मिळालेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा सर्वाधिक प्रयागराज आणि भदोही जिल्ह्यांत आहे. प्रयागराजमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून भदोहीमध्ये १६ जणांनी आपला जीव गमावला आहे. याशिवाय फतेहपूरमध्ये नऊ, बदायूंमध्ये पाच, प्रतापगडमध्ये चार, चंदौली आणि कुशीनगरमध्ये प्रत्येकी दोन, तर सोनभद्र जिल्ह्यात एका मृत्यूची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडे पडल्याने दळणवळण आणि वीज पुरवठा खंडित झाला आहे.
जिल्हानिहाय झालेली जीवितहानी प्रयागराज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हंडिया परिसरात सात, फुलपूरमध्ये चार, सोरावमध्ये तीन, मेजा मध्ये दोन आणि सदरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. भदोहीमध्ये वादळामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून तिथे १६ जणांचा बळी गेला आहे. फतेहपूरमध्ये नऊ मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. प्रतापगडमध्ये भिंत कोसळून आणि अंगावर पत्रे पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला. कानपूर देहात, देवरिया आणि सोनभद्रमध्येही वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
कानपूर देहात जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणीचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर काही जनावरेही यात दगावली आहेत. सोनभद्रमध्ये अंगावर झाड पडल्याने ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
प्रशासनाला हाय अलर्ट आणि पंचनाम्यांचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बाधित क्षेत्राचा दौरा करून पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल आणि कृषी विभागाला विमा कंपन्यांच्या मदतीने पिकांच्या आणि मालमत्तेच्या नुकसानीचा तातडीने सर्व्हे करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकारी नियमांनुसार आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.