नाशिक शहरात बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने शहरात चार तात्पुरत्या कत्तलखान्यांना परवानगी दिली आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या जनावरांचीच कुर्बानी देता येणार आहे.
शनिवारी (ता. ७) बकरी ईद साजरी केली जाणार आहे. ईदनिमित्त कुर्बानी दिली जाते. कुर्बानीसाठी महापालिकेने यावर्षीही शहरात चार ठिकाणी तात्पुरत्या कत्तलखान्यांना परवानगी दिली आहे. जुने नाशिक मधील नानावली मशिद तर वडाळा गावात गौसिया अंजुमन ट्रस्ट, न्यू उम्मीद जनजीवन बहुउद्देशीय संस्था जिनत नगर, के.जी.एन.संस्था मेहबुबनगर या चार ठिकाणी परवानगी दिली आहे.
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असल्याने गोवंशीय जनावरांची कुर्बानी देता येणार नाही. तात्पुरत्या कत्तलखान्याची उंची किमान आठ फूट, तिन्ही बाजूस लोखंडी पत्रे, बांबूच्या चटईने जागा बंदीस्त असावी. कत्तलखान्यात मोकळी जागा असावी. रेती तसेच पाण्याचा पुरवठा, विद्युत व्यवस्था असावी. कुर्बानीनंतर मास नेताना संपूर्णपणे झाकून न्यावे, कुर्बानीचे संपल्यावर जागा निर्जंतूक करावी. कत्तलीसाठी जनावरे मिरवणुकीने आणू नये, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी केले आहे.