहीत.
आज त्यांची कित्येक भाषणे, प्रवचने, त्यांनी संगीतबद्ध केलेली गीते यांचा साठा समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. यंदा संस्कृत साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ही विशेष बाब मानायला हवी. या निमित्ताने संस्कृतमधील अक्षर-वाङमय पुन्हा चर्चेत येईल, अशी अपेक्षा आहे. तसे घडले तर हा पुरस्कार केवळ सन्मान न राहता त्यापलीकडे पोहोचेल, असे वाटते.