दिवाळीनिमित्त मुंबईतील सर्व बाजारांत खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीच्या स्वागतासाठी बाजारपेठा तोरणे, रांगोळ्या, पणत्या आणि विद्युत तोरणं यांनी सजल्या आहेत, मात्र गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा ग्राहकांकडून स्वदेशीचा नारा दिला जात असून, चिनीऐवजी भारतीय विद्युत रोषणाईला पसंती दिली जात आहे.
दिवाळी म्हटली की विद्युत दिव्यांचा लखलखाट, रंगीबेरंगी रोषणाई. याच विद्युत दिव्यांनी मुंबईतील बाजारपेठा खुलल्या आहेत. विशेषतः दक्षिण मुंबईतील लोहार चाळीत मागील काही आठवडाभरापासून विद्युत दिव्यांच्या, तोरणांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. या बाजारपेठेत मागील अनेक वर्षांपासून चिनी विद्युत दिव्यांना, तोरणांना ग्राहकांची पसंती होती, परंतु यंदा भारतीय बनावटीच्या विद्युत तोरणांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.
यंदा नव्या आकाराच्या भारतीय, चिनी दिव्यांची भर पडली आहे. छोट्या आकाराचे कंदील, स्वस्तिक यांसारख्या एलईडी दिव्यांना यंदा ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. ग्राहकांचा यंदा स्वदेशीचा नारा आहे. त्यांना वस्तू कितीही महाग वाटत असल्या तरीही त्यांची खरेदीची ओढ ही भारतीय बनावटींच्या तोरणांकडे असल्याचे श्री समर्थ कृपा इलेक्ट्रीकल्स आणि एस. एस. के लाइट्सचे अण्णासाहेब निवडुंगे आणि रवींद्र आचरे यांनी सांगितले.
आकर्षक आणि स्वस्त असल्याने चिनी वस्तू या नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. याच कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून चिनी विद्युत रोषणाईने बाजारपेठा पूर्णपणे काबीज केल्या होत्या. ही स्थिती असली तरी या विद्युत रोषणाई फार काळ टिकत नाही. याउलट काहीशा महाग असल्या तरी भारतीय विद्युत रोषणाई टिकतात.
म्हणूनच ग्राहक आता भारतीय तोरणांना पसंती देत असल्याचे २० वर्षांपासून या व्यवसायात असलेल्या हुसेन लाइट्सचे मालक रशिद यांनी अधोरेखित केले.
चिनी विद्युत तोरणे ही ३० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत मिळतात. त्यात एकेरी, रंगीबेरंगी असे प्रकार आहेत. तीन मीटर, पाच मीटर ते ७० मीटरपर्यंतची विद्युत तोरणे उपलब्ध आहेत, तर भारतीय बनावटींची तोरणे ही २०० रुपयांपासून सुरू होऊन १५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्यात भिंतीवरील पट्टे, दिव्यांची तोरणे यांचा समावेश आहे.
व्यावसायिक अण्णासाहेब निवडुंगे म्हणले की, "मराठी भाषिकांची नेहमीच भारतीय बनावटीच्या तोरणांना अधिक पसंती असते. १५ वर्षे मी या व्यवसायात असून, आमच्याकडे येणारे बहुतांश ग्राहक याच तोरणांची मागणी करतात."
इलेक्ट्रिक फुलपारखे, मधमाश्या
दरवर्षी दिवाळीला बाजारपेठांमध्ये काहीना काही खास आणि विशेष आकर्षण असते. यांदा इलेक्ट्रिकची फुलपाखरे आणि मधमाश्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
त्यासोबत विविध फुलांच्या आकाराचे दिवेही ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या दिव्यांची किंमत दोन हजार ते १५ हजारपर्यंत आहे. विविध हॉटेल्स, सेलिब्रिटी, पब्स इ. ठिकाणी दिवाळीच्या सजावटीसाठी या इलेक्ट्रिकल्स फुलपारखे आणि मधमाश्यांची मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
लाइट्सचे व्यावसायिक राज आचरे यांनी सांगितले की, "भारतीय आणि चायना दोन्ही विद्युत तोरणांना ग्राहकांची पसंती असते, पण भारतीय बनावटीची तोरणे बिघडल्यास ती दुरुस्त करता येऊ शकतात, पण चायनामध्ये तसे करता येत नाही. त्यामुळे स्वदेशी खरेदीदार अधिक असतात."