नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचं निर्माणकार्य प्रगतीपथावर आहे. रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जानेवारी महिन्यात होणार आहे. त्याची तारीखदेखील निश्चित झालेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी नुकतेच वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राम मंदिराच्या तीन मजल्यांचं काम सुरु आहे. तळमजल्याचं काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होईल. आणि २६ जानेवारीपूर्वीच भाविकांसाठी रामलल्लाचे दर्शन सुरु होईल.
नृपेंद्र मिश्रा पुढे म्हणाले की, मंदिराच्या शिखरावर बसवण्यात येणाऱ्या उपकरणाचे काम सुरु आहे. त्याद्वारे रामनवमीच्या दिवशी गर्भगृहातील मूर्तीच्या कपाळावर सूर्याची किरणं क्षणभर पडतील. सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील एक संस्था यासाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज यांनी सांगितलं की, १५ ते २४ जानेवारी या कालावधीमध्ये धार्मिक विधी होतील. आम्ही पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवलेलं असून त्याचं उत्तरही मिळालं आहे. त्यानुसार २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत येतील आणि त्याच दिवशी प्राणप्रतिष्ठा होईल.
२०१९मध्ये राम मंदिराच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला होता. त्यासह नवीन मशिदीच्या बांधकामासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी पाच एकर जागा देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारले दिले होते. आता राम मंदिर निर्माणाचं काम जलदगतीने सुरु आहे. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल.