मुंबई महापौरपदाबाबत तडजोड नाही; दिल्लीतून फडणवीसांना स्पष्ट संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एक महत्त्वाचा आणि निर्णायक संदेश राज्याच्या नेतृत्वाला दिला आहे. मुंबई महापालिकेत सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे महापौर भाजपचाच झाला पाहिजे, यामध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला २९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दोन्ही पक्षांनी मिळून ११८ जागांसह बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. असे असतानाही महायुतीमधील काही नेत्यांनी आणि अजित पवार गटाने महापौरपदावर दावा करण्याची इच्छा व्यक्त केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

मात्र, आता दिल्लीतून आलेल्या आदेशाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. "मुंबईवर भाजपचाच झेंडा फडकणार, यात शंका नाही," असा विश्वास भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केला आहे. महायुतीमधील घटक पक्षांना योग्य सन्मान दिला जाईल, पण मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. अपेक्षित यश मिळाले नसतानाही पदांवर दावा करणे भाजपला रुचलेले नाही. त्यामुळेच दिल्लीतील नेत्यांनी थेट फडणवीसांशी संपर्क साधून पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. "आम्ही महायुतीचा धर्म पाळू, पण मुंबईतील जनतेने भाजपला 'सर्वात मोठा पक्ष' म्हणून कौल दिला आहे. त्यामुळे जनतेचा आदर राखत महापौर भाजपचाच होईल," असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

आगामी काळात महापौरपदाची निवडणूक होणार असून, भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीमधील ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईवर पकड मजबूत करण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.