देशात लॉकडाऊन लागणार? केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी फेटाळल्या अफवा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी

 

देशभरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शुक्रवारी या सर्व अफवा खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारकडे सध्या असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक चिंता दूर करणे आणि कोणत्याही संभाव्य निर्बंधांबाबत अचूक माहिती देणे हा या स्पष्टीकरणामागचा मुख्य उद्देश आहे.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले मत मांडताना पुरी म्हणाले, "जागतिक परिस्थिती सातत्याने बदलत आहे. आम्ही ऊर्जा, पुरवठा साखळी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या घडामोडींवर रिअल-टाइम लक्ष ठेवून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसाठी इंधन, ऊर्जा आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा विनाव्यत्यय सुरू राहण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. आम्ही आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत." 
जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताने नेहमीच सहकार्य केले असून आम्ही वेळेवर आणि समन्वित पद्धतीने काम करत राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतात लॉकडाऊन लागण्याच्या चर्चा पूर्णपणे तथ्यहीन असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पुरी म्हणाले, "भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. मी हे स्पष्टपणे सांगतो की भारत सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. अशा वेळी आपण सर्वांनी शांत, जबाबदार आणि एकजूट राहणे महत्त्वाचे आहे. अफवा पसरवणे आणि लोकांमध्ये घबराट निर्माण करणे हे बेजबाबदारपणाचे आणि हानिकारक लक्षण आहे."

जागतिक स्तरावर तेल आणि वायूच्या तुटवड्यामुळे भारतात लॉकडाऊन लागू शकण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच घरगुती गॅस (LPG) पुरवठ्याची स्थिती चिंताजनक असल्याच्या बातम्या समोर आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर पुरी यांनी हे विधान केले आहे. 

या आठवड्याच्या सुरुवातीलाच भारत सरकारने देशभरातील लॉकडाऊनच्या चर्चा फेटाळल्या होत्या. सार्वजनिक हालचालींवर किंवा आर्थिक क्रियाकलापांवर निर्बंध घालण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील विधानांचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या भाषणादरम्यान 'सज्ज' राहण्याचे आवाहन केले होते. पश्चिम आशियातील तणाव आणि त्याचे आर्थिक परिणाम या संदर्भात त्यांनी हे भाष्य केले होते. मात्र या विधानावरून संभ्रम निर्माण झाला. २०२० मधील कोविड-१९ लॉकडाऊनला सहा वर्षे पूर्ण होत असतानाच या अफवांना जोर चढला. सरकारने 'कोविडसारखी तयारी' ठेवण्याचे केलेले आवाहन केवळ प्रशासकीय सज्जता आणि आपत्कालीन नियोजनापुरते मर्यादित होते. त्याचा अर्थ घराबाहेर पडण्यास बंदी किंवा प्रवासावर निर्बंध असा अजिबात नाही, असे सरकारने ठामपणे सांगितले आहे.
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter 



Latest News