राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणारी उच्चशिक्षित इकरा हसन

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Months ago
ट्रॅक्टरमधून प्रचार करताना इकरा हसन
ट्रॅक्टरमधून प्रचार करताना इकरा हसन

 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कैराना येथे तिसऱ्या पिढीतील राजकारणी इकरा मुनव्वर हसनने धुळीने माखलेल्या आणि वाहन चालवण्या योग्य नसलेल्या रस्त्यावर ट्रॅक्टरने प्रवास करत आपल्या प्रचार केला. 

परदेशातून उच्चशिक्षण घेऊन आलेल्या अठ्ठावीस वर्षांच्या इकराला समाजवादी पक्षाने अशा भागातून उमेदवारी दिली आहे जिथे पितृसत्ताक पद्धतीची मुळे आजही घट्ट आहेत. 

"मी थोडीशी चिंताग्रस्त आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतशी माझी अस्वस्थता वाढत आहे. परंतु माझे कुटुंबीय आजवर इथल्या लोकांची मनं जिंकत आले आहेत.  त्यामुळे इथल्या मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे." ट्रॅक्टरवर तिला सोबत करणाऱ्या 'आवाज-द व्हॉईस'च्या प्रतिनिधीशी इकरा संवाद साधत होती. 

खासदार म्हणून निवडून आल्यास इकराला महिलांना, विशेषत: मुस्लिम महिलांना आणि शेतकऱ्यांना सक्षम करायचे आहे. मतदारसंघातील शिक्षणाची स्थिती सुधारायची आहे. प्रदेशात उद्योगधंदे वाढावेत यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आखायच्या आहेत आणि मुस्लिम विणकरांसाठी नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्नही करायचे आहेत.

निवडणूक रॅलीला संबोधित करताना इकरा हसन

इकरा पुढे म्हणते, “ इथे मुलं-मुली एकत्र असतील अशा ठिकाणी पालक आपल्या मुलींना पाठवण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे मुलींसाठी नवी महाविद्यालये सुरू करण्याला माझे प्राधान्य असणार आहे.”

इकराने तिचे शालेय शिक्षण शामली येथून पूर्ण केले. त्यानंतर तिने दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. दिल्ली विद्यापीठातून तिने एलएलबीही केले.

इकरा राजकारण्यांच्या कुटुंबातून येते. राजकरणात ही तिची तिसरी पिढी आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे  एक व्यासपीठ झाले असले तरी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करावे लागणार असल्याची तिला जाणीव आहे. त्यामुळेच, 'खासदार होणे ही खूप मोठी जबाबदारी आहे' असे तिला वाटते. 

इकराचे आजोबा चौधरी अख्तर हसन कैराना मतदारसंघातूनच एकदा खासदार म्हणून संसदेत निवडून गेले होते. तिचे वडील चौधरी मुनव्वर हसन हे कैराना येथून दोन वेळा लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार होते. तत्पूर्वी ते कैरानातूनच आमदार म्हणून निवडून आले होते, पुढे ते विधानपरिषदेवरही निवडून गेले. 

इकराच्या आई बेगम तबस्सुम हसन या २००९मध्ये कैरानामधूनच खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. तर इकराचे भाऊ नाहिद हसन हे  सध्या इथलेच सपाचे आमदार आहेत. 

निवडणूक प्रचारासाठी एका गावावरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी इकराने ट्रॅक्टरचाच उपयोग केला. मतदारांशी संवाद साधताना १९ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत सायकलचे बटण दाबण्याचे ती आवाहन करत होती.  

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासोबत इकरा हसन

बुधवारी दुपारी, खेरी खुशनाम या राजपूतबहुल गावातील ग्रामस्थांनी अख्तर हसन यांच्या नातीची झलक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावल्या होत्या. अख्तर हसन यांनी १९८४मध्ये कैरानामधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत मायावती यांचा २ लाख ४४ हजार मतांनी पराभव केला होता. 

इकराच्या पक्षाचे समर्थक तिच्या प्रचारासाठी सर्वात योग्य मार्गाची निवड करत. मग तो खेरी खुशनाम येथील लाल महिंद्रा ट्रॅक्टरने केलेला प्रचार असो की राजपूतांच्या लव्वा दाऊदपूर गावामध्ये सनरूफ असलेल्या एसयूव्हीतून केलेला प्रचार असो. 

यूकेमधील स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजच्या शांत वातावरणात जिथे तिने आंतरराष्ट्रीय कायद्यात पदव्युत्तर पदवी मिळवणारी इकरा तिथून हजारो मैल दूर असलेल्या आणि पूर्णतः पितृसत्ताक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  इकरा तिच्या पितृसत्ताक व्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या खेडूत कैरानासारख्या खेड्यामध्येही तितक्याच सहजतेने आणि आत्मविश्वासाने वावरताना दिसली. 

मुझफ्फरनगरमधील जोला गावात राहणारे ६० वर्षीय चौधरी रईस राणा दहा दिवस इकराच्या प्रचारासाठी कैरानामध्ये तळ ठोकून आहेत. ते म्हणतात, "१९९६मध्ये लखनऊ येथे समाजवादी पक्षात प्रवेश केलं. तो  दिवस मला आजही स्पष्टपणे आठवतो."

चौधरी रईस राणा यांच्यासोबत इकरा हसन

रईस राणा यांचे  इकराच्या कुटुंबाशी चार दशकांहून जुने संबंध ऋणानुबंध आहेत. ते म्हणतात, “माझे वडील चौधरी मेहमूद हसन यांनी इकराच्या आजोबांसाठी प्रचार केला होता.  केवळ आपल्या मतदारसंघाचीच नव्हे तर बुलंदशहर, गाझियाबाद, मेरठ, मुझफ्फरनगर आणि सहारनपूरसह अनेक जिल्ह्यांतील लोकांचीदेखील काळजी घेणारे हे कुटुंब आहे." 

राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा एक भाग असलेल्या कैराना येथील पितृसत्ताक व्यवस्थेमुळे इकरा अजिबात डगमगली नाही. खासदारकीचा मार्ग सोपा नाही, भाजपचे विद्यमान खासदार प्रदीप चौधरी यांच्यासोबत 'काटे की टक्कर' होणार असल्याची तिला जाणीव आहे. मात्र विजयाची तिला तितकीच खात्री आहे.

इकरा म्हणते, "माझ्या कुटुंबाच्या  योगदानाची आणि कर्तृत्वाची मतदार जरूर दखल घेतील असे मला वाटते. माझे अब्बू मुनव्वर हसन यांनी आपल्या कर्तृत्वाने मतदारसंघातील लोकांच्या मनात स्थान मिळवले. मी पण त्यांचेच अनुकरण करत आहे."

इकरा कैरानातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंतित आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे मुली आणि महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दर्शवतात, याकडे ती लक्ष वेधते.  

याविषयी ती म्हणते, “महिला असल्यामुळे मला महिलांचसमोरच्या अडचणींची जाणीव आहे. स्त्रिया हिंसाचाराविरोधात तक्रार करण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत, असे अनेकदा दिसून येते. त्यामुळे मी हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी समुपदेशनाची सोय उपलब्ध करून देऊ इच्छिते. मी त्यांना सक्षम बनवू इच्छितो जेणेकरून ते बोलू शकतील." 

विकासाचे राजकारण करू पाहणाऱ्या या तरुणीला  मुस्लिम विणकरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत. ती म्हणते,  “या कामगारांपैकी अनेक जण पानिपत (हरियाणा) येथे कामाला जातात. ते ज्या महामार्गावरून प्रवास करतात तो असुरक्षित असून तिथे  काही जणांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे त्यांना हा प्रवास करावा लागू नये आणि इथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि पुरेसे कापड युनिट तयार व्हावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे."


 प्रचारादरम्यान इकरा हसनला आशीर्वाद देताना मतदारसंघातील महिला  

मतदारसंघातील सामाजिक सौहार्दाकडे लक्ष वेधत इकरा म्हणते, " कैराना हा सद्भाव जपणारा प्रदेश आहे. इथे विविध धर्मातील आणि ३६ समुदायातील लोक आनंदाने राहतात."

शेतीविषयी ती म्हणते, "मी शेतकऱ्यांच्या कुटुंबातून आले आहे.  शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत किंमत आणि मोफत वीज देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. सोबतच मला माझ्या क्षेत्रातील आरोग्यसेवाही सुधारायची आहे."

कैरानामधील पितृसत्ताक व्यवस्थेबद्दल इकरा म्हणते, “आमचा प्रदेश पुराणमतवादी आणि पितृसत्ताक आहे हे खरे आहे. मात्र माझा सामंजस्यावर भरोसा आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मला खूप थट्टेचा सामना करावा लागला आहे. मला 'बच्चा' (लहानबाळ) म्हणून हिणवले गेले. मात्र मी खचले नाही. कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे मिळालेले प्रीविलेज मी अजिबात गृहीत धरत नाही."


पारंपरिक पोशाक आणि डोक्यावर दुपट्टा ही इकराची ओळख झाली आहे. प्रचारासाठी तिला स्टार प्रचारकांची गरज भासली नाही. 'मी स्वतः माझ्या प्रचारासाठी सक्षम आहे' असं ती म्हणाली तेव्हा त्यातून तिचा आत्मविश्वास झळकत होता. 
 
 
- तृप्ती नाथ

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter