नवी दिल्ली
हवामान बदलाच्या भीषण परिणामांमुळे भारतात धोकादायक उष्ण आणि दमट (Humid Heat) दिवसांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. १९७० च्या दशकात वर्षाकाठी सरासरी १०१ दिवस उष्ण आणि दमट असायचे, मात्र २०१६ ते २०२५ या कालावधीत हा आकडा थेट १४१ दिवसांवर पोहोचला आहे, अशी माहिती 'क्लाईमेट सेंट्रल'च्या एका नवीन विश्लेषणातून समोर आली आहे.
जेव्हा दैनंदिन कमाल 'वेट-बल्ब' तापमान २५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असते, तेव्हा त्याला 'धोकादायक उष्ण आणि दमट दिवस' मानले जाते. 'वेट-बल्ब' तापमान हे उष्णता आणि आर्द्रता यांचे मिश्रण मोजण्याचे साधन असून, ते मानवी शरीराला पर्यावरणाचा नेमका किती ताण सहन करावा लागत आहे, हे दर्शवते. जास्त आर्द्रता आणि उष्णतेमुळे शरीराची नैसर्गिक थंडावा निर्माण करण्याची प्रक्रिया (घाम येणे) मंदावते, ज्यामुळे उष्णतेशी संबंधित गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका वाढतो.
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातच अशा धोकादायक दिवसांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. १९७० च्या दशकात वर्षाला सरासरी १० दिवस असलेले हे प्रमाण आता २३ दिवसांवर पोहोचले आहे. विशेषतः उष्णकटिबंधीय दमट प्रदेशात वाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. १९७० पासून जगभरात नोंदवलेल्या अशा ६४ टक्के धोकादायक दिवसांना मानवनिर्मित हवामान बदल जबाबदार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. "हवामान बदल आता किरकोळ कारणावरून मुख्य कारण बनले आहे, ज्यामुळे जगातील कोट्यवधी लोकांचे जीवन धोक्यात आले आहे," असेही या अहवालात इशारा देण्यात आला आहे.