भारत-पाक संबंधात आता जनताच मार्ग काढणार? माजी लष्करप्रमुखांनी मांडली रोखठोक भूमिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) मनोज नरवणे
माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) मनोज नरवणे

 

माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) मनोज नरवणे यांनी शेजारील पाकिस्तानसोबत संवाद आणि लोकसंपर्क वाढवण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते दत्तात्रेय होसबळे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. प्रादेशिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नरवणे यांनी म्हटले आहे.

आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानशी चर्चेची दारे उघडी ठेवण्याचे समर्थन केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जनरल नरवणे म्हणाले की, "हे अगदी योग्य पाऊल आहे. लोकांमधील संपर्क आणि संवाद ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सामान्य माणसाचा राजकारणाशी काहीही संबंध नसतो. सीमेच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या सामान्य माणसाच्या 'रोटी, कपडा आणि मकान' या मूलभूत गरजा आणि संघर्ष सारखेच आहेत."

जनतेमधील मैत्रीतून मार्ग निघणार
जनरल नरवणे यांनी पुण्यात आपल्या 'क्युरियस अँड द क्लासिफाईड: अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज' या नवीन पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "जेव्हा दोन देशांतील लोकांमध्ये मैत्री निर्माण होते, तेव्हा दोन राष्ट्रांमध्येही मैत्रीची शक्यता वाढते. संवाद हा केवळ राजकीय स्तरावरच नाही, तर ट्रॅक टू डिप्लोमसी किंवा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातूनही व्हायला हवा." सीमेपलीकडे राहणारे सर्वच लोक हे कट्टर शत्रू नाहीत, हे आपल्या लोकांनाही समजणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

दत्तात्रेय होसबळे यांनी आपल्या विधानात म्हटले होते की, पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाने भारताचा विश्वास गमावला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांतील नागरी समाजाने पुढाकार घेऊन तोडगा काढण्याची वेळ आली आहे. जनरल नरवणे यांनी या मुद्द्याशी सहमती दर्शवली आहे.

शांततेची भाषा पण शक्तीचाही आदर
भारत हा नेहमीच शांततेची भाषा बोलणारा देश राहिला आहे, असेही जनरल नरवणे यांनी यावेळी अधोरेखित केले. "सर्व वाद चर्चेतून सुटले पाहिजेत, याचा अर्थ असा नाही की आपण लष्करी शक्तीचा वापर करू शकत नाही. भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे, परंतु गरज पडल्यास आम्ही शक्तीचा वापर करण्यासही मागेपुढे पाहणार नाही," असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.