दिवाळी, प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण, पण याच सणात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांचा कर्कश आवाज आणि विषारी धूर निसर्गातील निष्पाप प्राणी आणि पक्ष्यांसाठी 'कर्दनकाळ' ठरतो आहे. शांत वातावरणाची सवय असलेल्या या सजीवांना फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा मोठा फटका बसत असून, यामुळे अनेक प्राणी-पक्षांच्या जिवावर बेतत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
याविषयी बोलताना पशुवैद्यकतज्ज्ञ डॉ. कल्याणी ठाकूर म्हणाल्या, "शांत, निसर्गरम्य वातावरणात जीवन जगणाऱ्या पक्ष्यांना मोठ्या आवाजाची सवय नसते. दिवाळीच्या दिवसांत सर्वत्र फटाक्यांचा गडगडाट सुरू होताच त्यांचा थरकाप उडतो. झाडांवर विश्रांती घेत असताना अचानक फटाके फुटल्याने पक्षी घाबरून निघून जातात. अंधारात दिशाभूल होऊन इमारतींना, तारा किंवा झाडांना धडकतात आणि गंभीर जखमी होतात. फटाक्यांच्या भीतीने पालक पक्षी घरटे सोडून पळून गेल्यामुळे पिल्ले अनाथ होण्याची गंभीर समस्याही उद्भवते. डोळ्यांना जखमा होणे, भाजणे, पिसे जळणे आणि दिशाभूल होणे यांसारखे शारीरिक नुकसानही पक्ष्यांना सहन करावे लागते."
"फटाक्यांच्या आवाजाने श्वान आणि मांजरी थरथर कापतात, घराच्या कोपऱ्यात लपून बसतात आणि अन्न खाणे टाळतात. काही पाळीव प्राणो भीतीने घराबाहेर पळून हरवतात. भीतीमुळे त्यांच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये असंतुलन निर्माण होऊन भूक मंदावणे, वारंवार लघवी होणे अशा समस्या दिसतात. तसेच, प्रत्येकवर्षी अनेक प्राणी डोळ्यांच्या इन्फेक्शनने त्रस्त झालेले आढळतात. फटाक्यांमुळे हवेतील सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईडडसारखे घातक वायू आणि सूक्ष्म कण (पीएम २.५ आणि पीएम १०) फुफ्फुसात आणि रक्तप्रवाहात प्रवेश करून गंभीर आजारांना आमंत्रण देतात. तसेच, त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्येलादेखील सामोरे जावे लागते, असे पशुवैद्यकतज्ज्ञ डॉ. सलोनी जोशी यांनी सांगितले.
पक्षी, प्राण्यांवर होणारे परिणाम :
घाबरून अचानक उडणे किंवा थरथरणे
दिशाभूल होणे किंवा फांदीवर बसता न येणे
श्वास घेण्यास त्रास होणे
पंख किंवा पाय मोडणे
भूक कमी होणे, अशक्तपणा जाणवणे
तीव्र भीतीमुळे अचानक मृत्यू होणे
डोळ्यांना इजा होणे
पालक पक्षी घरटे सोडून गेल्याने पिल्ले अनाथ होणे
तहान, भूक मंदावणे आणि थकवा जाणवणे
अशी घ्या काळजी...
पाळीव श्वान आणि मांजरींना घरात सुरक्षित, शांत कोपऱ्यात ठेवा
खिडक्या आणि दारे बंद ठेवा
आवाजाचा त्रास कमी करण्यासाठी घरात टीव्ही किंवा संगीत लावा
त्यांना शांत ठेवण्यासाठी त्यांचे आवडते खेळणे किंवा खाऊ द्या
जखमी किंवा आजारी प्राणी दिसल्यास तातडीने प्राणी कल्याण संस्था किंवा पशुवैद्यकांशी संपर्क साधा
झाडांखाली फटाके फोडणे टाळा
फटाके फोडताना त्यांची दिशा इमारती किंवा मोठ्या झाडांकडे नसावी, याची काळजी घ्या
कमी आवाज, कमी प्रदूषण करणारे (ग्रीन) फटाके वापरा.
फटाक्यांचा वापर मर्यादित वेळेसाठी आणि नियंत्रित ठिकाणी