दिल्लीने अनुभवले शतकातील सर्वाधिक तापमान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

उत्तर भारतात आलेल्या उष्णतेच्या लाटेने आज राजधानी दिल्लीला चटके दिले. दिल्लीतील मंगेशपूर भागात ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे शतकातील सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाने सांगितले. उष्णतेची ही लाट गुरुवारीही कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दिल्लीत मंगळवारी मंगेशपूर भागात ४९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आज त्यात सुमारे अडीच अंशांची भर पडत ते ५२.३ अंशांवर गेले होते. आजचे तापमान दिल्लीतील सरासरी तापमानापेक्षा तब्बल ९ अंश सेल्सिअसने अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दिल्लीतील सर्वच भागांत तापमानाचा पारा ४५ अंशांच्या वर होता.

मागील आठ दिवसांपासून दिल्लीतील तापमान वाढलेलेच आहे. आज मात्र उन्हाची तीव्रता प्रचंड होती. यामुळे हवामान विभागाला दिल्लीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करावा लागला. उन्हामध्ये न फिरण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला. वाढते तापमान हा हवामान बदलाचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विजेची मागणी वाढली
उकाड्यामुळे दिल्लीतील विजेच्या मागणीत अचानकपणे वाढ झाली आहे. दिल्लीत सध्या ८,३०२ मेगावॉट विजेची मागणी आहे. उन्हामुळे पंखा, कूलर व एसीचा वापर वाढला आहे. दिल्लीत साधारणपणे उन्हाळ्यात सात हजार मेगावॉट वीजेची मागणी असते. यंदा त्यात वाढ झाली आहे.

शुक्रवारपासून दिलासा
अरबी समुद्रात होत असलेल्या वातावरणीय घडामोडींमुळे देशाच्या वायव्य भागात ३० मेनंतर आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे सध्या उष्णतेची लाट असलेल्या जोधपूर, बारमेर, उदयपूर, सिरोही व जालौर या भागांतील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दिल्लीतील तापमानावर शुक्रवारनंतर होण्याची शक्यता आहे.

राज्यात ब्रह्मपुरी ‘हॉट’
नागपूर : विदर्भात नवतपाच्या उन्हाचे चटके सुरूच असून, बुधवारीही बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णलाटेचा तीव्र प्रभाव दिसून आला. नागपूरच्या पाऱ्याने आज पुन्हा उसळी घेत पंचेचाळीशी पार केली. तर, ४६.७ अंश सेल्सिअस तापमानासह ब्रह्मपुरी विदर्भासह राज्यात ‘हॉट’ राहिले.

चंद्रपूर वगळता विदर्भात यलो अलर्ट नसल्यामुळे आगामी काळात पारा खाली येऊन उष्णता काहीशी ओसरण्याची शक्यता आहे. शनिवारनंतर काही जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या भीषण लाटेचा संपूर्ण विदर्भात सध्या प्रभाव आहे. बुलडाणा वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा पारा ४२ अंशांच्या वर गेलेला आहे. नवतपा गेल्या चार-पाच दिवसांपासून नागपूरकरांची चांगलीच परीक्षा घेत आहे.

काल ४४.८ अंशांपर्यंत घसरलेला पारा आज पुन्हा उसळून ४५.२ वर गेला. तर ब्रह्मपुरीच्याही कमाल तापमानात दीड अंशांची वाढ होऊन पारा ४६.७ अंशांवर स्थिरावला. येथे नोंद झालेले तापमान विदर्भासह संपूर्ण राज्यात सर्वाधिक ठरले.

विदर्भातील तापमान
शहर - तापमान

नागपूर - ४४.८

अमरावती - ४३.८

वर्धा - ४५.०

भंडारा - ४५.०

अकोला - ४२.६

बुलडाणा - ३८.२

यवतमाळ - ४४.०

गोंदिया - ४४.०

ब्रह्मपुरी - ४६.७

वाशीम - ४२.६

चंद्रपूर - ४४.२

गडचिरोली - ४४.६

उष्माघाताने वृत्तपत्र विक्रेत्याचा मृत्यू
उन्हाच्या तडाख्यामुळे उपराजधानीत मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहेत. दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने दोघांचा बळी घेतल्यानंतर आज एका वृत्तपत्र विक्रेत्याचाही ऊन सहन न झाल्याने मृत्यू झाला. वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेचे वितरक निखिल सुखदेवे (गोलू) असे त्यांचे नाव आहे.

इतर राज्यांतील स्थिती...
(कंसात बुधवारचे सर्वाधिक तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

बिहार (४७.७) : औरंगाबादमध्ये एका शाळेत सात ते आठ विद्यार्थिनी बेशुद्ध. आठ जूनपर्यंत सर्व खासगी शिकवण्या, अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश.

हिमाचल प्रदेश (४५) : आतापर्यंत १०३८ वणवे

ओडिशा (३८) : सावधगिरी बाळगण्याच्या नागरिकांना सरकारच्या सूचना

राजस्थान (५०.५) : राज्यभरात लाट कायम

छत्तीसगड (४३) : वन्यप्राण्यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना

जम्मू-काश्‍मीर (४७) : वाहने ओढण्यासाठी प्राण्यांचा वापर करण्यावर काही दिवसांसाठी निर्बंध

हवामान विभाग पडताळणी करणार
दिल्लीच्या तापमानाबाबत हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांच्या हवाल्याने ‘एएनआय’ने संध्याकाळी चार वाजता वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल देशातील सर्वच प्रमुख माध्यमांनी घेतली. या तापमानामुळे बरीच खळबळ उडून चर्चाही झाली. त्यानंतर भारतीय हवामान विभागाने रात्री आठ वाजता एक पत्रक प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले.

दिल्लीच्या प्रमुख भागांमध्ये बुधवारी दिवसभरात ४२ अंश ते ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगेशपूर भागात नोंद झालेले ५२.३ अंश तापमान हा त्या ठिकाणच्या वातावरणाचा परिणाम असू शकतो किंवा सेन्सरमध्ये बिघाड झाल्यानेही अशी नोंद झालेली असू शकते; आम्ही याची पडताळणी करत आहोत, असे या पत्रकात म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले कि, "दिल्लीत ५२.३ अंश सेल्सिअस तापमान असणे आश्‍चर्यकारक आहे. हे अद्याप अधिकृत नाही. याबाबत पडताळणी करण्याचे आदेश हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आम्ही लवकरच याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करू."