भारतीय लष्कराने आपल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या ताकदीचा आणि अचूकतेचा पुन्हा एकदा परिचय करून दिला आहे. बंगालच्या उपसागरातील एका चाचणी केंद्रावरून नुकतीच ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या 'लाँग-रेंज प्रिसिजन स्ट्राईक' (अचूक लक्षभेद) क्षमतेची यशस्वी चाचणी करण्यात आली. या यशस्वी प्रक्षेपणाने ब्रह्मोसने लांब पल्ल्याच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता सिद्ध केली आहे.
ही मोहीम लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या ब्रह्मोस तुकडीने त्रिसेवा अंदमान-निकोबार मुख्यालयाच्या समन्वयाने यशस्वीपणे पार पाडली. या प्रक्षेपणाने भारतीय लष्कराच्या ब्रह्मोस तुकडीची योग्य वेळी अचूक मारा करण्याची तयारी आणि दीर्घ पल्ल्याच्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करण्याची ताकद ठळकपणे सिद्ध झाली आहे. प्रगत मार्गदर्शन प्रणाली आणि नियंत्रण तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणादरम्यान त्याची कार्यक्षमता, उच्च वेगवान उड्डाण स्थिरता आणि अंतिम लक्ष्य भेदण्याची अचूकता या महत्त्वपूर्ण बाबींची पडताळणी करण्यात आली. क्षेपणास्त्राने निर्धारित लक्ष्याला अचूकपणे भेदले आणि चाचणीची सर्व उद्दिष्टचे सिद्ध करून दाखविली. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले आहे.
आव्हानाला प्रत्युत्तर देण्याचे बळ
या प्रक्षेपणामुळे लष्कराच्या दीर्घ पल्ल्याच्या अचूक लक्ष्यभेद करण्याच्या क्षमतेत आणखी वाढ झाली असून, ही कामगिरी देशाच्या स्वदेशी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची अचूकता, विश्वासार्हता आणि प्रभावीतेची पुनः प्रचिती देणारी आहे. ही यशस्वी चाचणी 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत देशाची रणनीती क्षमता आणि तांत्रिक प्रगती सातत्याने बळकट होत असल्याचे दर्शविते. या कामगिरीमुळे भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांना आणि रणांगणातील आव्हानांना तोंड देण्याच्या तयारीला नवे बळ मिळाल्याचे या वेळी सांगण्यात आले.