मुंबई
मुंबई शहराची सुरक्षा यंत्रणा अधिक भक्कम करण्यासाठी अदानी फाउंडेशनने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात १०० नवीन चारचाकी वाहने समाविष्ट करण्यासाठी अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांनी १५ कोटी रुपयांचे योगदान दिल्याची घोषणा केली आहे.
या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती देताना प्रणव अदानी यांनी २४ तास मुंबईकरांच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. "मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या खाकीतील शूर महिला आणि पुरुषांना आमचा सलाम आहे," असे सांगत मुंबई पोलिसांच्या ताफ्याचा विस्तार करण्यासाठी हे योगदान देण्याची संधी मिळाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
या योगदानासंदर्भात प्रणव अदानी यांनी मुंबई पोलीस मुख्यालयाला भेट दिली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि संयुक्त पोलीस आयुक्त मोहम्मद सुवेझ हक यांच्या उपस्थितीत त्यांनी संबंधित दस्तऐवज सोपवले. मुंबई पोलीस फाउंडेशनने अदानी फाउंडेशनच्या या मदतीचे स्वागत केले असून, यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेची पायाभूत रचना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, यापूर्वी अदानी एंटरप्रायझेसने केंद्र सरकारच्या नवीन 'समुद्र मंथन' योजनेचेही स्वागत केले होते. या योजनेमुळे भारतातील ऑफशोअर ऊर्जा क्षेत्रातील क्षमता वाढून देशाच्या अंतर्गत तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाला गती मिळेल, असे मत प्रणव अदानी यांनी व्यक्त केले होते.