रशिया भारताला ऊर्जा पुरवठा सुरूच ठेवणार; परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांचे मोठे विधान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह

 

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी भारत आणि रशियामधील संबंधांवर भाष्य करताना मैत्रीचा नवा अध्याय अधोरेखित केला आहे. बाह्य शक्तींच्या अनुचित स्पर्धेला न जुमानता भारत आणि रशियामधील ऊर्जा पुरवठा करारांची पूर्ण अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत लावरोव्ह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक करत त्यांना जगातील सर्वात ऊर्जावान नेत्यांपैकी एक म्हटले आहे.

लावरोव्ह म्हणाले की, "मी खात्री देतो की रशियन पुरवठ्याबाबत भारताच्या हितसंबंधांना कोणतीही झळ पोहोचणार नाही. ही अयोग्य आणि अप्रामाणिक स्पर्धा आमच्या करारांना हानी पोहोचवणार नाही याची आम्ही काळजी घेऊ." रशियाने ऊर्जा पुरवठ्याबाबत भारताला दिलेली आश्वासने कधीही मोडली नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना लावरोव्ह यांनी त्यांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली. "मोदी हे जगातील सर्वात ऊर्जावान नेते आहेत. ते आपली सर्व ऊर्जा अर्थव्यवस्था, संरक्षण, लष्कर आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांत भारताचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी वापरतात. भारताची सभ्यता ही इतर कोणत्याही देशाशी तुलना न होणारी आहे," अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या नेतृत्वाचा गौरव केला.

तामिळनाडूतील कुडनकुलम प्रकल्प मैलाचा दगड
रशियाच्या तांत्रिक मदतीने तामिळनाडूमध्ये उभारला जाणारा कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा दोन्ही देशांमधील सहकार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पाच्या नवीन युनिट्सचे काम सुरू असून त्यातून भारताची ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणावर भागवली जात आहे. याशिवाय रशियाकडून वायू (गॅस), तेल आणि कोळसा यांसारख्या हायड्रोकार्बन्सचा पुरवठा सातत्याने सुरू असल्याचे लावरोव्ह यांनी नमूद केले. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.

भारत-रशिया अतूट मैत्री 
'हिंदी-रुसी भाई-भाई' हा केवळ एक नारा नसून तो आता आमच्या संस्कृतीचा भाग बनला आहे, असे लावरोव्ह यांनी सांगितले. रशियामध्ये भारतीय चित्रपट, राज कपूर आणि आधुनिक टीव्ही मालिका प्रचंड लोकप्रिय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दोन्ही देशांमधील संबंध केवळ राजनैतिक नसून ते विश्वास आणि मैत्रीच्या भक्कम पायावर उभे आहेत. आमचे मार्ग कधीही वेगळे होणार नाहीत, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

ब्रिक्स (BRICS) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी लावरोव्ह भारतात येणार असून, यावेळी ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय व्यापार, अंतराळ तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावर सविस्तर चर्चा करणार आहेत.