नवी दिल्ली
"महान साम्राज्यांचा उदय आणि अस्त हा खरं तर त्यांच्या प्रशासनाचाच इतिहास आहे," असे स्पष्ट मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी शुक्रवारी व्यक्त केले. त्यांनी शेजारील देशांमधील राजकीय अस्थिरतेवर बोट ठेवत म्हटले की, "बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि इतर देशांमध्ये घटनाबाह्य मार्गाने जे सत्तापालट झाले, ते खरं तर 'खराब प्रशासना'चीच उदाहरणे होती." सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित '६व्या सरदार पटेल व्याख्यानमाले'त ते बोलत होते.
अजित डोवाल यांनी प्रशासनाचे महत्त्व पटवून देताना इतिहासातील दाखले दिले. ते म्हणाले, "रोमन साम्राज्य कोसळले कारण तेथील व्यवस्थापन बिघडले होते. हेच फ्रेंच क्रांती, झारशाही रशिया आणि मुघल साम्राज्यालाही लागू होते - ते सर्व ढासळले. युद्धानंतरच्या काळात, ज्या ३७ देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली, त्यापैकी २८ देश खराब प्रशासनामुळे अयशस्वी झाले, विखुरले गेले किंवा त्यांची शकले झाली."
डोवाल यांनी आधुनिक लोकशाहीतील त्रुटींवरही बोट ठेवले. ते म्हणाले, "लोकशाहीने यश मिळवले असले, तरी तिने स्वतःच्या समस्याही निर्माण केल्या आहेत. यामुळे असे 'पक्षपाती राजकारण' सुरू झाले आहे, जिथे विभाजनातच फायदा दिसतो."
त्यांनी स्पष्ट केले की, आजच्या परिस्थितीत, जर एखादा राजकारणी १०० पैकी २५ मते मिळवू शकत असेल, तर त्याचा भर आपली मते "५१" पर्यंत नेण्यावर नसतो, तर इतरांची मते विभागून ते (५१) पर्यंत पोहोचणार नाहीत, हे पाहण्यावर असतो. "अशा स्थितीत, मते ५१ पर्यंत नेण्याची आकांक्षा बाळगली जात नाही, तर समाजाला विभागून आणि तोडून फायदा घेतला जातो... आपण यापासून सावध राहिले पाहिजे," असे डोवाल म्हणाले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून बोलताना, डोवाल यांनी भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर मोठे विधान केले. ते म्हणाले की, भारतात दहशतवादाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यात आला आहे.
"तथ्ये ती तथ्येच असतात, ती नाकारता येत नाहीत. या देशात दहशतवादाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यात आला आहे. २०१३मध्ये देशाच्या अंतर्गत भागात शेवटची मोठी दहशतवादी घटना घडली होती. जम्मू-काश्मीर वगळता, जे पाकिस्तानसाठी 'प्रॉक्सी वॉर'चे क्षेत्र राहिले आहे, तो एक वेगळा विषय आहे. पण संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यांपासून सुरक्षित राहिला आहे," असे डोवाल यांनी ठामपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले, "शत्रू खूप सक्रिय राहिले आहेत, परंतु सुदैवाने आपण म्हणू शकतो की देशाच्या अंतर्गत भागात एकही दहशतवादी घटना घडलेली नाही. २०१४च्या तुलनेत 'डाव्या विचारसरणीचा अतिरेकीपणा' (नक्षलवाद) ११टक्क्यांपेक्षा कमी भागांपुरता मर्यादित राहिला आहे. बहुतेक नक्षलग्रस्त जिल्हे आता सुरक्षित घोषित करण्यात आले आहेत."
डोवाल म्हणाले की, केवळ सुरक्षा उपाययोजना करणे पुरेसे नाही, तर प्रत्येक भारतीयाला अंतर्गत आणि बाह्य शक्तींपासून सुरक्षित वाटणे महत्त्वाचे आहे. "आम्ही 'दरारा' निर्माण करू शकलो आहोत, ज्याचा अर्थ असा की, आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाल्यास, आमच्याकडे प्रत्युत्तर देण्याची इच्छाशक्ती आणि ताकद आहे, हे आम्ही खात्रीशीरपणे पटवून देऊ शकतो," असे त्यांनी स्पष्ट केले.
सरदार पटेलांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बोलताना डोवाल म्हणाले, "आज भारताला सरदार पटेलांच्या दूरदृष्टीची पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे. भारत केवळ स्थित्यंतरातून जात नाहीये, तर प्रशासनाची रचना, सामाजिक रचना आणि जागतिक व्यवस्थेतील आपले स्थान यामध्ये 'मोठे स्थित्यंतर' अनुभवत आहे." त्यांनी स्पष्ट केले की, एका संस्कृतीला एका राष्ट्र-राज्यात बदलणे हे एक 'प्रचंड मोठे कार्य' होते, जे केवळ प्रभावी प्रशासनाद्वारेच शक्य होते.
त्यांनी प्रशासनात सुधारणा करण्याचे, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धोरणे आखण्याचे आणि कायदेशीर व्यवस्थेकडेही पुन्हा एकदा पाहण्याचे आवाहन केले. तसेच, वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांची काळजी घेण्याची आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.