अजित डोवाल यांचे 'मिशन कॅनडा'; दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी दोन्ही देशांचा 'वर्कप्लॅन'

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 18 h ago
National Security Advisor Ajit Doval with his Canadian counterpart Nathalie Drouin. | Photo Credit: PTI
National Security Advisor Ajit Doval with his Canadian counterpart Nathalie Drouin. | Photo Credit: PTI

 

ओटावा

गेल्या काही वर्षांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये 'दहशतवाद' आणि 'फुटीरतावाद' हे दोन मुद्दे वादाचे मुख्य कारण ठरले होते. मात्र, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि कॅनडाच्या सुरक्षा सल्लागार नॅथली ड्रौइन यांच्यात ओटावामध्ये झालेली बैठक या वादावर पडदा टाकणारी ठरू शकते. दोन्ही देशांनी आता दहशतवाद, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांविरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी एक व्यापक 'शेअर्ड वर्कप्लॅन' (सामायिक कार्ययोजना) तयार केला आहे.

२०२३ मध्ये हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील संवाद पूर्णपणे ठप्प झाला होता. या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा हा दौरा म्हणजे भारत आणि कॅनडा यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी केलेली मोठी 'मुत्सद्दी खेळी' मानली जात आहे.

दहशतवाद आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी 'लियाझॉन ऑफिसर्स'

या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे दोन्ही देश आता आपापल्या सुरक्षा यंत्रणांमध्ये 'लियाझॉन ऑफिसर्स' (संपर्क अधिकारी) नियुक्त करणार आहेत. यामुळे दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांना एकमेकांशी थेट संवाद साधता येईल. विशेषतः दहशतवादाला मिळणारी रसद, खलिस्तानी घटकांच्या हालचाली आणि कॅनडात बसून भारतात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळ्यांची माहिती रिअल-टाइममध्ये शेअर केली जाईल. पाणी कुठं मुरतंय हे शोधण्यासाठी आता दोन्ही देशांच्या यंत्रणा हातात हात घालून काम करतील.

अंमली पदार्थांच्या तस्करीला बसणार लगाम

कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांसमोर सध्या अंमली पदार्थांची तस्करी हे मोठे आव्हान आहे. फेंटानिल (Fentanyl) सारख्या घातक अंमली पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनांचा अवैध पुरवठा रोखण्यावर या बैठकीत एकमत झाले. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी नेटवर्क तोडण्यासाठी दोन्ही देशांनी आता गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्याचे मान्य केले आहे.

सायबर सुरक्षा आणि इमिग्रेशनमधील पारदर्शकता

आजच्या डिजिटल युगात सायबर हल्ले ही देशाच्या सुरक्षेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेच भारत आणि कॅनडा यांनी सायबर सुरक्षा धोरणावर अधिकृत सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, कॅनडात होणाऱ्या व्हिसा फसवणुकीच्या घटना आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या यंत्रणा आपापल्या देशांतर्गत कायद्यांनुसार कठोर पावले उचलतील.

पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या दौऱ्याची पूर्वतयारी

मार्च महिन्यात कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये मोठे व्यापारी आणि धोरणात्मक करार होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याचं काम अजित डोवाल यांनी यशस्वीपणे केलं आहे. ६ फेब्रुवारी रोजी त्यांनी कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसंगारी यांच्याशीही सविस्तर चर्चा केली, ज्यामध्ये कॅनडातील भारतीय समुदायाची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा होता.

एकूणच, अजित डोवाल यांच्या या दौऱ्याने भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांवर साचलेलं धुकं आता निवळू लागलं आहे. दहशतवादासारख्या जागतिक संकटाशी लढण्यासाठी दोन्ही लोकशाही देश एकत्र येणे, हे दक्षिण आशियाई आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.