Assam Floods : आसाममध्ये पुराचा विळखा कायम; चराईदेव, शिवसागरसह ६ जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
आसाममधील पूरस्थितीत मदत व बचाव कार्य करणारे एनडीआरएफचे जवान आणि पूरग्रस्त नागरिक
आसाममधील पूरस्थितीत मदत व बचाव कार्य करणारे एनडीआरएफचे जवान आणि पूरग्रस्त नागरिक

 

आसाममधील पूरस्थितीत सोमवारी अंशतः सुधारणा झाली आहे. गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, मात्र राज्यातील ६ जिल्ह्यांतील ४.४५ लाख नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात अडकले आहेत, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये दिली आहे.

तीन जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका
ASDMA च्या अहवालानुसार, शिवसागर, गोलाघाट, चराईदेव, जोरहाट, नगाव आणि कामरूप (मेट्रोपॉलिटन) या ६ जिल्ह्यांतील ४,४५,४९५ लोक बाधित झाले आहेत. रविवारी हा आकडा ५.२४ लाखांवर होता. या वर्षातील महापुरात आतापर्यंत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे.

चराईदेव जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून तेथील १,८८,४०४ लोक बाधित झाले आहेत. यानंतर शिवसागरमध्ये १,४४,४६१ आणि जोरहाटमध्ये ७४,४५८ लोक प्रभावित झाले आहेत. सध्या बाधित भागांत ९० मदत शिबिरे सुरू असून त्यात २८,६९५ विस्थापित नागरिकांना आसरा देण्यात आला आहे. याशिवाय ९४ मदत साहित्य वितरण केंद्रे चालवली जात आहेत.

धनसिरी नदी धोक्याच्या पातळीवर
गोलाघाट जिल्ह्यातील नुमलीगड येथे धनसिरी नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि नागरी संरक्षण दलाचे जवान बाधित भागात मदत व बचाव कार्य करत असून त्यासाठी ६७ बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. या पुरामुळे ३७,१३९ हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत, तर २६,६७९ जनावरे वाहून गेली आहेत. याशिवाय विविध जिल्ह्यांमध्ये घरे, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.